Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान १८

प्रतिक्रिया: 
पान १८


पण त्या दिवशी शेखरला वाटलं की आपल्यापेक्षा देवदत्तच्या गरजा पुरवणं, हे आई-बाबांना जास्त महत्त्वाचं वाटतं. देवदत्त अभ्यासातही हुशार होता. त्याचं उदाहरण देऊन बर्याजचदा शाळेतील शिक्षकदेखील शेखरची कानउघडणी करीत असत. कळत नकळत शेखरची तुलना देवदत्तशी होतच असे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून शेखर देवदत्तचा राग राग करू लागला होता. पण देवदत्ताच्या उजळ कर्तॄत्वापुढे शेखरचा त्रागा कोणाच्या लक्षातच आला नाही. तो वाळीत टाकल्यातच जमा होता. नाही म्हणायला शेखरला आठवीच्या वर्गात एक मित्र मिळाला होता, राकेश नावाचा. हा राकेश, रोज आपल्या वडीलांबद्दल काही ना काही गंमती जमती सांगायचा. "काल माझ्या बाबांनी मला रूळावर चालणारी छॊटी ट्रेन आणून दिली. उद्या मी बाबांबरोबर जत्रेला जाणार आहे," असं काय काय राकेश रोजच सांगत असे.

शेखरलाही राकेशच्या बाबांना भेटण्याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. एक दिवस संध्याकाळी शाळा सुटल्यावर, तो राकेशसोबत त्याच्या घरी गेला. त्याला वाटलं, राकेश इतकं आपल्या बाबांबद्दल सांगतो म्हणजे ते दिसायला एकदम रुबाबदार, देखणे असतील. पण त्याने पाहिलं तर, एक जाडा, केस पिंजारलेला माणूस पलंगावर अस्ताव्यस्त झोपला होता. राकेशने त्याला "बाबा, बाबा" म्हणत हलवून जागं केलं. राकेशच्या बाबांचे लालभडक डोळे पाहून तर शेखरला तर पळूनच जावंसं वाटत होतं पण तो मागे सरकण्याआधीच त्यांनी शेखरचा हात धरून त्याला जवळ बोलावलं. भितभितच शेखरने आपलं नाव सांगितलं. तसं राकेशच्या बाबांनी टेबलाच्या खणात ठेवलेलं एक चॉकलेट काढून शेखरच्या हातावर ठेवलं आणि त्याचा गालगुच्चा घेतला. त्याने गालगुच्चा घेताना, त्याच्या तोंडाला येणार्‍या वासाने शेखरला अगदी मळमळून आलं होतं पण त्यांच्या गालगुच्चा घेण्याने त्याला आपल्या बाबांचीही आठवण आली होती, "जेव्हापासून हा देवदत्त मॅट्रीक पास झालाय, बाबा तर त्याचे आणखीनच लाड करू लागलेत. आपल्याशी बोलायलाही बाबांना वेळ नसतो पण त्याच्यासाठी मात्र..." शेखरचे डोळे पटकन भरून आले होते.

राकेशच्या वडिलांच्या ते लक्षात आलं. त्यांनी विचारलं, "का रे बाळ, काय झालं?"

"काही नाही," डोळ्यातलं पाणी शर्टाच्या बाहीला पुसत शेखर म्हणाला आणि राकेशला व त्याच्या वडिलांना अच्छाही न करता, आपलं दप्तर सावरत तो घराच्या बाहेर पडला. त्यादिवशी शेखरने दिनकररावांकडून घरी उशीरा येण्याबद्दल मार खाल्ला होता.

"राकेश, तुझे बाबा दारू पितात का रे?" शेखरने दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्यावर राकेशला प्रश्न विचारला.

"हो," खाली मान घालून राकेश म्हणाला, "पण तसे ते खूप चांगले आहेत. आई मी खूप लहान असतानाच आम्हाला दोघांना सोडून निघून गेली. तेव्हापासून बाबांनीच मला सांभाळलं मला."

"तुला त्यांची भिती नाही वाटत? ते मारतात का तुला?" शेखरने पुन्हा प्रश्न केला.

"हॅ! घाबरायचं काय त्यात? उलट ते दारू पिऊन आले ना, की मला बरं वाटतं. मग माझे खूप लाड करतात मग ते. मला त्यांनी आजपर्यंत कधीच मारलं नाही." राकेश.

शेखर विचार करत होता, "दारू पित असले तर काय झालं? स्वत:च्या मुलावर प्रेम तर करतात. आजपर्यंत कध्धीच राकेशने बाबांचा मार खाल्ला नाही...."

त्यानंतर, जवळजवळ रोजच शेखर राकेशसोबत संध्याकाळी त्याच्या घरी जात असे. "राकेशसॊबत अभ्यास करतो," हे कारण त्याने घरी उशीरा येण्यासाठी तयार करून ठेवलं होतं. त्याच्या वार्षिक परिक्षेचा निकाल फ़ारसा आशाजनक नव्हता पण "पास तर झाला ना, पुढच्य वर्षी करेल जास्त अभ्यास," या मालतीबाईंच्या वाक्यापुढे दिनकररा्वांनी काहीच भाष्य केलं नाही. पुढची दोनही वर्षं शेखर जेमतेम मार्कांनी पास झाला शेखरच्या राकेशच्या घरी अभ्यासाला जाण्याचा किती उपयोग झाला होता, ते त्याचं त्यालाच ठाऊक पण शेखरमध्ये झालेला बदल त्याच्या वागण्याबोलण्यातून दिसू लागला होता; पूर्वी राग आला तरी गप्प बसणारा शेखर आता राग आल्यावर उलटून बोलून दाखवत होता. देवदत्त त्याचं मुख्य टार्गेट होतं.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

2 comments:

  1. कथा चांगली पुढे सरकते आहे. पुलेशु.

    ReplyDelete
  2. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद, भाग्यश्री.

    ReplyDelete