Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २८

प्रतिक्रिया: 
पान २८


"मोहिनी, देअर ईज अ जेंटलमन कॉल्ड.....अं.....डेवडट्ट....वेटींग आऊटसाईड टू मीट यू," मोहिनीच्या मॅनेजरने आत येऊन सांगितलं.

मोहिनीला क्षणभर त्या नावाचा अर्थच उमगला नाही. मग लक्षात आल्यावर तिने विचारलं, "देवदत्त..?"

"याह...दॅट्स द नेम."

"ओह, प्लीज सेंड हिम इन."

देवदत्त ग्रीनरुममध्ये गेले आणि मोहिनी आनंदाने विस्फ़ारलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागली. मेक-अप अजून पूर्ण काढून झाला नव्हता तिचा. इतक्या जवळून मेक-अप मध्ये तिचे विस्फ़ारलेले डोळे आणखीनच मोठे दिसत होते. तिच्याकडे पाहताना देवदत्तांना पटकन हसू आलं. ते का हसतायंत हे लक्षात आल्यावर मोहिनीही जोररोरात हसून लागली. कसंबसं आपलं हसणं आवरत मोहिनी म्हणाली, "थांबा जरा, चेहेरा धुवून येते, नाहीतर तुम्ही असंच हसत राहाल. तेवढ्यात मोहिनीचा तो मॅनेजर पुन्हा आत आला आणि एकदा मोहिनीकडे पाहून मग देवदत्तांकडे वळून म्हणाला, "आय वॉन्ट टू स्टील युवर गर्लफ़्रेंड फ़ॉर फ़ाईव्ह मिनिट्स. डोंट वरी, शी विल बी राईट बॅक.."

मोहिनी किंवा देवदत्तांनी त्याला काही उत्तर देण्याआधीच त्याने देवदत्तांकडे पाहून डोळे मिचकावले आणि मोहिनीला बळेबळे ओढत पुन्हा स्टेजवर घेऊन गेला. तिथे मोहिनीचे काही लोकांबरोबर फ़ोटो काढण्यात आले. काही अमेरिकन व भारतीय वंशाच्या तरूण मुली तिचा ऑटोग्राफ़ घ्यायला आल्या होत्या. त्यांच्याबरोबरही फ़ोटो काढून झाले. ४-५ जण तिला बुके द्‍यायला थांबले होते. त्या सर्वांचे मान-सन्मान स्विकारून मोहिनी २० मिनिटांनी पुन्हा ग्रीनरुममध्ये आली.

"सॉरी," देवदत्तांकडे पाहात ओशाळं हसत मोहिनी म्हणाली, "तो माझा मॅनेजर मायकल...त्याला काय बोलावं समजत नाही. कोणीही भेटायला आला की तो असंच बोलतॊ."

"लिव्ह ईट. मी ते फ़ारसं मनावर घेतलं नाही. मी तुम्हाला हे सांगायला आलो होतो की तुम्ही खरंच खूप सुंदर नाचता." देवदत्त म्हणाले.

"थँक यू. तुम्ही पूर्ण शो पाहिलात?"

"हो, मला शो फ़ार आवडला. स्टोरी अतिशय सुरेखरित्या मांडली होती."

"मला स्वत:ला स्टोरीलाईन ऐकवली गेली तेव्हा फ़ार आवडली," मोहिनी म्हणाली, "तुम्ही बिझनेसच्या कामासाठी आला होतात का न्यू यॉर्कला?"

"हो," असं म्हणून देवदत्तांनी थोडक्यात आपल्या ट्रिपबद्दल सांगितलं.

"अच्छा, मग अजून किती दिवस आहात?" मोहिनीने विचारलं.

"उद्‍या जाणार. खरंतर आजची रात्रीची फ़्लाईट होती पण मी कॅन्सल करून उद्‍या रात्रीची करून घेतलीय. नाहीतर तुमचा शो कसा पाहता आला असता?"

"सो स्वीट ऑफ़ यू!" मोहिनी उद्गारली, "जरा पाच मिनिटे बसता का? मी मेक-अप काढून येते."

"तुमचं चालू दे. मी निघतॊ. माझं हॉटेल इथून लांब आहे. उशीर होईल जायला." देवदत्त म्हणाले.

"नो, नो, नो. असं मी जाऊ देणार नाही तुम्हाला," मोहिनी म्हणाली, मग पटकन लक्षात आल्यासारखं तिने विचारलं, "सॉरी, कुणी वाट पाहातंय का तिकडे?"

"नाही," देवदत्त मंदस्मित करत म्हणाले.

पुन्हा बेफ़िकीर होत मोहिनी म्हणाली, "नाही ना, मग कशाला घाई करताय? टुनाईट यू आर माय गेस्ट. आपण मस्तपैकी डिनर घेऊ आणि मग थोडा वेळ गप्पा मारू. मात्र, यावेळेस तुम्ही बोलायचं हं. मग तुम्ही तुमच्या हॉटेलवर गेलात तरी चालेल."

देवदत्तांना तिचा आग्रह मोडवला नाही. तिची तयारी आटोपून ते दोघं थिएटरच्या बाहेर पडले तेव्हा रात्रीचे अकरा वाजत आले होते. देवदत्तांनी रस्त्यावर आल्यावर टॅक्सीला हात केला. करकरत ब्रेक मारत एक टॅक्सी त्यांच्यापाशी येऊन थांबली...
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment