Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २६

प्रतिक्रिया: 
पान २६


"मी असं ऐकलं आहे की फ़ार लहानपणापासून शिकावा लागतो म्हणे डान्स..?" देवदत्तांनी विचारलं.

"अं...तसंच काही नाही. माझंच पहा ना, मी १५ वर्षांची असेन जेव्हा मी भरतनाट्यम् शिकण्यास सुरुवात केली. नोकरी, घर सांभाळून मी २५ व्या वर्षी विशारद झाले....त्यानंतर मला स्टेज शोज् च्या ऑफ़र आल्या, तेव्हापासून जे शोज करायला सुरुवात केली, ते अजूनही सुरुच आहेत आणि नॄत्याचा सरावही."

त्यानंतर मोहिनी उत्साहने डान्स शोजच्या दरम्यान घडलेल्या गमती-जमती, मजेदार प्रसंग याबद्दल भरभरून बोलत होती. देवदत्त मध्येच तिला प्रोत्साहन देत होते, काही प्रश्‍न विचारत होते. तिच्याशी बोलताना देवदत्तांच्या लक्षात आलं की मोहिनी निर्विवादपणे सुंदर आहे पण तिचा घोगरा आवाज तिच्या सौंदर्याशी विसंगत होता. बोलता बोलता अचानक मोहिनी देवदत्तांना म्हणाली, "थांबा हं, मी तुम्हाला माझ अल्बम दाखवते."

मोहिनी अल्बम आणायला आत निघून गेली तसं देवदत्त हॉलचं निरिक्षण करू लागले. डाव्या बाजूला मोहिनीचा नॄत्यांगनेच्या पोषाखातील मोठा फ़ोटॊ लावलेला होता. त्या फ़ोटोत तर ती अधिकच सुंदर दिसत होती. समोरच्या भिंतीवर टी.व्ही. च्या बाजूलाच एक भली मोठी शो-केस होती. त्यात भरपूर ट्रॉफ़ीज नीट लावून ठेवलेल्या दिसत होत्या. काही ट्रॉफ़ीजवरची नावं तर बसल्या जागेवरूनही वाचता येत होती. "....म्हणजे मोहिनी उत्तम डान्सर आहे तर...." देवदत्त स्वत:शीच म्हणाले.

मोहिनी ही खरोखरंच उत्तम डान्सर असावी, हे तिच्या अल्बममधील फ़ोटोंवरून लक्षात येत होतं. अल्बम चाळता चाळता, देवदत्त पटकन म्हणून गेले, "हं, एकदा आलं पाहिजे तुमच्या डान्स प्रोग्रामला."

"नक्की बोलवेन तुम्हाला," मोहिनी उत्साहाने म्हणाली.

तेवढ्यात देवदत्तांनी आपलं रिस्ट वॉचकडे नजर टाकली. एक तास उलटून गेला होता. बिझनेसच्या कामाव्यतिरिक्त ते आजपर्यंत कोणाकडे इतका वेळ बसले नव्हते. त्यांना पुन्हा ऑकवर्ड वाटायला लागलं. मोहिनीचा निरोप घेण्याच्या दॄष्टीने ते म्हणाले, "आता मात्र मला गेलंच पाहिजे. एक म्हत्त्वाचं काम आहे."

"ठिक आहे मिस्टर नाईक. मीसुद्धा तुम्हाला खूप वेळ बसवून ठेवलं आणि मीच बोलत होते." मोहिनी म्हणाली.

"नाही,तसं नाही. तुमच्याशी बोलताना, तुमचं बोलणं ऐकताना मला बरं वाटत होतं पण वेळेअभावी.."

"आय कॅन अंडरस्टॅण्ड." मोहिनी समजूतदार स्वरात म्हणाली.

"थॅंक्स. बराय मिस नटराजन, चलतो मी."

"ओह, प्लिज मला मोहिनी म्हणत जा. मिस नटराजन असं ऐकलं की खूप मोठं असल्यासारखं वाटतं."

"जरूर म्हणेन पण एका अटीवर. तुम्ही जर मला मिस्टर नाईक ऐवजी देवदत्त म्हणणार असाल तरच.."

"शुअर, देवदत्त." मोहिनी हसून म्हणाली.

"गुड. येतो मी. हे माझं कार्ड," असं म्हणत देवदत्तांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड तिच्यासमोर धरलं, "कधी तुमच्या शो ला बोलवावंसं वाटलं तर जरूर फ़ोन करा."

"मी लक्षात ठेवेन," असं म्हणून मोहिनीने कार्ड त्यांच्या हातातून घेतलं.

"ओ.के. गुड बाय, मोहिनी"

"गुड बाय, देवदत्त."
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment