Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २०

प्रतिक्रिया: 
पान २०


देवदत्तांनी इंटरकॉमवर दिनकररावांच्या एक्स्टेंशनचा नंबर डायल केला.

"हां बोल देव," पलिकडून दिनकररावांचा आवाज आला.

"काका, त्या बाई...... मोहिनी नटराज, ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्समध्येच राहतात ना?"

"कोण मोहिनी नटराजन?"

"च्... काका, अहो असं काय करता? त्या दिवशी रात्री, त्या बाई मला घरी सोडायला आल्या होत्या त्या.. त्यांचं नाव मोहिनी नटराजनच ना?"

"अरे हो, हो. बरोबर. मोहिनी ...मोहिनी नटराजन...हां, हां, काय झालं त्यांचं?...."

"मला एकदा त्यांना भेटायचं होतं. त्या ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्समध्येच राहतात ना....?" देवदत्तने पुन्हा दिनकररावांना प्रश्‍न केला.

"हो. अरे बाबा एकदा त्यांना भेटून ये. तुला घरापर्यंत सोडायला आल्या त्या. इतक्या रात्री एका बाईने असं धाडस करायचं म्हणजे मोठीच गोष्ट रे."

"तेच सांगतोय काका, त्यांच्या घरी जाऊन आलो मी. इनफ़ॅक्ट मी घरापर्यंतही गेलो नाही. बिल्डिंगच्या गुरख्यानेच मला सांगितलं की त्या घरी नाहियेत, बाहेरगावी गेल्यात."

"हो का? त्यादिवशी तुला सोडायला आल्या होत्या, तेव्हा त्या म्हणत होत्या खर्‍या, आत्ता फ़्लाईट आहे, जायचंय. कदाचित त्या दिवशी ज्या गेल्यात, त्या आल्याच नसतील अजून.." दिनकररावांनी अंदाज वर्तवला.

"हं, तसंही असेल कदाचित. तुम्हाला काही फ़ोन नंबर वगैरे दिला होता का त्यांनी....अं...नाही? ठीक आहे. मी पुन्हा चार-पाच दिवसांनी एक चक्कर टाकून पाहीन." देवदत्त म्हणाले आणि त्यांनी इंटरकॉम डिसकनेक्ट केला. तेवढ्यात त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. टेबलावर डोकं ठेवून ते पाच मिनिटं पडून राहिले पण त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. जीव घुसमटतोय, हातपाय कापतायत अशी भावना होऊ लागली होती. केबीनमध्ये असलेल्या छॊट्याश्या फ़्रिजमधली थंड पाण्याची बाटली काढून, त्यांनी ती झट्कन तोंडाला लावली. घशातून गटगट आवाज करत, गार पाणी पोटात जाताना त्यांना फ़ार बरं वाटत होतं. साधारण पाच-एक मिनिटं त्यांना बरं वाटलं असेल तोच त्यांना पोटातून प्रचंड ढवळून आलं. केबीनला अटॅच्ड असलेल्या टॉयलेटमध्ये त्यांनी धाव घेतली आणि बेसिनसमोर ओणवं झाल्याबरोबर त्यांच्या पोटात असेल, नसेल ते सर्व बाहेर पडलं. तोंड धुवून, बेसिनचाच आधार घेत थोडा वेळ ते तिथेच उभे राहिले. मग हळूहळू चालत पुन्हा आपल्या खुर्चित येऊन बसले, त्यांना प्रचंड थकवा आला होता. इंटरकॉमचं बटण दाबून त्यांनी आपल्या सेक्रेटरीला, शोनाला आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतलं आणि म्हणाले, "शोना, आजच्या माझ्या सर्व अपॉईंटमेंट्स कॅन्सल कर. जर फ़ारच काही महत्त्वाचं असेल, तर काकांना अटेंड करायला सांग," बोलतानाही त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता.

"ओ.के. सर. बट आय थिंक यू आर नॉट ऑलराईट, मी डॉक्टरांना बोलावू का?" शोनाने काळजीच्या स्वरात विचारलं. आपल्या बॉसला इतक्या वर्षांत असं आजारी पडताना तिने कधीच पाहिलं नव्हतं.

"नो, नो. मी स्वत:च तिकडे जातोय. ड्रायव्हरला गाडी काढायला सांग आणि हे बघ, काकांना काही सांगू नकोस, ते उगाच काळजी करत राहतील. त्यांनी माझ्याबद्दल विचारलं तर सांग की तुलाही काही माहित नाहीये. जर काकांचा मला फ़ोन आला तर मी पाहून घेईन."

"ओ.के. सर. प्लीज टेक केअर ऑफ़ युवरसेल्फ़."

तिच्या या बोलण्यावर देवदत्तांनी फ़क्त डोळ्याने होकारार्थी खूण करून तिचा निरोप घेतला आणि शोना केबीनबाहेर गेल्यावार त्यांनी आपला लॅपटॉप बंद केला. पुन्हा एकदा गार पाणी प्यावसं त्यांना फ़ार वाटत होतं पण काही वेळापूर्वीचा प्रसंग आठवून त्यांनी फ़्रिजमधून काढलेली बाटली पुन्हा आत ठेवली. टेबलावरचे काही महत्त्वाचे कागदपत्र आपल्या ब्रिफ़केसमध्ये सारले आणि ब्रिफ़केस बंद करून ते बाहेर पडले.

ऑफ़िसच्या बाहेर ड्रायव्हर त्यांच्या येण्याचीच वाट पाहत होता. मागच्या सीटवर बसून, दरवाजा ओढून ते म्हणाले, "डॉक्टर बर्व्यांकडे घे."ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment