Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ३३

प्रतिक्रिया: 
पान ३३


दुसर्‍या दिवशी सकाळी मोहिनीचा निरोप घेताना देवदत्तांनी तिचा मोबाईल नंबर आवर्जून घेतला. आपल्या हॉटेलवर परतल्यावर त्यांनी सर्वात आधी टबबाथ घेतला आणि जेवल्यावर मस्तपैकी ताणून दिली. बिछान्यावर अंग टाकताच त्यांना हळूहळू झोपेने घेरलं. उठल्यावर त्यांना जाणवलं की आज बर्‍याच दिवसांनंतर आपल्याला फ़्रेश वाटतंय. स्वत:शीच गाणं गुणगुणत त्यांनी निघायची तयारी केली. जाण्याआधी मोहिनीला "निघतोय" असं सांगण्यासाठी फ़ोन करावा असं त्यांना वाटत असताना, मोहिनीचाच फ़ोन आला. नकळत त्यांच्या चेहेर्‍यावर हसू उमटलं. त्यांनी फ़ोन उचलून "हॅलो" म्हटलं.

"झाली का तयारी?" मोहिनीने पलिकडून विचारलं.

"हो. सर्व आटोपलं. आता तुलाच फ़ोन करणार होतो मी.."

"बघ, है की नै? तु मला फ़ोन करणार त्या वेळेला नेमका माझाच फ़ोन आला."

"हं! तु आणखी पंधरा दिवस आहेस ना इथे?" देवदत्त.

"हो. ते लोक खरंतर कॉन्ट्रॅक्ट वाढवायचा विचार करतायंत पण मीच नको म्हटलं."

"का गं? चांगली संधी आहे ही!"

"ते खरंच आहे पण तिकडे माझ्या डान्स क्लासच्या स्टुडंट्स माझी वाट पाहात असतील. शिवाय माझे इंडियातील शोज मी बंद नाही केलेले."

"यू आर राईट. ठिक आहे तर. मी निघतोय आता. इंडियाला आलीस की भेटूच."

"ही काय बोलायची गोष्ट झाली.. तिकडे आले ना, की सर्वात आधी तुलाच फ़ोन करेन. ओ.के. देन, टेक केअर. बाय."

"बाय" म्हणून देवदत्तांनी फ़ोन आपल्या कोटाच्या खिशात टाकला आणि रुमच्या इंटरकॉमवरून रिसेप्शनला फ़ोन लावून, सामान उचलण्यासाठी बॉयला पाठवण्याची सूचना केली.

फ़्लाईटमध्ये बसल्यानंतर देवदत्त काल मोहिनीबरोबर झालेलं बोलणं आणि त्यांचं आजपर्यंतचं आयुष्य याचा सारखा विचार करत होते. जवळ-जवळ १९ तासांच्या प्रवासानंतर, ते दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास घरी पोहोचले, तेव्हा सुयोग बंगल्याच्या लॉनवर खेळत होता. देवदत्तांना आलेलं पाहताच तो झटकन त्यांच्या गाडीपाशी गेला. गाडीतून बाहेर पडल्यावर, देवदत्तांनी त्याला प्रेमाने जवळ घेतलं.

"काका, तु माझ्यासाठी काय आणलंस?" हा सुयोगचा नेहमीचा प्रश्‍न होता. देवदत्त बाहेरगावी गेले की त्याच्यासाठी खेळणी, खाऊ घेऊन यायचेच.

विसरल्यासारखं दाखवत देवदत्त म्हणाले, "अरेच्चा! विसरलोच मी."

"नाही..मला माहितीये, तु नाहीच विसरणार.."

सुयोगच्या या उत्तरावर देवदत्त खळखळून हसले. प्रेमाने टपली मारत त्यांनी सुयोगला हात धरून हॉलमध्ये आणलं. त्याच्यासाठी आणलेलं खेळणं त्याच्या हातात दिलं. सुयोग जाम खूष झाला. त्याला पुन्हा लॉनवर पिटाळून देवदत्त आपल्या बेडरूममध्ये गेले. काकांना फ़ोन करून आपण घरी पोहोचल्याची वर्दी दिली आणि ते वॉश घ्यायला गेले. ते फ़्रेश होऊन बाहेर येईपर्यंत हरीने त्यांच्यासाठी त्यांचा आवडता उपमा आणि चहा तयार ठेवला होता. उपम्याची चव घेताना त्यांना अतिशय प्रसन्न वाटत होतं. हा आनंद वेळेवर मिळालेल्या त्या आवडत्या नाश्त्याचा, बिझनेस डिल फ़ायनल झाल्याचा की मोहिनी भेटल्याचा..त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं पण हा आनंद घरातल्या सर्वांसोबत सेलीब्रेट करावा असं त्यांना फ़ार वाटत होतं. उत्साहाच्या भरातच त्यांनी काकांना फ़ोन लावला.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

2 comments:

  1. Tumachi lihinyachi style mala avadali.

    ReplyDelete
  2. Rupak, अभिप्रायासाठी धन्यवाद!

    ReplyDelete