Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान १५

प्रतिक्रिया: 
पान १५


शेखरकडे पाहण्याची दिनकररावांची दॄष्टी कदाचित बदललीही असती पण जे देवदत्तने करून दाखवलं तेच करून दाखविण्याची पुरेपुर संधी शेखरलाही उपलब्ध होती. किंबहुना, एक एस्टॅब्लिश्ड पब्लिकेशन कंपनी त्याची वाट पाहत उभी असतानाही, शेखर मात्र त्याच्या व्यसनांमध्ये आणि लफ़ड्यांमध्येच गुंग होता. त्याच्यासमॊर भागिदारीचा प्रस्ताव, केवळ दिनकररावांनीच नाही, तर देवदत्तांनीही ठेवला होता पण "स्वतंत्र व्यवसाय करायचाय," असं कारण सांगून त्याने कित्येकदा वेळ मारून नेली मात्र त्या प्रत्येक वेळेस, त्याच्या स्वतंत्र धंदयासाठी लागणारं ’भांडवल’ तो दिनकरराव आणि देवदतांकडून घ्यायला विसरला नव्हता.

तशातच त्याने शालिनीशी लग्न करण्याची गोष्ट बोलून दाखवताच, दिनकरराव थोडेसे चिडले होते. शेखरच्या कोणत्या गुणावर भाळून शालीनी त्याच्याशी लग्न करायला तयार झाली हेच त्यांना कळेना. पण या वेळी मालतीबाई मध्ये पडल्या. "लग्न होऊ दे, मग बघा, पोरगा सुधारतो की नाही," या त्यांच्या वाक्यात आईची माया आणि अगतिकता दोन्ही होती. दिनकरराव पुढे काहीच बोलू शकले नाहीत.

लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात एका मुलाचा बाप बनण्यापलिकडे, शेखरने कोणतंही कर्तॄत्व गाजवलं नव्हतं आणि मालतीबाई व दिनकररावांना वाटल्याप्रमाणे त्याच्यात यत्किंचितही सुधारणा झाली नव्हती. त्यापुढची तीन वर्षं दिनकरराव आणि देवदत्तांनी रात्रीचा दिवस करून ’यज्ञ’ला नावारूपाला आणली होती. त्यानंतर शारदाच्या येण्याने तर दुधात जणू साखरच पडली. शेखरच्या आयुष्यावर मात्र याचा खूप मोठा परिणाम झाला होता. आता त्याला पूर्वीसारखे हवे तेव्हा, हवे तितके पैसे मागता येत नसत. शारदा प्रत्येक वेळेस हिशोब मागत असे. तिने कधी त्याला पैशांसाठी नाही म्हटले नाही पण हिशो़ब काय दाखवायचा हा शेखरपुढे मोठ्ठाच प्रश्न होता. या अडथळ्याचा बंदोबस्त कसा करता येईल, याचा विचार तो नेहमी करत असे.

शारदा आणि देवदत्तांच्या आयुष्यातील एक अपत्याची उणीव सोडली तर सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण शारदेची ही दुखरी नस शेखरने बरोबर ओळखली होती. संधी मिळताच त्याने, आपल्या मुलाला म्हणजे सुयोगला देवदत्त आणि शारदाला दत्तक देण्याचीही तयारी असल्य़ाचं भासवलं. उद्देश हा की निदान ह्या निमित्ताने घरात येणार्‍या पैशावर तरी आपल्याला हक्क सांगता येईल.
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment