Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ३८

प्रतिक्रिया: 
पान ३८


त्यादिवशी मोहिनीने वाढदिवसाची भेट म्हणूण देवदत्तांना एक छानसं लँडस्केप दिलं. त्यांनी ते ऑफ़िसच्या केबीनमध्ये लावलं होतं. ते गिफ़्ट घेताना देवदत्तांनी मोहिनीला विचारलं, "आता तरी मला कळेल का, माझा वाढदिवस तुला कसा माहित झाला ते?"

"तुझ्याचकडून कळलं.." मोहिनी गाल्यातल्या गालात हसत म्हणाली.

"आता ते मी कधी सांगितलं होतं तुला?"

"आपण मागच्या वेळेस भेटलो होतो, तेव्हा बोलता बोलता तू पट्कन बोलून गेला होतास."

"..आणि ते तू बरोबर लक्षात ठेवलंस..."

लॅंडस्केपकडे पाहता पाहता देवदत्तांना मोहिनीबरोबरचं ते संभाषण आठवलं. ते स्वत:शीच हसत होते. तेव्हढ्यात त्यांच्या केबीनच्या दरवाज्यावर नॉक करून दिननकरराव आत आले. देवदत्तांच्या चेहेर्‍यावरचं हास्य अजून पुर्णपणे मावळलेलं नव्हतं. त्यांना असं मंदस्मित करताना पाहून दिनकररावांनी विचारलं, "काय रे, स्वत:शीच हसतो आहेस?"

"काही नाही काका."

"बरं, राहिलं."

एक क्षण विचार करून देवदत्तांनी दिनकररावांना त्यांच्या आणि मोहिनीच्या आजवरच्या भेटींचा वृत्तांत थोडक्यात ऐकवला. त्यावर दिनकरराव म्हणाले, "स्वभावाने चांगली दिसते मुलगी. तु एक काम कर देव. तिला आपल्या सुयोगच्या वाढदिवसाला घरी बोलाव. त्या निमित्ताने तिला घरी बोलावता येईल. तेवढीच सर्वांशी ओळख होईल तिची. मागे आली होती तो प्रसंगच निराळा होता."

सुयोगच्या वाढदिवसाचं आमंत्रण मोहिनीला फ़ोनवरून देण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन दयावी, असा विचार करून देवदत्त दुसर्‍या दिवशी मोहिनीच्या घरी गेले. ते तिच्या फ़्लॅटची बेल वाजवणार इतक्यात त्यांना आतून मोहिनीच्या हुंदक्याचा आवाज आला. देवदत्तांच्या छातीत एकदम धस्स झालं. त्यांनी पुढे होऊन दरवाजाजवळची बेल वाजवली आणि हुंदक्याचा आवाज खाडकन थांबला. देवदत्तांनी पुन्हा बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. आत कोणीतरी वावरतंय इतकं जाणवत होतं. पण ती मोहिनीच आहे की तिच्या व्यतिरिक्त आणखी कुणी आहे याचा अंदाज येत नव्हता. बराच वेळ झाला तरी दार उघडलं गेलं नाही, तेव्हा मात्र देवदत्तांना राहवलं नाही. त्यांनी पुन्हा बेल वाजवली. यावेळेस जर दार उघडलं गेलं नाही, तर सरळ दार तोडायचं असा विचार ते करत होते. तेवढ्यात पावलांच्या आवाजाबरोबर कोणीतरी दरवाजाजवळ येतंय याची जाणीव देवदत्तांना झाली. ते तसेच उभे राहिले. दरवाजा उघडला गेला पण मोहिनीचा चेहेरा दिसलाच नाही. दरवाजाच्या मागून तिचा आवाज आला.

"आत ये, देव."

देवदत्त आत गेले आणि त्यांनी तिच्याकडे वळून पाहीलं. रडून रडून लाल झालेले डोळे, उतरलेला चेहेरा, विस्कटलेले केस, अस्ताव्यस्त कपडे...अशी मोहिनी त्यांनी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. तिच्या त्या अवताराकडे पाहात त्यांनी विचारलं, "काय झालं मोहिनी? अगं, ही काय दशा आहे तुझी?"

त्यांच्या प्रश्‍नाचं उत्तर न देता मोहिनी शांतपणे म्हणाली, "जरा बसतोस का पाच मिनिटं?...मी चेहेरा धुवून येते."

"काय झालंय ते आधी सांगशील का?"

"सांगते. पण फ़क्त पाच मिनिटं दे मला. मी आलेच.." असं म्हणून त्यांना पुढे बोलू न देता मोहिनी आत निघून गेली.

बाहेर यायला तिने दहा मिनिटे घेतली पण तोपर्यंत देवदत्तांचं चित्त ठिकाणावर नव्हतं.... "काय झालं असेल?....हिच्या घरी काही झालं नाही ना?....की हिचं अफ़ेअर होते कुणाबरोबर, ते ब्रेक झालं....पण बोलली नाही कधी.....तसं पण फ़ॅमिलीबद्दलही बोलली नाही कधी...की हिच्या डान्स शोजचं एखादं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं.. हिला पैशाची तर काही अडचण नाही ना?.."

मोहिनी बाहेर आली तसं त्यांचं विचारचक्र थांबलं आणि ती त्यांच्यासमोरच्या सोफ़्यावर बसेपर्यंत देवदत्तांनी पुन्हा तिच्यावर प्रश्‍नांची फ़ैर झाडली. मोहिनी काही न बोलता नुसतीच खाली मान घालून बसली होती. देवदत्तांचे प्रश्‍न विचारून संपले आणि ती म्हणाली, "मी खरंतर, हे तुला कधीच सांगायचं नाही असं ठरवलं होतं देव. कारण चांगल्या मैत्रीला उगाच काही कारण नसताना सहानुभूतीची जोड मिळते आणि हळूहळू स्वार्थाचाही वास येऊ लागतो..."
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment