Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान १९

प्रतिक्रिया: 
पान १९देवदत्ताने कर्तॄत्वाची जी उंची गाठली ती आपण कधीच गाठू शकणार नाही, याची शेखरला कल्पना होतीच पण बापाच्या आणि चुलतभावाच्या भागिदारीच्या धंदयात आपल्याला ताटाखालचं मांजर बनून राहावं लागेल, ही कल्पनाही शेखरला भयावह वाटत असे आणि जेव्हा भितीचं हे पांघरूण झुगारून त्याने खरोखरच बिझनेसमध्ये लक्ष देण्याचं ठरवलं, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. त्याच्या बाहेरच्या भानगडी त्याला फ़ार महागात गेल्या होत्या. बिझनेसची सूत्र शारदाच्या हातात आली होती आणि ती गेल्यावरही बिझनेस सांभाळण्याचा जो पर्याय त्याला मिळाला होता तो काही फ़ार सन्मानजनक नव्हता.

त्याच्या तीन महीन्यांच्या प्रयत्नांनंतर देवदत्त पहिल्यांदा त्याच्याबरोबर बारमध्ये गेले होते. ते पहिल्यांदा त्याच्याबरोबर दारू प्यायला बसले तेव्हा तर स्वत:च्या हाताला चिमटा घेण्याची वेळ आली होती त्याच्यावर. ज्या माणसाने कधी शेखरच्या सावलीवरही विश्‍वास ठेवला नसता, तोच माणूस आज शेखरच्या हातात बिझनेस देऊन स्वत: बारमध्ये तासन् तास काढत होता.

ज्या प्रकारे देवदत्तांनी दारूच्या आहारी जाऊन बिझनेसमधून अंग काढून घेतलं होतं व ज्याप्रकारे दिनकररावांनी शेखरला बिझनेसमध्ये तयार करायला सुरुवात केली होती, त्यावरून देवदत्त बिझनेसची संपूर्ण जबाबदारी शेखरच्या अंगावर टाकणार हे निश्‍चित होतं. वर्षभराच्या मेहनतीनंतर शेखरला हा दिवस दिसला होता. सगळं कसं व्यवस्थित जमून येत होतं आणि तेवढ्यात तो देवदत्तांना तो छॊटासा अपघात होतो काय, दिनकरराव त्यांना दारू न पिण्याबद्दल समजावतात काय आणि देवदत्तही त्यांचं ऐकून पुन्हा ऑफ़िस जॉईन करतात काय! तडफ़डाट झाला शेखरच्या जीवाचा पण नुसतं हात चोळत बसण्यापलिकडे तो काहीच करू शकत नव्हता.

त्या रात्री शेखरचं आणि शालिनीचं या विषयावर बोलणं सुरु असतानाच देवदत्त आपल्या बेडरूममध्ये विचार करत होते, "आपल्याला सुखरूप घरी आणून सोडणार्‍या त्या मोहिनी नटराजनचे एकदा भेटून आभार मानले पाहिजेत. काय बरं पत्ता तिचा..? हं! ४०२, बी विंग, ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्स..."

ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment