Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २७

प्रतिक्रिया: 
पान २७


त्या दिवशी मोहिनीच्या घरातून बाहेर पडल्यावर देवदत्तांनी लॉंग ड्राईव्हला जाण्याचा बेत रद्द केला व ते सरळ घरी गेले. रात्री सर्वजण एकत्र जेवायला बसले असताना, देवदत्तांनी स्वत:हूनच दिनकररावांना आपण मोहिनीला भेटून आल्याची बातमी सांगितली आणि उद्‍यापासून आपण पुन्हा ऑफ़ीस जॉईन करतोय, असं सांगितलं. शेखर आणि दिनकरराव, दोघेही चकित झाले कारण देवदत्तांच्या सुटीचा हा अवघा दुसरा दिवस होता.

देवदत्त म्हणाले, "काका, मला नाही जमत, हे असं दिवस-दिवस रिकामं बसून राहायला. ऑफ़िसमध्येच बरं वाटतं."

दिनकरराव म्हणाले, "अरे पण, तुझी तब्येत..."

"काही झालेलं नाही माझ्या तब्येतीला, काका. उलट आता मी ठीक आहे. थोडा त्रास झाला तर काय करायचं, ते मला सतीशने सांगून ठेवलंय पण इतके दिवस असं नुसतंच बसून राहीलो तर नक्की पुन्हा आजारी पडेन असं वाटतंय."

दिनकरराव मनापासून हसले, "देव, मला माहित होतं, जास्तीत जास्त तू ४ दिवस घरी राहशील.."

शेखर काहीच बोलला नाही. जेवण संपवून "खूप झोप येतेय," असं कारण देऊन तो स्वत:च्या बेडरूममध्ये निघून गेला. जेवणानंतर दिनकरराव आणि देवदत्त बर्‍याच दिवसांनी लॉनवर गप्पा मारत बसले होते. देवदत्तांना असं नॉर्मल मूडमध्ये पाहून दिनकररावांनाही खूप बरं वाटलं होतं.

देवदत्तांचं ऑफ़ीस शेड्यूल नियमित झाल्याला एक महिना झाला असेल. नेहमीप्रमाणे त्यांचं ऑफ़िसचं काम, टुर्स सुरु झाल्या होत्या. गेले कित्येक दिवस ’हॉवर्ड अॅण्ड विल्सन पब्लिकेशन’ नावाच्या अमेरिकन प्रकाशन कंपनी सोबत त्यांचं बोलणं सुरु होतं. भारतामधील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळावर आधारित पुस्तकांची एक मालिका प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस होता, इतकंच नव्हे तर भारतातील इतर स्थळं, जी प्रेक्षणीय असूनही जगाला अनभिज्ञ आहेत, अशा स्थळांची ओळख करून देण्यासाठी त्यांना एका स्वतंत्र पुस्तकाचं प्रकाशन करायचं होतं. त्यासाठी त्यांना भारताच्या प्रत्येक राज्यातील एका पब्लिकेशन कंपनीसोबत कोलॅबोरेशन हवं होतं. ’यज्ञ’चं नाव महाराष्ट्रात अग्रगण्य असल्याने, साहजिकच त्या प्रकाशन कंपनीचं महाराष्ट्रातील प्रपोजल ’यज्ञ’कडे आलं. या कामानिमित्त देवदत्त अमेरिकेला गेले होते. ’हॉवर्ड अॅण्ड विल्सन पब्लिकेशन’च्या प्रतिनिधीसोबत बोलणी करून ते आपल्या हॉटेलच्या रूमवर परतत होते. त्यांची टॅक्सी ’न्यू यॉर्क सिटी थिएटर’वरून पास होत असताना, मोहिनीच्या ’बॅले शो’च्या पोस्टरने त्यांचं लक्ष वेधून घेतलं.

"मोहिनी न्यू यॉर्कमध्ये आहे?" ते आश्‍चर्याने पुटपुटले.

टॅक्सी ड्रायव्हरला टॅक्सी रस्त्याच्या कडेला उभी करायला सांगून ते खाली उतरले. थिएटरच्या बुकींग काऊंटरपाशी जाऊन त्यांनी दुसर्‍या दिवशीच्या शोची विचारणा केली. दुसर्‍या दिवशीच्या रात्रीच्या ८ वाजताच्या शोचं तिकिट काढून, ते आपल्या हॉटेलवर परतले. रुममध्ये गेल्यावर त्यांनी रिसेप्शनला फ़ोन करून आपला स्टे दोन दिवसांनी वाढविण्यास सांगितला. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी पावणेआठ वाजता थिएटरच्या दारापाशी पोहोचताना, ’आपण बालीशपणा तर नाही करत आहोत ना?’ असं काहीतरी फ़िलिंग त्यांना यायला सुरूवात झाली होती. हॉटेलवर पुन्हा परतायचे विचार त्यांच्या मनात घोळायला लागले होते पण तोपर्यंत हातातील तिकिट दरवाजाजवळील मशीनवर पंच करून ते आतही गेले होते.

"किती वर्षं झाली? आपण असं बाहेर कधी गेलोच नाही.....शारदाही किती तक्रार करायची...!" खुर्चित बसता बसता त्यांच्या मनात विचार तरळला.

म्युझिक सुरू झालं, पडदा उघडला आणि देवदत्तांची विचारांची साखळी तुटली. त्यानंतर पुढचा पाऊण तास देवदत्तच काय पण संपूर्ण ऑडियन्स मोहिनीचे नेत्रदिपक पदन्यास पाहून मंत्रमुग्ध झाला होता. भारतीय आणि पाश्‍चिमात्य नॄत्याची सांगड घालून बनविलेला फ़्यूजन बॅले सादर करताना मोहिनीने आपलं नॄत्यकौशल्य पणाला लावलं होतं. एका तरूण जोडप्याची प्रणयकथा त्या नॄत्यकथेत मांडली होती. कथा मध्यावर आलेली असताना, पंधरा मिनिटांचा ब्रेक झाला. मोहिनीला जाऊन भेटावं की काय असं देवदत्तांना फ़ार वाटत होतं पण त्यांनी स्वत:ला आवरलं. ब्रेकनंतर पुन्हा तो नॄत्याविष्कार पाहताना प्रेक्षक तसेच मंत्रमुग्ध झाले होते. कथेच्या शेवटी तरूणीचा प्रियकर तिला सोडून दूर निघून जातो, त्यावेळेचा तरूणीचा विलाप आणि आपण शेवटपर्यंत त्याची वाट पाहू असं त्याला सांगण हे केवळ नॄत्याच्या हालचालीतू्न मोहिनीने अतिशय उत्कॄष्टपणे मांडलं होतं. देवदत्तांना तो शो फ़ार आवडला. शो संपल्यानंतर देवदत्त मोहिनीला भेटायला गेले.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment