Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान २२

प्रतिक्रिया: 
पान २२


ऑफ़िसला न जाता घरी आराम करणे, हे देवदत्तांच्या स्वभावातच नव्हतं पण गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ त्यांचं ऑफ़िसकडे दुर्लक्ष झालं होतं खरं. आता मात्र निराळ्याच कारणासाठी त्यांनी आठवडाभर घरी राहायचं ठरवलं होतं. दिनकररावही त्यांना काहीच बोलले नाहीत. देवदत्त कोणत्या कारणासाठी घरी राहात आहेत, याची त्यांना अंधुकशी कल्पना होती. डॉ. बर्व्यांना भेटून आल्यावर आपण आठवड्याभराच्या रजेवर जात असल्याचं त्यांनी ऑफ़िसमध्ये डिक्लेअर केलं आणि शेखरला आगीत तेल ओतल्यासारखं झालं, "आता हा माणूस पूर्ण शुद्धित, आठवडाभर घरी राहणार म्हणजे घरातही जपूनच वागायला हवं," पण चडफ़डण्याव्यतिरिक्त सध्यातरी शेखर दुसरं काहीच करू शकत नव्हता.

देवदत्तांच्या रजेचा तो दुसराच दिवस होता आणि ते घरात राहून अगदी कंटाळले होते. काही काम नाही, टि.व्ही. तरी किती पाहणार, सुयोगशी खेळावं तर त्याची परिक्षा सुरू होती म्हणून तोही अभ्यासात गर्क. मोबाईल तर त्यांनी बंदच करून ठेवला होता. सरळ एक झोप काढावी म्हणून ते बेडवर आडवे झाले. उजव्या कुशीवर वळताक्षणी ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला शारदाचा फ़ोटो त्यांच्या दॄष्टीस पडला आणि टिपकागदाने जशी शाई शोषून घ्यावी तशा शारदाच्या एक-एक आठवणी त्यांच्या मनात गर्दी करू लागल्य़ा. ते विचार डोक्यातून काढून टाकावेत म्हणून देवदत्त डाव्या कुशीवर वळले तर आपल्या बाजूची शारदाची रिकामी जागा पाहून त्यांचं मन आपोआपच भूतकाळात गेलं.....

....त्यांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस होता तो....

देवदत्तांनी शारदाला मिठीत घेऊन हलकेच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकत तिला विचारलं, "बोल, तुला काय गिफ़्ट हवं?"

"गिफ़्ट काय असं मागून घ्यायचं असतं का?"

"अगं पण तुला काय हवंय हे मला कसं कळणार, तु सांगितल्याशिवाय?"

"काही गोष्टी न सांगताच समजून घ्यायच्या असतात, मिस्टर.." शारदाने डोळे बारीक करत, मान डोलावून चिडवून म्हटले.

"ए, मी मनकवडा वगैरे नाही. तुला काय हवंय हे जर मला तू सांगितलं नाहीस, तर मी मला हवं ते घेऊन येईन आणि मग ते तुला घ्यावं लागेल."

शारदा एकटक त्यांच्याकडे पाहात म्हणाली, "मला काही नकोय, देव. तुम्ही असताना मला कशाचीच कमतरता नाही. मला फ़क्त एक बाळ हवं आहे....आपलं."

"अरे व्वा, मला तर वाटलं होतं की बाकीच्या मॉड बायकांसारखीच तूही प्लॅनिंग-बिनिंगचा विचार करत होतीस की काय?

"तसं असतं, तर ते इतके महिने तुमच्यापासून लपून राहिलं असतं का?"

"अगं तुम्ही बायका, काय काय रहस्य़ दडवून ठेवता ती पुरूषांना कधी कळतात का?" देवदत्तांना शारदाची गंमत करण्याची लहर आली होती.

"काहितरी बोलू नका. माझ्याकडे नाहीत अशी काही रहस्यं दडवायला, तुमच्यापासून मी आजपर्यंत काहीच लपवलेलं नाही." शारदा खोट्या रागाने म्हणाली.

"नाही कसं? एक गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. मला माहीत आहे....." देवदत्त एकदम गंभीर होऊन बोलत होते.

"कोणती गोष्ट? काय लपवलं मी?" शारदा मनापासून विचारत होती.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment