Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ३

प्रतिक्रिया: 
पान ३

मुलाखतीसाठी आलेल्या शारदाच्या उत्तरांनी आणि तिच्या शालीन सौंदर्याने दिनकरराव इतके भारवून गेले की 'सून असावी तर अशी', हा विचार त्यांच्या डोक्यात ठाम बसला. ती नोकरीसाठी आली आहे हे ते साफ विसरून गेले. अनाथाश्रमाच्या संचालकांकडे व बाहेर काही ठिकाणी तिची पूर्ण चौकशी केल्यानंतर त्यांची खात्री पटली की देवदत्तसाठी आपण निवडलेली मुलगी अगदी योग्य आहे. ही आपल्या अपरोक्ष केवळ व्यवसायच नाही तर देवदत्तलाही नीट सांभाळेल. एकदा खात्री पटल्यावर त्यांनी एका रात्री गप्पांच्या ओघात देवदत्तला शारदाची माहिती देऊन टाकली.


ध्यानिमनी नसताना काकांनी अचानक दिलेल्या ह्या माहितीने देवदत्त एकदम गोंधळून गेला. काय उत्तर द्यावं हे सुचेना, म्हणून त्याने काकांकडे दोन दिवसाचा अवधी मागून घेतला. बेडरूममध्ये गेल्यावर शारदाचा फोटो न्याहाळताना केव्हा झोप लागली हे देवदत्तला कळलेच नाही. तिच्या गुणांची तारीफ तर काकांनी केलीच होती पण तिच्या एकूण स्वभावातच गोडवा आहे, हे देवदत्तला तिच्यासोबतच्या पहिल्या भेटीत जाणवलं.

तिला भेटून परतताना आपल्या भावी आयुष्याच्या कल्पना रंगवत तो आपल्या कंपनीपर्यंत आला. आल्या आल्या सर्वप्रथम त्याने काकांना आपला होकार कळवला. मग काय, नाईक घराण्याची सून, देवदत्तची पत्नी आणि सोबत यज्ञ प्रकाशनची जनरल मॅनेजर म्हणून शारादाचा 'यज्ञ' बंगल्यात गॄहप्रवेश झाला.

शारादाच्या प्रेमळ व समंजस सहवासाने देवदत्तंचं वैवाहिक आयुष्य तर सुखात चाललं होतंच पण तिच्या कंपनीतल्या कष्टांचं फळ म्हणून, तिच्या आगमनानंतर अवघ्या दीड वर्षातच, यज्ञ प्रकाशन राज्यातील सर्वात मोठी पब्लिशिंग कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. आपल्या पत्नीच्या कर्तॄत्वाचा देवदत्तला अभिमान होता. पण वरुन प्रसन्न वाटणार्‍या शारदेच्या मनाचा एक कोपरा मात्र दु:खाने काळवंडला होता. त्यांच्या लग्नाला दीड वर्ष होऊन गेलं तरीही तिची कूस रिकामीच होती. देवदत्तला काही विशेष वाटत नसे पण शारदा मात्र मातॄत्वाचा अनुभव घेण्यासाठी आसुसली होती. तिच्या समाधानाखातर तिने व देवदत्तने अनेक टेस्ट केल्या, उपाय केले पण या सर्वाची फल:श्रॄती एव्हढीच निघाली की दोघांच्यात काहीच दोष नाही व त्यांना केव्हाही मूल होऊ शकतं.


कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

2 comments: