Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २१

प्रतिक्रिया: 
पान २१


"यू मीन, सतीश....हा त्रास मला दारू पिण्यामुळे होतोय?" देवदत्तांनी चकित होऊन डॉ. बर्व्यांना विचारलं.

"अंह! दारू न पिण्यामुळे होतोय," मिश्किलपणे डॉ. बर्वे म्हणाले.

"म्हणजे मी दारू पिणं पुन्हा सुरू करावं म्हणतोयस..?" देवदत्तांनी प्रश्‍न केला.

"थांब, थांब, थांब. नीट समजावून सांगतॊ." डॉ. बर्व्यांच्या या वाक्यासरशी देवदत्त खुर्चीत सरसावून बसले.

"हे बघ, कसं असतं की, आधी तुम्ही थोडी दारू पिता, मग हळूहळू पिण्याचं प्रमाण वाढतं, तुमच्या शरिराला अल्कोहोलची सवय होते. मग अचानक तुमच्या शरीराला मिळणारा हा अल्कोहोलचा पुरवठा बंद झाला की तुमचं शरीर त्याची मागणी करतं. अशा वेळेस जर तुम्ही ही मागणी पुरवली नाहीत किंवा त्याऐवजी जर दुसरं काही सेवन केलंत, तर तुमचं शरीर बंड करतं आणि शरीर अल्कोहोलसाठी बंड करतं म्हणजे काय, तर तुमचं ब्लडप्रेशरवर वाढतं किंवा कमी होतं, तुमच्या पोटात आग पडल्यासारखं वाटू लागतं, अस्वस्थ वाटतं. मळमळतं किंवा उलट्या होऊ लागतात आणि पोटात काहिही राहात नाही. तरीही तुम्ही शरिराला दारू पुरवली नाहीत तर हा प्रकार तुमच्या जीवावरही बेतू शकतो."

"ओह, असं आहे का हे?" बिझनेसच्या कामानिमित्त पार्ट्या अटेंड केल्यावर, एक-एक बाटली दारू रिचवून व्यवस्थित बिझनेस टॉक करणारे लोक देवदत्तांनी पाहिले होते. दारूच्या एका ग्लासात बिझनेस डिल कन्फ़र्म होऊ शकतं याचीही त्यांना कल्पना होती पण तीच दारू असंही काही करू शकते, ही माहिती त्यांना नवीन होती.

"हं. मुळात दारू पिणंच वाईट, पिण्याचा अतिरेक तर त्याहून वाईट आणि त्यानंतर अशी अचानक दारू सोडून देणं तर सर्वात वाईट..." डॉ. बर्वे म्हणाले.

"..आणि मी तीनही वाईट गोष्टी केल्या..." देवदत्त खिन्न स्वरात म्हणाले.

"त्यात तुझी काही चूक नाही रे, देव. होतं असं. तुझ्याकडे तर निदान कारण तरी होतं. या जगात कित्येक लोक कारणाशिवाय दारू पितात."

"पण सतीश, मला आता दारू नाही प्यायचीय रे. चार-पाच दिवसांपूर्वीच माझं काकांशी बोलणं झालंय, या विषयावर. शेखरने आत्ता कुठे ’यज्ञ’ मध्ये लक्ष द्‍यायला सुरुवात केली आहे. काकांचं वय होत चाललंय..."

"हे आधी नाही समजलं?" डॉ. बर्व्यांच्या या फ़टकळ प्रश्‍नावर देवदत्तांना काहीच उत्तर देता येईना..ते नुसताच समोरच्या टेबलवर ठेवलेल्या पेपरवेटशी चाळा करीत बसले.

डॉ. बर्यांनाही एकदम अपराध्यासारखं वाटलं... "अरे, सोन्यासारखा संसर उध्वस्त झाल्यावर काय करावं या माणसाने? कॉलेजमध्ये असताना सिगरेटी फ़ुंकणं नि पार्ट्या करणं यापेक्षा पार्ट टाईम जॉब करून काकाचा आर्थिक भार हलका करणं पसंत केलं याने. अहोरात्र खपून हा एका कंपनीचा मालक बनला ते काय दारू पिऊन नाही..". चटकन परिस्थिती सावरत ते म्हणाले, "सॉरी यार, पटकन निघून गेलं तोंडातून."

डॉ. बर्यांकडे पाहात एक सुस्कारा सोडून, वातावरण हलकं करण्याच्या उद्देशाने देवदत्त हसत म्हणाले, "जाऊ दे, तुला काय मी आज ओळखतो का? हे असं बोलायचास म्हणून तर कॉलेजमध्ये पोरी तुझ्याशी फ़टकून असायच्या."

"हो आणि तुझ्या अवती-भवती त्या रुंजी घालत असूनही, आपल्याला काही माहितच नाही असं तू दाखवायचास......ती प्रमिला आठवते का, तुला प्रेमपत्र लिहिणारी..?" डॉ. बर्वें.

"अरे बापरे, ते प्रकरण कसं विसरेन मी? तिच्या हातापाया पडून सांगितलं होतं, की बाई गं, माझ्या मनात तुझ्याविषय़ी काही नाही, तर म्हणते जिच्याविषयी आहे, तिचं निदान नाव तरी सांग..आता कुठून सांगू हिला मी नाव, कोणी नाहीच तर...." देवदत्तांना त्या आठवणीने हसू फ़ुटलं.

त्यानंतर बराच वेळ देवदत्त आणि डॉ. बर्वे कॉलेजच्या जुन्या आठवणींमध्ये रंगून गेले होते. थोड्या वेळाने विषय पुन्हा देवदत्तांच्या दारू पिण्यावर आला, तसे डॉ. बर्वे म्हणाले, "कोई बात नही मेरे दोस्त. इस मर्ज का ईलाज है मेरे पास. मी काही गोळ्या आणि एक टॉनिक लिहून देतो ते वेळेवर घेत जा, निदान महिनाभर तरी सुरू ठेव, जमलंच तर मस्तपैकी हा आठवडाभर रेस्ट घे घरी आणि फ़्रेश होऊन ऑफ़िसला जा. त्यानंतरही त्रास होतोय असं वाटलंच तर मला मोबाईलवर फ़ोन कर."

त्यांच्या बोलण्यावर देवदत्तांनी, "ओ.के." म्हणून मान डोलावली आणि डॉक्टरांनी दिलेलं गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन आपल्या वॉलेटमध्ये ठेवलं. डॉ. बर्वे आपल्या खुर्चीतून उठून त्यांच्याजवळ गेले व त्यांच्या खांद्‍यावर हात ठेवून म्हणाले, "फ़ळांचं ज्यूस पिण्यावर भर देत जा. डोंट वरी, सर्व काही ठिक होईल. अशी काही हाताबाहेर गेलेली परिस्थिती नाही तुझी..."

देवदत्तांनी डॉ. बर्व्यांकडे पाहून एक स्मितहास्य केलं आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडले.

देवदत्त निघून गेल्यावर डॉ. बर्वे स्वत:शीच म्हणत होते, "खरंच मित्रा, व्यसन कुठलंही वाईटच, मग ते दारूचं असो वा प्रेमाचं... तुझी शारदा गेली, ती आता परत येणार नाही... तुझी दारू सोडवायला औषध आहे माझ्याकडे पण तुला शारदाच्या आठवणींतून सोडवणारं औषध मी कुठून शोधून आणू...?"
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment