Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ९

प्रतिक्रिया: 
पान ९


"माझी आता एक-तीन तासांनी फ्लाईट आहे, त्यामुळे तयार होऊन मी ड्रायव्हरच्या येण्याचीच वाट पाहात होते. खिटकीतून बाहेर डोकावलं तर हे दिसले. माझ्या अपार्टमेंटला लागून जो रस्ता आहे, तिथे यांची गाडी उभी होती. काहीतरी प्रॉब्लेम असावा गाडीत कारण हे बॉनेट उघडून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न होते . तेवढ्यात, बॉनेट यांच्या हातावर जोरात आदळलं आणि हे कळवळून खाली पडले, तीच जखम आहे ही." देवदत्तांच्या झुलणार्‍या हाताकडे इशारा करत ती स्त्री म्हणाली, "इतर वेळी खरं तर मी खाली गेले नसते पण गाडीच्या बॉनेटचा फटका त्यांना खूप जोरात लागला हे दिसत होतं, म्हणून त्यांना मदत करण्यासाठी खाली आले. मी खाली उतरते न उतरते, तोच ड्रायव्हरही गाडी घेऊन येताना दिसला. मग त्यालाच यांचं पैशाचं पाकिट-बिकिट किंवा त्यांच एखादं व्हिजिटींग कार्ड मिळतंय का, ते शोधायला लावलं. सुदैवाने यांचा पत्ता मिळाला म्हणून त्याच गाडीतून त्यांना इथे आणलं. सरकारी दवाखान्यात नेलं असतं तर..."

"नो, नो ईट्स ऑलराईट," दिनकरराव म्हणाले. "खरंच फार लागलेलं नाहीए त्याला, घरीही उपचार होऊ शकतात. सरकारी दवाखान्यात नेलं असतं तर कदाचित तुम्ही तिथेच अडकला असतात."

ती स्त्री फक्त हसली आणि म्हणाली, "बरं मी निघते. मला उशीर होईल नाहीतर."

"ओह येस, तुमची फ्लाईट आहे नाही का?" दिनकरराव म्हणाले, "माफ करा, इतका वेळ झाला पण मी आपलं नावच विचारलं नाही."

"मोहिनी नटराजन," ती स्त्री म्हणाली.

"मोहिनीजी, थॅंक यू व्हेरी मच आणि पुन्हा जरूर या आमच्या घरी." दिनकरराव म्हणाले, "बाय द वे, तुम्ही राहता कुठे?"

"तुम्हाला ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्स माहितीय?" मोहिनीने विचारले.

"हो, ते नवीनच झालंय", दिनकरराव म्हणाले.

"बरोबर, त्या कॉम्प्लेक्स मधल्या बी विंगच्या फ्लॅट नं. ४०२ मध्ये राहते मी." मोहीनीने उत्तर दिले.

ओह, अच्छा!" दिनकरराव उद्गाराले. "'नटराजन' असूनही मराठी चांगलं बोलता तुम्ही..."

मोहिनी पुन्हा एकदा फक्त हसली आणि म्हणाली, "आता मात्र मला घाई करायला हवी, नाहीतर..."

"हो, हो, या तुम्ही" दिनकरराव हसत म्हणाले आणि मोहिनीला गेटपर्यंत सोडण्यासाठी बाहेर गेले. तिची कार गेटच्या बाहेर निघून जाईपर्यंत ते बाहेरच उभे होते. आत आल्यावर पाहतात तो, हरीने देवदत्तांच्या हातावर मलमपट्टी केली होती. देवदत्त हॉलच्या सोफ्यावर अगदी गाढ झोपी गेले होते.
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

1 comment:

  1. "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी होऊ घातली आहे. आपला सहभाग प्रार्थनीय आहे.
    अधिक माहितीसाठी http://marathi-e-sabha.blogspot.com/ येथे भेट द्या. सहभागी होण्याची इच्छा असल्यास shabdabandha@gmail.com येथे लवकरात लवकर संपर्क साधा.
    धन्यवाद.

    ReplyDelete