Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान १६

प्रतिक्रिया: 
पान १६


शेखरला वाटलं होतं, मुलगा दत्तक द्यायचा म्हटल्यावर शालिनी आकांडतांडव करेल पण कसलं काय? उलट तीच म्हणाली, "हातात पैसा खेळायला हवा असेल, तर ह्याच रस्त्याने जायला हवं." शेखरबरोबरच्या पाच वर्षांच्या संसारात ती पुरती शहाणी झाली होती. पण शारदा त्या दोघांनाही ओळखून बसली होती. जेव्हा जेव्हा शेखर किंवा शालिनी तिच्यासमोर सुयोगला दत्तक देण्याचा विचार काढत, शारदा कामाचे निमित्त करून तिथून निघून तरी जाई किंवा तो विषय पुढे ढकलत असे. शारदासमोर आपली डाळ शिजणार नाही, असे पाहून शेखरने मालतीबाईंना पुढे करायला सुरुवात केली. पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. शारदाला स्वत:चंच मुल हवं होतं.

कितीही नाही म्हटलं तरी शारदाला लहान मुलांचा लळा होता. मग सुयोग त्यातून कसा वगळला जाईल? त्याच्यासाठी जे जे म्हणून करता येईल, ते ते शारदा करीत असे. अर्थातच हे सर्व शेखर, शालिनीच्या अपरोक्ष होतं. लग्नाला पाच वर्षं उलटून गेल्यावरही मुल होण्याची काही चिन्ह दिसेनात, तेव्हा सुयोगला दत्तक घेण्याचा विचार एक-दोनदा तिच्याही मनात तरळून गेला होता, तसं तिने देवद्त्तांशी बोलायचंही ठरवलं होतं पण शेखर आणि शालिनीने पोटच्या मुलालाच कमाईचं साधन बनवलेलं लक्षात आल्यावर, तिला त्या दोघांचीही शिसारी येऊ लागली. बरं, अनाथाश्रमातून मुल दत्तक घ्यावं, तर घरात सुयोगला दत्तक घेण्याचं बोलणं उठसूठ निघतच असे. अशा परिस्थितीत बाहेरच्या मुलाला दत्तक घेणं म्हणजे जाणूनबुजून शेखर, शालिनी आणि मालतीबाई यांना डिवचण्यासारखंच होतं. त्यामुळे या सर्व मन:स्तापापासून दूर राहण्याकरीता ती जास्तीत जास्त वेळ ऑफ़ीसमध्येच काढू लागली. ऑफ़िसचं काम आणि घरी ही अशी परिस्थिती; यातून बाहेर पडण्याचा मार्गच तिला दिसेना.

देवदत्त अगदी शंभर टक्के तिच्या बाजूने असले, तरी त्यांचा बराचसा वेळ ऑफ़िसच्या कामानिमित्त टूरवर जाण्यातच खर्च होत असे. दिनकररावांशी काही बोलावं तर शेखर, शालिनी आणि मालतीबाई हे ’त्यांचं’ कुटूंब होतं. तिच्या आणि देवदत्तांच्या मेडिकल टेस्ट्स, म्हणावं तर पॉझिटीव्ह होत्या, म्हणावं तर निगेटीव्हही होत्या. कधीही मूल होऊ शकतं तर मग मूल होत का नाही? या सर्व विचारांनी शारदाला नैराश्याने घेरलं. थोडी-थोडकी नाही, पुढची पाच वर्षं ती ह्या नैराश्यात वावरत होती. याच नैराश्यातून ती हळूहळू देवाधर्माकडे वळली.

त्या दिवशी, ती अशीच तिच्या व्रताच्या नियमाप्रमाणे देवळात गेली होती. तिथून बाहेर पडता पडता, तिचा मोबाईल वाजला होता. देवळाच्या आवारात नेटवर्क मिळत नाही, म्हणून ती धावतपळत जिथे तिने गाडी पार्क केली होती, तिकडे जाऊ लागली. तिने जेमतेम मोबाईल कानाला लावलाच होता, तोच डाव्या बाजूने येणार्‍या ट्रकच्या हॉर्नच्या कर्कश्श आवाजाने ती दचकली. तिला बाजूला होण्याची उसंतही न देता, तो ट्रक क्षणार्धात तिला तुडवून निघून गेला....
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

2 comments:

  1. अदिती ' ओयासिस ' वाचली. अगदी पूर्ण. कथा. छान आहे. हे छापाच उत्तर नाही. पण तरीही मी खूप खूप वर्षापूर्वी वाचलेल्या योगिनी लेले, कुमुदिनी रांगणेकर यासारख्या पठडीतल्या लेखिकांची आठवण झाली. थोडासा आणखी वेगळपण यायला हवं.

    ReplyDelete
  2. धन्यवाद विजय. ओअॅसिसची मूळ कथा थोडी निराळी होती. तृतीयपंथीय व एक विधुर यांच्या नातेसंबंधावर ती कथा होती, त्यातील तृतीयपंथीय पात्र काढून मी मोहीनीचं पात्र तयार केलं. ब्लॉगवर पहिलीच कथा इतक्या थीट विषयावर लिहावी का, याविषयी साशंक होते म्हणून तसं केलं. पण ब्लॉगला मिळणारा प्रतिसाद पहाता मूळ ओअॅसिस बहुधा ऋणानुबंध या नावाने थोड्या निराळ्या ढंगात प्रकाशित करायचा विचार आहे.

    ReplyDelete