Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान १०

प्रतिक्रिया: 
पान १०


"आपण इतकी प्यायलो की आपल्याला घरी येण्याचीही शुद्ध राहू नये?" देवदत्त स्वत:शीच विचार करत होते. सकाळी जाग आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की आपण आपल्या बेडरुममध्ये आहोत पण तिथपर्यंत आपण कसे आलो, हे त्यांना काही केल्या आठवत नव्हतं.

"साहेब, लिंबू सरबत," हरीच्या आवाजासरशी देवदत्त भानावर आले. त्याच्या हातातून सरबताचा ग्लास घेत देवदत्तांनी त्याला प्रश्न केला.

"हरी, काल मी किती वाजता घरी आलो?"

"स....साहेब," हरीच्या चाचरण्याने देवदत्त त्याच्यावरच चिडले.

"अरे दारू पिऊन मी आलो होतो, तू नाही. मग कशाला अडखळत बोलतोयस?"

"...साडे तीन वाजता साहेब. एक बाई तुम्हाला स्वत:च्या गाडीमधून घेऊन आल्या होत्या. तुमच्या हाताला खरचटलं होतं, त्याच्यावर औषध लावलेलं होतं. तुम्ही आत येऊन हॉलमध्ये झोपलात, मग मी आणि रघूने तुम्हाला बेडरुममध्ये नेलं," हरीने घडाघडा काल घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला.

"कोण होत्या त्या बाई, काही माहिती आहे का?" देवदत्तांनी विचारलं.

"हो, काकासाहेबांनी त्यांचं नाव-गाव विचारलं होतं. मोहिनी नटराजन नाव आहे त्यांचं आणि त्या ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्समधल्या बी विंगच्या फ्लॅट नं. ४०२ मध्ये राहतात." हरीने माहिती पुरवली.

"ग्रीन टाऊन? बरं. हरी, काका ऑफीसला गेले का?"

"ते तर आज आठ वाजताच गेलेत. तुम्ही उठलात की मला फोन करायला सांगून गेलेत." हरी म्हणला.

काकांनी हरीला फोन का करायला सांगितला असेल ते ओळखून देवदत्त म्हणाले, "नको करुस फोन, मी स्वत:च फोनवर बोलतो त्यंच्याशी. तू जा, माझा ब्रेकफास्ट घेऊन ये."

हरीला खाली पिटाळल्यावर हाताला झालेल्या जखमेकडे बघत देवदत्त पुन्हा विचारात गढून गेले, "ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्सपाशी आपलं काय काम होतं..? आपला रोजचा रस्ता तर वेगळीकडेच आहे..."
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment