Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २५

प्रतिक्रिया: 
पान २५


"खरंच तुम्ही उगाच सांगितलंत, मला लगेच निघायचं होतं," देवदत्त म्हणाले.

"असं कसं? थंड घेतल्याशिवाय मी जाऊनच देणार नाही तुम्हाला." मोहिनी म्हणाली.

"ठिक आहे पण त्यादिवशी आमच्याकडे आल्यावर तुम्हीसुद्धा काही घेतलं नव्हतंत." देवदत्त म्हणाले.

"तेव्हा मी खूप घाईत होते हो, शिवाय ती वेळसुद्धा..." मोहिनीने आपलं वाक्य अर्धवटच सोडून दिलं.

बोलणं ’त्या’ विषयाकडे वळलेलं पाहताच देवदत्त पटकन म्हणाले, "मी इथे तुमचे अभार मानण्याकरताच आलो होतो. त्यादिवशी तुम्ही होतात म्हणून मी घरी सुखरूप पोहोचलॊ. इतक्या रात्री मला माझ्या घरी सोडणं, ही खूप मोठी रिस्क होती तुमच्यासाठी. "

"थँक्स. पण खरंच मी काही विशेष केलं नाही, तुम्ही अनकॉन्शस झाला होतात म्हणून मी पाहायला खाली आले, नाहीतर..." तेवढ्यात सीमा सरबताचे ग्लास घेऊन हॉलमध्ये आली म्हणून मोहिनी बोलायची थांबली. तिने सीमाला विचारलं, "सीमा, सब काम हो गया?"

"जी, मेमसाब." सीमाने उत्तर दिलं.

"तो ठिक है; तुम जा सकती हो और सुनो, कल ठीक दस बजे आ जाना, मुझे ग्यारह बजे रिहर्सल के लिए जाना है."

"ठिक है" म्हणून सीमा निघून गेली.

सीमाने टीपॉयवर ठेवलेल्या सरबतांच्या ग्लासापैकी एक ग्लास मोहिनीने देवदत्तांना दिला व दुसरा आपण घेतला.

देवदत्तांनी सहज विचारलं, "तुम्ही अॅक्ट्रेस आहत का?"

"नाही, डान्सर आहे मी. डान्सचे शोज् करते."

"ओह, आय सी. दॅट्‍स व्हेरी गुड!" देवदत्त उद्गारले.

"थँक्स अगेन..आणि तुम्ही..?" मोहिनीने विचारले.

"मी पब्लिशर आहे. यज्ञ प्रकाशन ही माझी पब्लिकेशन कंपनी आहे," देवदत्तांनी उत्तर दिले.

"अच्छा!" मोहिनीने मान डोलावली.

ज्या कारणामुळे देवदत्तांनी मोहिनीची भेट घेलली, ते कारणच असं होतं की त्या दोघांनाही फ़ार काही बोलता येत नव्हतं. मोहिनीचा निरोप घेऊन तिथून निघून जावं असं देवदत्तांना फ़ार वाटत होतं पण ते प्रशस्त दिसलं नसतं म्हणून ते सरबताचा एक-एक सिप घेत बसून राहिले. मोहिनीही त्यांचंच अनुकरण करत होती. थोडावेळ तिथे विचित्र शांतता पसली.

शेवटी देवदत्तांनीच तोंड उघडलं, "काय....क्लासिकल डान्स करता का तुम्ही?"

"हो," त्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देत ती म्हणाली. "त्या शांततेचा भंग झाल्य़ामुळे तिलाही बरं वाटत होतं. तोच विषय कंटिन्यू करून ती म्हणाली. भरत नाट्यम् चे प्रोफ़ेशनल शोज करते मी. सध्यातरी भारतापुरतेच मर्यादित आहेत पण पुढच्या वर्षीपासून कदाचित मी परदेशीही जाईन.

"अरे वा! फ़ारच छान." बोलायला एक निराळाच विषय मिळाल्यावर, देवदत्तांनीही आपल्याला त्यात रस आहे असं दाखवायला सुरूवात केली.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment