Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ३०

प्रतिक्रिया: 
पान ३०दोन क्षण देवदत्तांकडे रोखून पाहात मोहिनी म्हणाली, "देव, त्यादिवशी तू माझ्या अपार्टमेंटखाली नाही, हाय-वे च्या कडेला पडला होतास. दोन बदमाश तुझ्या शरीराची झडती घेत होते. माझी खरोखरंच फ़्लाईट होती त्या दिवशी आणि मी एअरपोर्टच्या दिशेने चालले होते. सुदैवाने माझ्या ड्रायव्हरचं तिकडे लक्ष गेलंस म्हणून..."

"व्हॉट?" देवदत्तांना अनपेक्षित धक्का बसला होता.

"येस," मोहिनी ठामपणे म्हणाली, "माझ्या ड्रायव्हरने लांबूनच जोरात आवाज दिला, तसे ते बदमाश त्यांच्या बाईकवरून पळून गेले. मी जेव्हा माझ्या ड्रायव्हरसोबत तुझ्याजवळ गेले तेव्हा तू दारूच्या नशेत बोलत होतास, "डोंट वरी शारदा, तुला काही होणार नाही. मी आहे ना... त्या रात्री तुझ्या घरी... तुझ्या वयोवॄद्ध काकांना पाहिलं आणि घडलेला प्रसंग मी त्यांना सांगितलाचच नाही." मोहिनी पुढे म्हणाली.

"ओह माय गॉड! मोहिनी, मला अॅबसोल्यूटली काही आठवत नाहिये गं.." तिचं बोलणं ऐकून देवदत्त हैराण झाले होते.

"वाटलंच मला. त्याच वेळेस मला कळलं की शारदा नावाचं तुझं कोणीतरी जीवाभावाचं माणूस आहे. बहुधा ती तुझी पत्नीच असावी असा अंदाजही मी तेव्हा केला होता पण ती या जगात नाही, हे मात्र आत्ता तुझ्याकडूनच समजलं. मोहिनी म्हणाली.

"मला त्यावेळेस बहुधा तोच प्रसंग पुन्हा आठवला असेल.." देवदत्त शुन्यात नजर लावत म्हणाले.

"कोणता प्रसंग?" मोहिनी.

देवदत्त सांगू लागले, "...शारदाचा अॅक्सिडेंट झाल्याचं कळल्यावर, मी त्या जागी पोहोचलो, तेव्हाचा तिचा चेहेरा मला विसरताच येत नाही...मी तिला धिर देत होतो...अॅंब्युलन्सच्या येण्याचीही वाट न पाहता, मी तिला गाडीत घालून हॉस्पिटलला नेलं होतं...स्ट्रेचरवर झोपलेली माझी शारदा माझा हात हातात घेऊन, काही न बोलता माझ्याकडे फ़क्त पाहात होती...एकटक...." दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहेरा झाकून देवदत्तांनी आपले अश्रू लपविले.

तो प्रसंग ऐकून मोहिनीच्याही डोळ्यात पाणी आलं. ती काही न बोलता देवदत्तांच्या बाजूला, त्यांच्या रडण्याचा आवेग ओसरेपर्यंत बसून राहिली. थोडया वेळाने देवदत्त शांत झाले.

"तिला विसरणं माझ्यासाठी अशक्य आहे. माझी दहा वर्षांची सोबतीण, एका क्षणात माझ्यापासून दूर निघून गेली. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी..." देवदत्तांनी एक सुस्कारा टाकला.

मोहिनी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती.

देवदत्त विषण्ण स्वरात म्हणत होते, "तुला माहितीय मोहिनी, लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती. एका संगीतकाराचं आपल्या बायकोवर खूप प्रेम असतं. तिचंही त्याच्यावर तितकंच प्रेम असतं. पण एके दिवशी अचानक ती मरते. देव तिचा आत्मा स्वर्गात घेऊन जातो. मग तो संगीतकरसुद्धा देवाच्या मागोमाग स्वर्गात जातो....देवाकडे गार्‍हाणं गायला, की "बाबा रे, माझी बायको म्हणजे माझाच आत्मा आहे. तोच तू हिरावून घेतलास तर मी पॄथ्वीवर राहून काय करू? एकतर तिला तरी पॄथ्वीवर परत पाठव, नाही तर मलासुद्धा तिच्यासोबत इथेच राहू दे. देवालाही त्याच्या प्रेमाचा हेवा वाटतो. तो त्याच्या बायकोला पॄथ्वीवर पाठवून देतो पण एक अट घालतो. देव म्हणतो, "तुझी बायको तुझ्या मागेच प्रवास करत असेल पण जोपर्यंत तुझे पाय पॄथ्वीला लागत नाहीत, तोपर्यंत मागे वळून पाहू नकोस. संगीतकार "बरं" म्हणतो पण देवाच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवत नाही. पॄथ्वीला पाय लागण्याआधीच तो मागे वळून पाहातो, तर त्याला त्याच्या बायकोची धुसर आकॄती दिसते. ती आकॄती रडत रडत पुन्हा मागे जाताना म्हणते, "वेड्या काही क्षणांचा मोह टाळला असतास, तर आपण कायम सोबत राहिलो असतो..."

मोहिनी, मला कधी कधी असं वाटतं, की तो अभागी संगीतकार मीच आहे."

"का? असं का वाटतं तुला? शारदा गेली याच्यात तुझी चूक काय?" मोहिनीने प्रश्‍न केला.


ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

2 comments:

  1. kathan chan aahe. post thode mothe karal ka?

    ReplyDelete
  2. अनामित, आपल्या अभिप्रायासाठी धन्यवाद! पोस्ट मोठे करण्याचा जरूर प्रयत्न करेन.

    ReplyDelete