Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान १४

प्रतिक्रिया: 
पान १४


मालतीबाई म्हणजे दिनकररावांच्या पत्नीलाही कधी कधी असे वाटत असे की दिनकरराव शेखरसोबत जास्तच कठोरपणे वागतात पण नव-याच्या वागण्याला हरकत घेण्याची हिंमत त्यांच्यात कधीच नव्हती.

साखरपुड्याच्या दिवशी शालिनीने देवदत्तांना पहिल्यांदा पाहिलं होतं आणि लग्न करण्यासाठी शेखरची निवड करून आपण खूप मोठी चूक केली आहे याचा अंदाज तिला येऊन चुकला. आहे त्यात गोड मानून राहण्याची कितीही तयारी तिने दर्शवली तरी लग्नानंतर तिचं मन आपोआपच शेखर आणि देवदत्त यांच्यात तुलना करू लागलं. देवदत्तांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वापुढे शेखरचं रांगडं व्यक्तिमत्व तिच्या डोक्यात तिडीक उठवू लागलं. त्यातच शेखरचं नाकर्तेपण तिला वारंवार तिच्या आईवडिलांपुढे आणि नातेवाईकांसमोर मान खाली घालायला लावत असे. या त्राग्यातूनच तिचे आणि शेखरचे खटके उडत असत.

शेखरलाही शालिनीच्या वागण्या्तील फ़रक हळूहळू जाणवू लागला होता. मात्र, कळतंय पण वळत नाही अशी त्याची अवस्था होती. बसल्या जागी हवं ते बिनबोभाट मिळत होतं, त्यामुळे स्वत:च्या पायावर उभं राहावं, स्वकर्तुत्वावर उजळून निघावं, अशी उर्मीच नव्हती त्याच्यात.

देवदत्त त्याच्याहून फ़क्त पाचच वर्षांनी मोठे होते पण त्यांच्या कर्तॄत्वाचा आलेख कायम चढताच होता. लहानपणीच ओढवलेल्या परिस्थितीमुळे असेल कदाचित पण ते अंतर्मुख व्हायला शिकले होते. आईवडिलांच्या पश्चात आश्रय देऊन काका-काकूने आपल्यावर एक प्रकारे उपकारच केले आहेत, हे ते सदैव स्मरणात ठेवून होते. त्यामुळे शिकता शिकता, पार्ट टाईम नोकरी करून अर्थार्जन करण्याची संधी मिळताच त्यांनी ती चट्कन स्विकारली. घरात असताना शेखर येता जाता त्यांचा अपमान करीत असे पण त्याकडे ते सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत असत. त्याबद्दल तक्रारीचा एक शब्दही त्यांनी कधी मालतीबाई अथवा दिनकररावांसमॊर उच्चारला नाही. पाच वर्षं एका प्रकाशन कंपनीत चहावाल्या पोऱ्यापासून ते असिस्टंट अकाऊंटंट म्हणून नोकरी करता करता, देवदत्तांना अखेर त्यांचं ध्येय मिळालं होतं.

डबघाईला आलेल्या एका प्रकाशन कंपनीचा मालक आपली कंपनी मशीनरीसकट विकायला काढत होता. देवदत्तांना एकट्याला ती विकत घेणं अर्थातच शक्य नव्हतं पण दिनकररावांनी ते मनावर घेतलं. त्यांनी स्वत:च्या प्रॉव्हिडंट फ़ंडा्मधून कर्ज काढलं, घरातील असेल, नसेल ते किडूक मिडूक विकून पैसे जमवले. त्यात देवदत्तांनी आजवर जमा केलेल्या पैशांची भर टाकून त्यांनी बँकेकडून कर्ज मिळवलं आणि ती कंपनी विकत घेतली. या सुमाराला शेखर नुकताच कॉलेजला जाऊ लागला होता. देवदत्तांचा स्वभाव सुरुवातीपासूनच हसतमुख होता. शिवाय पाच वर्षं प्रकाशन कंपनीत काम केल्याचा अनुभवही त्यांच्या पदरी होता. त्यामुळे ज्या प्रकाशकाने कंपनी मोडीत काढली होती, त्याच प्रकाशकाचे कॉन्टॅक्ट्स वापरून, देवदत्तांनी ती प्रकाशन कंपनी, अवघ्या पाच वर्षांत पुन्हा नव्याने उभी करून दाखवली होती. देवदत्तांची ही कर्तबगारी पाहून, कधी कधी दिनकररावांनाही हाच आपला मुलगा म्हणून जन्माला यायला हवा होता, असे वाटत असे.
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

2 comments:

  1. वर्णन छान केले आहे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद, रचना!

    ReplyDelete