Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २४

प्रतिक्रिया: 
पान २४


देवदत्तांनी आपली गाडी हाय-वे च्या दिशेने वळवली. उजव्या बाजूच्या वळणावरून पुढे जाताना, त्यांना ’ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्स’चा मोठा बोर्ड दिसला. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी गाडी पुन्हा रिव्हर्समध्ये घेतली आणि ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्सच्या दिशेने वळवली. ’बी विंग’ असं लिहिलेल्या बिल्डींगपाशी त्यांनी गाडी उभी केली. त्यांना गाडीतून उतरलेलं पाहताच, बिल्डिंगचा गुरखा आपल्या खुर्चित सरसावून बसला. देवदत्तांनी त्त्याला विचारलं, "वो फ़्लॅट नंबर ४०२ में रहनेवाली नटराजन मॅडम आयी हैं क्या?"

"हाँ साब." गुरख्याने उत्तर दिलं आणि साहेब आता नटराजन मॅडमच्या घरी जाणार हे गॄहित धरून, आपल्या पुढ्यातलं, गेस्ट एंट्री रजिस्टर, त्यांच्या पुढे धरलं.

रजिस्टरमध्ये आपल्या नावाची एंट्री करून देवदत्त लिफ़्टमध्ये शिरले. लिफ़्ट अटेंडंटने चौथ्या माळयावर लिफ़्ट थांबवली. देवदत्तांनी ४०२ असं लिहिलेल्या दरवाजाच्या बाजूची डोअरबेल दाबली. आत कुठेतरी मंजूळ किणकिण ऐकू आली. त्यापाठोपाठ पावलांचा आवाज आला. साखळी लावून अर्धवट उघडलेल्या दारामागून एक बायकी चेहेरा डोकावला, "जी..?"

"मिस मोहिनी नटराजन...?" देवदत्तांनी प्रश्‍नार्थक नाव उच्चारलं.

"मेमसाब सोयी है, आप कौन..?"

"मेरा नाम देवदत्त नाईक है. मुझे आपकी मेमसाब से मिलना था."

तेवढ्यात आतून आवाज आला, "कौन है सीमा?"

दारामागून बोलणार्‍या त्या स्त्रीने आतल्या दिशेने तोंड करून म्हटलं, "जी, एक साहब आपसे मिलना चाह्ते है."

त्या स्त्रीचं बोलून संपलं तोच चट्‍चट्‍ असा सपातांचा आवाज करीत मोहिनी दरवाजाजवळ आली आणि तिने म्हटलं, "सीमा तुम जाऒ," त्यासरशी सीमा नावाची ती स्त्री आत निघून गेली आणि मोहिनीने दरवाजा उघडला.

"तुम्ही मिस मोहिनी नटराजन का?" देवदत्तांनी विचारलं.

"हो, या ना," मोहिनीने स्मितहास्य करीत म्हटलं आणि देवदत्तांनी तिच्या घरात प्रवेश केल. देवदत्तांना बसण्याची खूण तिने म्हटलं, "बसा."

तिने इशारा केलेल्या खुर्चित देवदत्त बसले पण पुढे काय बोलायचं हे त्यांना सुचेना. ते नुसतंच तिच्याकडे पाहून एकदा हसले आणि इकडे-तिकडे पाहात हॉलचं निरिक्षण करू लागले.

तेवढ्यात मोहिनीची नोकराणी सीमा, ट्रे मध्ये पाण्याचा ग्लास घेऊन आली. देवदत्तांनी ’नको’ अशा अर्थाने खूण केल्यावर सीमाने मोहिनीकडे एकदा पाहिलं. मोहिनीने सीमाला तो ग्लास परत घेऊन जायला सांगितला. मग ती देवदत्तांकडे वळून म्हणाली, "काय घेणार तुम्ही, चहा की काही थंड?"

"नाही, नको. मी फ़क्त तुम्हाला भेटायला आलॊ होतो. लगेच निघेन म्हणतॊ," देवदत्त अजूनही अवघडलेल्या मन:स्थितीतच होते.

मोहिनी म्हणाली, "मी असं करते, सीमाला सरबत बनवायला सांगते.." देवदत्त पुढे काहीतरी बोलणार होते पण त्यांना बोलू न देता मोहिनीने सीमाला दोन ग्लास सरबत आणण्याची सूचना केलीसुद्धा!
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment