Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २

प्रतिक्रिया: 
पान २शारदाचं जाणं देवदत्तांच्या मनावर खूप मोठा आघात करून गेलं होतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची धूळ्धाण तर उडालीच होती पण सोबतीने त्यांचं व्यावसायिक स्थैर्यही संपुष्टात आलं होतं. परमेश्वराच्या मर्जीपुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं. नाहीतर, देवदत्त आणि शारदाच्या सुखी संसाराला अशी दॄष्ट लागण्याचं दुसरं काय कारण असु शकतं? नित्यनियमाने देवपूजेला म्हणून बाहेर पडलेल्या शारदेने घराकडे पाठ फिरवली, ती कायमचीच! एका ट्रक ड्रायव्हरची क्षणाची बेफिकिरी देवदत्तांच्या आयूष्यात केवढी मोठी पोकळी निर्माण करून गेली.

शारदा, देवदत्तांची पत्नी. शांत आणि सोज्वळ स्वभावाची ही मुलगी देवदतांच्या आयुष्यात आली , तेव्हा ते ३० वर्षांचे होते. व्यवसायाच्या व्यापात लग्नाचा विचार करण्याच्या मन:स्थितीत देवदत्त नव्हते पण वडिलांच्या जागी असलेल्या काकाने, दिनकररावांनी, देवदतांच्या लग्नासाठी पुढाकार घेऊन शारदेचं स्थळ पसंत केलं होतं. आईवडिलांच्या अकाली मॄत्यूने पोरकं झालेल्या हा मुलीची रवानगी, वयाच्या आठव्या वर्षी अनाथाश्रमात झाली होती. तिथेच ती लहानाची मोठी झाली. शिक्षण संपवून, नोकरीसाठी ती यज्ञ प्रकाशनच्या आॅफीसात मुलाखतीसाठी आलेली असताना तिची व दिनकररावांची भेट झाली होती.

देवदत्तांनी दिनकररावंच्या जोडीने मोठ्या कष्टांनी आणि प्रयासाने उभे केलेले यज्ञ प्रकाशन महाराष्ट्रातील प्रगतीपथावर असलेल्या प्रकाशन कंपन्यांपैकी एक होते. व्यवसायाचा व्याप इतका वाढला होता की देवदत्तांना दर एक दिवसाआड बाहेरगावी जावे लागत असे. उतारवयाकडे वाटचाल करणा-या दिनकररावांना, देवदत्तांच्या अपरोक्ष कंपनीचा भार पेलवणे शक्य नव्हते. शारदेप्रमाणेच देवदतांनीही आईवडिलांच्या अकाली मॄत्यूचं दु:ख वयाच्या चौथ्या वर्षी अनुभवलं होतं. त्यांचं सुदैव, की काका-काकूने त्यांना आईवडिलांची उणीव कधी भासू दिली नाही पण दिनकररावांच्या सख्ख्या मुलाने, शेखरने याचा नेमका उलटा अर्थ लावला होता आणि आपल्यापेक्षा आईबाबा देवचेच जास्त लाड करतात, या समजुतीमधून त्याच्या मनात लहानपणीच देवदतांबद्दल असूया निर्माण झाली होती. देवदत्ताच्या स्वकर्तॄत्वावर मिळालेल्या यशाने तर त्यात आणखीनच भर पडली. एकाच घरात राहूनही, तो आणि देवदत्त एकमेकांशी परक्याप्रमाणे वागत असत.व्यवसायाला मदत करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवताच, त्याने स्वतंत्र व्यवसायाची बोलणी सुरू केली यामुळेच, स्वत:चा व्यवसाय सांभाळण्यासाठी दिनकररावांना परक्या पण विश्वासार्ह व्यक्तीचा शोध घेणे भाग पडले.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment