Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान १७

प्रतिक्रिया: 
पान १७


"त्या शारदाच्या सोबत हा देवदत्तसुद्धा मेला असता ना, तर बरं झालं असतं," पाचवा पेग पॊटात गेला आणि शेखरचा देवदत्तांवरचा राग अनावर झाला, "अरे, काय नाही केलं, हे सर्व मिळवण्यासाठी. आमचा बाप तो तसा. स्वत:च्याच घरात आश्रितासारखे दिवस काढायला लावले. त्या शारदाने पै पै ला महाग केलं मला, शेवटी पोरगा देण्याची पाळी आली तरी ही बाई काही बधली नाही. ती मेली तर म्हटलं, चला सुटलॊ. निदान पूर्वीसारखे पैसे तरी हातात खेळतील, म्हणून त्या देवदत्ताचे पाय धरले. स्वप्नातसुद्धा त्याने कधी दारूचा विचार केला नसेल. फ़ार कष्ट पडलेत मला, त्याच्या ओठांपर्यंत हा ग्लास नेण्यासाठी. गेले सहा महीने मी ते ऑफ़िस आणि घर ह्याच्याशिवाय कुठे गेलॊ नाहिये. हे सुद्धा घरात गुपचूप करावं लागतंय," टे़बलवर दाणकन आपटलेल्या ग्लासाकडे हात करत शेखर म्हणाला.

"हे बघ शेखर, उगाच राग राग करू नकोस. तुझं सुरूवातीपासूनच लक्ष नव्हतं ह्या बिझनेसमध्ये. तुला तुझ्या उद्योगांमधून सवड मिळेल तर ना!" शालिनी.

"अरे पण आता लक्ष घालतोय ना? तरी आमचा बाप काही त्या देवदत्ताच्या नावाचं तुणतुणं वाजवायचं सोडत नाही," शेखर तडकून म्हणाला,

"थोडा धिर धर, शेखर. तुझ्याबरोबर केलेल्या पार्टनरशीपच्या कराराचा हा शेवटचा महिना आहे. आत्ता काही उलट-सुलट केलंस ना, तर परिणाम आपल्यालाच भोगायला लागणार आहेत," शालिनी म्हणाली.

"हं, म्हणूनच गप्प बसलॊय." शेखर.

"मी तर म्हणते, काय वाईट आहे, सांग. तुला हवी तशी बिझनेसमध्ये पार्टनरशीप मिळतेय, तर तुला हवीत कशाला बाहेरची लफ़डी-कुलंगडी?"

शालिनीच्या या प्रश्नावर शेखरने काहीच उत्तर दिले नाही. तो नुसताच टी-पॉयवर ठेवलेल्या ग्लासाकडे पाहात बसला. त्याला तो प्रसंग आठवला....

शेखर पाच वर्षांचा असेल. मालतीबाई त्याला जेवायला वाढत होत्या. तेवढ्यात देवदत्त शाळेतून आला होता. त्याच्या पायाला ठेच लागली होती. त्याचा भळभळणारा अंगठा पाहून मालतीबाई हातातलं जेवणाचं भांड टाकून औषध घ्यायला धावल्या. पुढचा अर्धा तास शेखर पानावर तिष्ठत बसून होता पण देवदत्ताच्या जखमेवर मलमपट्टी होईपर्यंत त्याला जेवण मिळालं नाही. तसाच आणखी एक प्रसंग, दिनकरराव संध्याकाळी घरी येताना दिसले की शेखर घराच्या दारामागे उभा राहून त्यांच्या घरात येण्याची वाट पाहात असे. ते घरात आले की तो पट्कन दाराच्या मागून बाहेर येत त्यांना भो: करून दचकवत असे. दिनकररावही दचकल्याचं नाटक करून मग त्याला प्रेमाने जवळ घेऊन त्याचा गालगुच्चा घेत असत. एकदा तो असाच नेहमीप्रमाणे दाराच्यामागे लपला असताना, बराच वेळ झाला तरी दिनकरराव आलेच नाहीत. "कुठे राहिले आपले बाबा?" म्हणून तो बघायला बाहेर वाकला, तर घरासमोरच्या झाडाच्या पारावर दिनकरराव आणि देवदत्त बसले होते. दिनकररावांनी प्रेमाने त्याला जवळ घेतलं होतं आणि ते त्याच्या हातात काहीतरी वस्तू देत होते. त्यांनी काय दिलं ते शेवटपर्यंत शेखरला कळलं नाही.
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment