Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ६

प्रतिक्रिया: 
पान ६


शेवटी व्हायचं होतं ते झालंच! शारादाच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी देवदत्तांनी, शेखरला बिझनेसमध्ये पार्टनर बनविण्याची गोष्ट, दिनकररावांच्या उपस्थितीत शेखराला बोलून दाखवली. शेखरचं छद्मी हास्य दिनकररावांना येणार्‍या संकटाची चाहूल देत होतं पण परिस्थितीचा कौलच त्यांच्या बाजूने नव्हता. शारदाच्या अकाली मॄत्यूनंतर दारूने देवदत्तांना पूर्णत: अंकित केलं होतं, दिनकरराव वार्धक्याच्या छायेत वावरत होते. व्यवसाय सांभाळणारं दुसरं होतं कोण?

शेखरला ऑफीशिअली 'यज्ञ' चा पार्टनर करून घेतल्यावर तर देवदत्तांनी जणू बिझनेसमधून अंगच काढून घेतलं. शेखरलाही अर्थात सुरुवातीला ते जडच गेलं कारण पार्टनरशीपचा करार करताना, दिनकररावांनी मुद्दामच असा एक क्लॉज टाकून घेतला होता की, 'करारापासून ६ महिन्याच्या आत जर शेखरने कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी कॄती केली तर त्याची पार्टनरशीप रद्द होणार होती व केवळ देवदत्त संपूर्ण यज्ञ प्रकाशनचा मालक झाला असता आणि शेखरचे वडील असल्याने मग दिनकररावांनही हक्क मागता येणार नव्हता.'

"निदान सहा महिने तरी कळ सोसायलाच हवी, नाहीतर धुपाटणंच हाती यायचं", असा विचार करून शेखर गुपचूप धंदयातल्या खाचाखोचा दिनकररावांकडून समजावून घेत होता. तीन महिन्यानंतर त्याला त्यात गोडीही वाटू लागली होती. शेखर पार्टनर होऊन आता जवळ्जवळ पाच महिने होत आले होते. त्याने कोणताही अनुचित प्रकार केलेला नव्हता. या पाच महिन्यात घर आणि ऑफीस याव्यतिरिक्त त्याला जग ठाऊकच नव्हतं.

"वाटलं होतं तसा अगदीच कामातून गेलेला नाही आपला मुलगा, शिकेल हळूहळू," असं खुद्द दिनकररावंनाही वाटू लागलं होतं. तसं त्यांनी देवदत्तांना बोलूनही दाखवलं.

आपल्यावर असलेला शेखराचा राग निदान या निमित्ताने तरी कमी होईल, अशी आशा देवदत्तांनही वाटू लागली होती आणि तशातच ती घटना घडली....

रोज रात्री दारू पिऊन, अडखळत का होईना पण घरीच येणारे देवदत्त, घरी आलेच नाहीत.कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment