Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ३६

प्रतिक्रिया: 
पान ३६


"तसं मी कसं म्हणेन काका? उलट शेखरच्या वाटणीचं प्रेमसुद्धा तुम्ही मला दिलंत. तुम्ही होतात म्हणून मी आज आहे. आई-बाबांची उणीव काय असते हे मला तुमच्यामुळे आणि काकूमुळे कधी समजलंच नाही. पण मी काय दिलं तुम्हाला? शेखरचा तिरस्कार, त्याचे शिव्याशाप..?" देवदत्त उद्वेगाने बोलत होते.

"अरे, काय बोलतोयंस देवा? तु काही केलेलं नाहीस. शेखरचा स्वभाव सुरुवातीपासूनच तसा होता, त्याला तू कारण नाहीस. जो तो आपल्या कर्मफ़ळांवर जगतो. तू काय, मी काय आणि शेखर काय?...आणि आजच हे असं बोलायची काय गरज पडली?"

स्वत:ला सावरून घेत देवदत्त म्हणाले, "काही नाही काका, नवीन प्रोजेक्टची फ़ाईल शेखरला दिलीय, त्याला काही अडलं तर जरा मदत करा. मला माहित आहे तुम्हाला आवडलेलं नाही हे पण..."

"मी त्याला मदत करेन, देव. तो इथली प्रोजेक्ट्स बर्‍यापैकी सांभाळतोय. एखादा फ़ॉरिन क्लायंट त्याच्याकडे द्‍यायला हरकत नाही. काल आपण बाहेर गेलो असताना, मी उगीचच ओव्हररिअॅक्ट झालो असं मला वाटलं. बरं.., त्याला ह्या कंपनीतील अर्धी पार्टनरशीप देण्याचा तुझा विचार पक्का आहे?"

"हो, का?"

"नाही रे, माझी पार्टनरशीप रद्द होते ना," वाईट चेहेरा करत दिनकरराव म्हणाले.

देवदत्त त्यांच्या या अभिनयावर मनापासून हसले.

त्या दिवशी पासून ’यज्ञ’च्या व्यवहाराला एक निराळंच वळण लागलं. दिनकररावांचं शेखरवर बारीक लक्ष असायचं पण त्यांना काही बोलायची संधी शेखरने दिलीच नाही. शेखरच्या प्रगतीबाबत देवदत्त मनापासून समाधानी होते. दरम्यानच्या काळात देवदत्त आणि मोहिनीची भेट होऊ शकली नाही पण त्यांचे एकमेकांना फ़ोन जायचे. शेखरच्या बाबतीत आपण काय काय निर्णय घेतलेत, त्याचे कसे रिस्पॉन्स मिळालेत, हे सर्व देवदत्त मोहिनीला ऐकवायचे. मोहिनीदेखील आपल्या डान्स टूर्सबद्दल सांगत असायची. एके दिवशी सकाळी सकाळी देवदत्तांच्या मोबाईलची रिंग वाजली. देवदत्त अजूनही गाढ झोपेत होते. त्यांनी कोणाचा फ़ोन आहे, हे न पाहताच मोबाईल कानाला लावला.

"हॅलो..."

"हॅपी बर्थ डे, टु यू..., हॅपी बर्थ डे, टु यू.." पलिकडून मोहिनी उत्साहाने गात होती.

"च्यायला, तुला कसं कळलं?" चकित झालेले देवदत्त बेडवर उठून बसत म्हणाले.

"हा, हा, हा!" नाटकी हसत मोहिनी म्हणाली. "कसं कळलं ते जाऊ देत पण कळलं की नाही?"

"बरं बाबा, ठीक आहे. थॅंक्यू."

"इतने सस्तेमें हम नही कटनेवाले. पार्टी दे." मोहिनी.

"काय लहान आहे का मी, बर्थ-डे पार्टी द्‍यायला?"

"हेच! हेच तुझं आवडत नाही मला, देव. लहान असलं म्हणजेच असं काही करायचं, असा काही नियम नसतो. ते काही नाही, मला पार्टी पाहिजे, म्हणजे पाहिजे."

"बरं बाई, देतो. आधी भेट तर खरी! तुझे शोज, क्लास याच्यातून तुला फ़ुरसत मिळाली की खुश्शाल घे पार्टी."

"हो ना, मग चल, आज भेट मला संध्याकाळी. मी आता एक महिना कोणताही शो करणार नाहीये. मला वेळच वेळ आहे."

मोहिनी आज भलतीच मूडमध्ये दिसत होती. शेवटी तिचं म्हणणं मान्य करून देवदत्तांनी तिला संध्याकाळी हॉटेल पॅराडाईज मध्ये भेटण्याचं नक्की केलं.


ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment