Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ११

प्रतिक्रिया: 
पान ११


"काका, सॉरी म्हटलं ना, मी. पुन्हा नाही असं करणार मी." देवदत्त अगदी काकुळतीला येऊन काकांची माफी मागत होते.

"असं वचन मला तू कित्येक वेळा दिलयंस देव पण एकदाही तू ते पाळलं नाहीस. काल तर कहरच झाला," दिनकरराव संतापून बोलत होते. देवदत्त ऑफीसमध्ये आल्या आल्या, दिनकररावांनी त्यांना आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतलं होतं.

"मला मान्य आहे काका, मी चुकलो. पण मी तरी काय करू? शारदाला जाऊन आता एक वर्ष उलटून गेलंय पण तिला एक क्षणही विसरणं मला शक्य झालं नाहिये, मी...."


"अरे, पण म्हणून इतकी दारू प्यावी की स्वत:लाही विसरावं?" देवदत्तांचं बोलणं अर्ध्यावरच तोडत दिनकरराव म्हणाले.

देवदत्त फक्त खाली मान घालून गप्प बसले.

"देव, मला कळते रे तुझी व्यथा", दिनकररावांचा स्वर आता किंचित नरम झाला होता, "शारदासारखी गुणी पोर तुझ्या आयुष्यात यावी हे देवालाच पाहावलं नाही म्हणायचं. पण बाळ, आता तू सावरायला हवंस. तुझ्यावरच ह्या व्यवसायाची मदार आहे. आपला विचार नको करुस पण निदान त्या कामगारांचा तरी करशील की नाही रे? तुझी शारदा गेली ह्यात त्यांचा काय दोष? उद्या जर "यज्ञ' बंद पडली तर त्यांनी काय खावं?"

दिनकररावांच्या या वाक्यासरशी, देवदत्तांनी चटकन मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, "खरंच काका, खूप स्वार्थी झालो होतो मी. शारदाच्या जाण्याचं दु:ख माझं आहे, त्याचा इतरांना का त्रास व्हावा? आजपासून मी पुन्हा 'यज्ञ'च्या कामात लक्ष घालत जाईन. इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वत: निर्णय घेईन. शारदा घरात आल्यानंतर 'यज्ञ'ची भरभराटच झाली पण तिच्या जाण्याने 'यज्ञ' बुडाली, तर तिच्याही आत्म्याला क्लेश होत राहातील."

"शाब्बास, आज खूप दिवसांनी माझा देव मला परत मिळाल्यासारखं वाटतंय," दिनकरराव प्रसन्नपणे देवदत्तांचा हात हातात घेत म्हणाले.

त्याचवेळी, दिनकररावांच्या केबीनबाहेर त्यांचं बोलण ऐकत उभा असलेला शेखर मात्र संतापाने हात चोळत होता.
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment