Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ५

प्रतिक्रिया: 
पान ५


...शारदाला जाऊन जवळजवळ दोन महिने होत आले होते पण देवदत्त अजूनही त्या धक्क्यातून सावरले नव्हते. व्यवसायाचा संपूर्ण भार आता देवदत्तांवर होता पण देवदत्त काहीही समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी दिनकररावांनीच देवदत्तांचं काम सांभाळण्यास सुरूवात केली. तीन महिन्यांनंतर देवदत्त पुन्हा आॅफिसला जाऊ लागले. शारादाच्या आठवणी तर आॅफिसातही जागोजागी होत्या. त्याच सुमाराला कधी नव्हे ते शेखराला आपल्या चुलत भावाबद्दल प्रेम दाटून आलं होतं. अलीकडे त्याच्या यज्ञ प्रकाशनमधील फेर्‍या वाढु लागल्या होत्या.

शेखर काय करत आहे याचा नेमका अंदाज दिनकररावांनाही येत नव्हता. कारण शेखर यायचा, दिनकररावांशी बोलून मग देवदत्तांना भेटायला जायचा. तिकडे अर्धा एक तास घालवला की पुन्हा त्याचं आठवडाभर दर्शन व्हायचं नाही.

आधी दिनकररावांना वाटलं की तो पैसे मागण्यासाठी देवदतांना भेटत असावा पण देवदतांनी या गोष्टीचा इन्कार केल्यावर दिनकरराव आणखीनच बुचकळ्यात पडले. मात्र ज्या दिवशी दिनकररावांनी देवदत्तांना पहिल्यांदा दारू पिऊन घरी आलेलं पाहिलं तेव्हा शेखरच्या चालीची त्यांना कल्पना आली.

शेखरला एकटं गाठून त्याला समज देण्याचा प्रयत्न दिनकररावांनी एकदा करून पाहिला पण शेखरने असा काही साळसूदपणाचा आव आणला होता की दिनकरराव फार काही बोलू शकले नाहीत. देवदत्तांना तर वाटत होतं की शारदाच्या जाण्यामुळे, शेखरला आपल्या जबाबदारीची जाणीव झालीय. त्यांनी उलट दिनकररावांनाच समजविण्याचा प्रयत्न केला की, "यापुढे शेखरशी जरा नरमाईने वागायला हवं. जर शेखर खरंच सुधारला असेल, तर त्याला आपल्या बिझनेसमध्ये पार्टनर करून घेऊ." हताश झालेल्या दिनकररावांपुढे योग्य वेळ येईपर्यंत थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हते.


कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment