Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ७

प्रतिक्रिया: 
पान ७


रोज रात्री एक ते दीडचा सुमार ही देवदत्तांची घरी येण्याची वेळ ठरलेली होती. त्यांच्या नोकराला, हरीलाही त्यांची ही सवय माहीत झाली होती आणि आज पहाटेचे तीन वाजत आले तरी देवदत्तांचा पत्ता नव्हता. त्याने त्यांचा मोबाईल नंबर एक दोन वेळा ट्राय करून पाहीला पण तो बंद होता. हरीने 'यज्ञ'च्या ऑफीसमध्येही फोन करून पाहिला, तर नाईट अटेंडंटने सांगितलं की, "साहेब तर नेहमीप्रमाणे आठ वाजताच ऑफीसमधून बाहेर पडलेत."

मग मात्र हरीचं धाबं दणाणलं. धावत पळत तो दिनकररावांना उठवायला गेला.

"काय रे हरी?" एवढ्या रात्री हरीला आपल्या बेडरूमचा दरवाजा ठोठावताना पाहून, दिनकररावांच्या काळजाच ठोका चुकला.

"काकासाहेब, देवसाहेब अजुन घरी आले नाहीत. रात्रीचे तीन वाजून गेलेत."

"काय सांगतोस? तू त्याला मोबाईलवर फोन लावून पाहिलास का?" दिनकररावांनी विचारले.

"हो, साहेब. फोन बंद आहे, ऑफीसमध्ये पण फोन करून पाहिला. साहेब तिथेही नाहीयेत." हरीने एका दमात सांगून टाकलं.

"त्याच्या एखादा मित्र......ओह! पण इतक्या रात्री कुणाला फोन लावायचा, ते पण माहीत नाहीए." दिनकररावांना काय करावं ते सुचत नव्हतं.

हरीने चाचरात विचारलं, "काकासाहेब, पोलिसात जायचं का?"

"नाही, नको. तिथे आणखी निराळंच वळण लागेल. आपण असं करूया, तुला माहीत आहे ना, देव रोज संध्याकळी कुठे जातो ते?"." दिनकररावांनी विचारले

"हो" हरी म्हणाला.

"हं, मग जरा गाडी काढ. आपण त्या ठिकाणापर्यंत शोधून येऊ या. जर नाहीच सापडला तर मग पोलिसात जाण्याशिवाय गत्यंतर नाही." दिनकररावांच्या स्वरात चिंता डोकावत होती.

"काकासाहेब, शेखरसाहेबांना सोबत घेऊया का?" हरी.

"नको", दिनकरराव तुटकपणे म्हणाले, तसा हरी गाडी बाहेर काढण्यासाठी गॅरेजच्या दिशेने धावला.


कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment