Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ३१

प्रतिक्रिया: 
पान ३१


"लग्न झाल्यापासून ऑफ़िसच्या कामात मी शारदाला इतकं इन्वॉल्व्ह करून घेतलं की एक स्त्री म्हणून तिच्या गरजा, आवडी-निवडी यांच्याकडे माझं कधी लक्षच गेलं नाही. अक्षरश: मला समर्पित झाल्यासारखी ती काम करायची पण स्वत:च्या आवडीनिवडींचा चुकूनसुद्धा उल्लेख नाही केला तिने. वेळ मिळाला तर, कधी कधी ती पेंटिंग करायची. फ़ार सुरेख पेंटींग्ज काढायची ती! पण अमूक पेंटिंग छान आहे, असं तिला सांगायचं राहूनच गेलं गं! ’जनरल मॅनेजर’ म्हणून आमचा बिझनेस तिने ज्या कौशल्याने सांभाळला, त्याचं कौतुक करताना शारदाच्या आतील स्त्रीवर मी अन्याय केला, असं वाटतंय."

देवदत्तांचा स्वर आता हळवा झाला होता. ते पुढे म्हणाले, "लग्न झालं की एका विशिष्ट वेळेनंतर, प्रत्येक स्त्रीला आई व्हावंसं वाटतं. "आपलं बाळ कधी येईल", याचा कधी कधी ती एकटीच विचार करत बसायची तेव्हा तिला विचारांतून बाहेर काढण्यापलिकडे, तिची मन:स्थिती समजून घेण्याचा मी कधी प्रयत्नच केला नाही. ती खूपच हट्ट करायला लागली, तेव्हा मूल होण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न केले. शारदा स्वत: तर देवधर्माचंही बरंच करायची पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.. ज्या दिवशी ठरवलं की शारदाला सांगायचं, " आता थांबव हे सगळं. आपण दोघे काही दिवस बाहेर जाऊन येऊ. फ़क्त आपण दोघं...त्याच दिवशी..." देवदत्तांच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं.

मोहिनीला देवदत्तांच्या डोळ्यांतील खंत स्पष्ट दिसत होती. ती काही बोलली नाही. ती फ़क्त ऐकत होती.

एक सुस्कारा सोडून देवदत्त म्हणाले, "माझी शारदा खूपच समजुतदार होती पण बिझनेसकडे लक्ष देण्याच्या नादात मी माझ्या शारदाला गमावून बसलो."

"ही अपराधीपणाची भावना तुझ्या मनात आहे म्हणून तू ड्रिंक्स घेतोस?" मोहिनीने शांतपणे विचारलं.

"हो... म्हणजे... घेत होतो", खाली मान घालत देवदत्त म्हणाले, "शारदा गेल्यानंतर सर्व भकास वाटायला लागलं होतं. मध्येच केव्हातरी तिचा भास व्हायचा आणि ती या जगात नाहीये, हे लक्षात आलं की आतून एकदम रिकामं रिकामं वाटायचं. ह्या फ़िलिंगपासून कशी सुटका करून घ्यावी तेच समजत नव्हतं, तेव्हा शेखरच्या आग्रहावरून मी एक-दोनदा ड्रिंक घेतलं. ते पोटात गेलं की एकदम निर्धास्त असल्यासारखं वाटायचं. नंतर त्याची सवय कधी झाली ते समजलंच नाही. त्या दिवशी तू घरी आली होतीस, तो माझा शेवटचा दिवस ड्रिंक्स घेण्याचा. त्याच्या दुसर्‍या्च दिवशी मी काकांना शब्द दिला की यापुढे ते सर्व करणार नाही म्हणून."

"व्हेरी गुड, पण जर आता तुला शारदाची आठवण आली तर तू काय करतोस?"

देवदत्त खेदाने हसले, "काय करणार? कधी कधी तिचा फ़ोटो न्याहाळतो. आमच्या लग्नाचा अल्बम पाहातो."

"...आणि हा शेखर म्हणजे, तुझा तो चुलतभाऊच ना?"

"हो."

"व्वा! भावाला धिर द्‍यायचा सोडून त्याला खड्ड्यातच ढकलायला निघालाय हा!" मोहिनी उपहासाने म्हणाली.

"त्यात त्याची काही चूक नाही, मोहिनी. तो मला काही जबरदस्तीने बारमध्ये घेऊन गेला नव्हता. खरंतर त्याचे आणि माझे संबंध लहानपणापासूनच थोडे ताणलेले होते. एकाच घरात राहूनही आम्ही एकमेकांना परके होतो. अशा परिस्थितीत तो स्वत:हून माझ्याजवळ येऊन माझी विचारपूस करत असेल, तर त्याला झटकणं योग्य दिसतं का?" देवदत्तांनी विचारलं.

देवदत्तांच्या या बोलण्यावर मोहिनी फ़क्त हुंकारली.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment