Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २९

प्रतिक्रिया: 
पान २९


"बास, बास, मोहिनी. खूप हसवलंस तू मला. आणखी हसलो तर माझं पोट फ़ुटेल." देवदत्त आपलं हसणं रोखत म्हणाले.

डिनर झाल्यावर मोहिनीशी गप्पा मारण्यासाठी म्हणून देवदत्त हॉटेलच्या टेरेसवर आले होते. डिनर संपवून जेव्हा देवदत्त आपल्या हॉटेलकडे जायला निघाले तेव्हा बारा वाजत आले होते. इतक्या रात्री कुठे एवढ्या लांब जायचं, म्हणून त्यांनी मोहिनी राहात असलेल्या हॉटेलमधलीच रूम एका रात्रीपुरता बुक केली. त्यामुळे ते निवांत होते आणि मोहिनीला त्यांच्यासोबत बोलण्यासाठी भरपूर मोकळा वेळ मिळाला. मागल्या वेळेसारखाच बोलण्याचा लीड मोहिनीकडे आला होता आणि ती एक-एक गमती जमती सांगत देवदत्तांना हसवत होती. तिच्या मोकळ्या स्वभावामुळे त्यांच्यातील परकेपणा आपसूकच गळून पडला. ते आता एक-मेकांना ’अरे-तुरे’ करू लागले होते.

"तू थकत नाहीस का गं?" देवदत्तांनी मोहिनीला विचारलं.

मोहिनी चेहेर्‍यावर प्रश्‍नचिन्ह आणून देवदत्तांकडे पाहू लागल्यावर, देवदत्तांनी लगेच खुलासा केला,"नाही म्हणजे...दोन तासांपूर्वी तुझा शो संपला. आता डिनर झालं तरी तुला अजून झोप येत नाहीये म्हणून म्हटलं."

"खरंतर मला खूप दिवसांनी असं कुणीतरी बोलायला मिळालं. गेल्या कित्येक वर्षांत मी असं कुणाशी बोललेच नाहिये." मोहिनी म्हणाली.

"का? तुझी फ़ॅमिली? त्यादिवशी सुद्धा तू घरी एकटीच..."

"फ़ॅमिली नाही मला," देवदत्तांचं वाक्य तट्‍कन तोडत ती म्हणाली.

देवदत्तांनी पुढे काहीच विचारलं नाही. असतो एखाद्याचा अप्रिय विषय... पण मोहिनीच्याच ते लक्षात आलं, तशी ती म्हणाली, "नाही म्हणजे तशी फ़ॅमिली आहे पण माझ्यासोबत नाहिये ना.."

देवदत्तांनी तो विषय पुढे वाढविला नाही. ते गप्प झालेले पाहून तिनेच त्यांना विचारलं, "...अॅण्ड व्हॉट अबाऊट युवर फ़ॅमिली?"

"त्यादिवशी आली होतीस ना घरी? माझ्या काकांना पाहिलंस? तेच आमच्या घरातील मोठी व्यक्ती आहेत. त्यानंतर काकू, शेखर म्हणजे माझा चुलतभाऊ, त्याची बायको शालिनी, त्यांचा मुलगा सुयोग आणि मी."

"मग शारदा कोण..?" मोहिनीने विचारलं.

तिच्या या प्रश्‍नाने देवदत्तांना एकदम धक्का बसला, "मोहिनीला शारदाचं नाव कुठून माहित पडलं?"

"शारदा माझ्या पत्नीचं..दिवंगत पत्नीचं नाव. सव्वा वर्षापूर्वी ती रोड अॅक्सिडेंटमध्ये गेली."

"ओह, आय अॅम सॉरी. मला माहित नव्हतं."

"मलाही तोच प्रश्‍न पडला की तुला शारदाचं नाव कुठून माहित झालं?"

"तुझ्याचकडून."

"माझ्याकडून? ते कसं? मी आजपर्यंत शारदाचा विषय तुझ्यासमोर काढलेलाच नाही तर.." देवदत्त म्हणाले.

"तुला आठवतं देव, त्यादिवशी मी तुला सोडायला घरी आले होते. मी काय सांगितलं की माझ्या अपार्टमेंटच्या खाली तुझी गाडी बंद पडली होती."

"हं, बरोबर. मला हे दुसर्‍या दिवशी कळलं, आमच्या नोकराकडून.." देवदत्त म्हणाले.

"माझ्याच काय पण आमच्या संपूर्ण सोसायटीच्या प्रत्येक बिल्डींगच्या खाली एक वॉचमन असतो, त्यानेच तुझ्याकडे लक्ष दिलं नसतं का? मला खाली येण्याची काय गरज होती? शिवाय तू सोसायटीच्या मेन गेट्मधून गाडी आत आणायची म्हटलीस, तर तिथेच तुला हटकलं नसतं का गुरख्याने? कसा येणार तू आत?

"अरे, पण मग मी आलो कसा तिथे?" देवदत्त आता बुचकळ्यात पडले होते. शारदाच्या नावाचा रेफ़रन्स बाजूलाच राहिला. ही मुलगी भलतंच काय सांगतेय..
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment