Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान १३

प्रतिक्रिया: 
पान १३


ते वयच वेडं असतं. शेखरच्या ह्या पवित्र्याचा तिला राग तर आला होता पण आपला हात सोडवावासाही वाटत नव्हतं. एखाद्या मुलीला स्पर्श करण्याची शेखरचीही ही पहिलीच वेळ होती. प्रश्न विचारून झाल्यावर तोही एकदम गडबडून गेला पण तोपर्यंत शालिनीने स्वत:ला सावरलं होतं. त्याच्या हातातून आपला दंड सोडवून घेत खाली पडलेली कॉलेजची बॅग उचलून ती कॉलेजच्या दिशेने पळत सुटली. शेखरला वाटलं, आता आणखी एक क्म्प्लेंट आपल्या नावावर जमा होणार. पण तसं झालं नाही.

कॉलेजमध्ये गेल्यावर शालिनीने शेखरची चौकशी केली. शेखरच्या वडिलांचा पब्लिकेशनचा बिझनेस आहे आणि शेखर त्यांचा मुलगा असल्याने त्यालाच हे सर्व मिळणार अशी माहिती मिळाल्यावर तर तिला संध्याकाळी शेखरला भेटण्याची तीव्र ईच्छा झाली. त्या दिवशीच संध्याकाळी तिने शेखरला भेटून आपला होकार कळवला.

तिथून जे त्यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं ते लग्न होऊनच संपलं. प्रेम आंधळं असतं पण आईवडील नाहीत. त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती शालिनीच्या आईवडिलांना मिळताच त्यांनी शेखरची चौकशी केली. शेखरला एक चुलत भाऊ आहे आणि पब्लिकेशनच्या या धंद्यात तोच मुख्य भागीदार आहे; तसेच, शेखरच्या व्यसनी व लफडेबाज स्वभावामुळे त्याला अजूनतरी त्या व्यवसायाची काहीच माहिती नाही, अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी शालिनीचं मन वळविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला होता पण तोपर्यंत तीर सुटला होता.

शेखरवर नको इतका विश्‍वास टाकून शालिनीने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. आता लग्नाशिवाय गत्यंतरच नव्हतं. असा रीतीने शालिनी शेखरची बायको म्हणून या घरात आली होती. तिच्या येण्याने शेखर निदान थोडाफार तरी सुधारेल अशी दिनकररावांना वेडी आशा होती पण शालिनी स्वत:च शेखरच्या एवढी प्रभावाखाली होती की, शेखरचं काही चुकतंय असं तिला वाटतच नसे. तिच्या दॄष्टीने "वडिलांनी पुतण्याएवढंच प्रेम पोटच्या मुलावर केलं असतं, तर तो असा वाया गेला नसता," एव्हढंच खरं होतं. तिची जमेची बाजू इतकीच की सासू म्हणून तिने दिनकररावांच्या पत्नीचा कायम मान राखला.
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment