Friday, April 24, 2015

चोरी का करावी?

प्रतिक्रिया: 
दुसर्‍या व्यक्तीचा लेख आपण जर शेअर केला, तर त्यात मूळ लेखकाचं नाव लपवण्यासारखं लाजिरवाणं काय असतं? लेख पटलेला असतो, आवडलेला असतो म्हणूनच शेअर केलेला असतो ना? मग मूळ लेखकाच्या नावाचे दोन शब्द लेखाच्या खाली लिहून आपला सुसंस्कृतपणा दाखवण्यात आपण कमीपणा का करायचा?

एखादा लेख आधी बर्‍याच ठिकाणी शेअर केला गेलेला असेल, तर "इंटरनेटवरून साभार" असं लिहिलं तरी चालतं. काही लेख तर इंटरनेटवर सर्च करूनदेखील एकापेक्षा अनेक साईट किंवा ब्लॉग वर दिसत नाहीत. म्हणजे तो लेख त्या अमूक ब्लॉगवरूनच आपण उचलला आहे, हे उघड असतं. तरीदेखील लेखकाचं नाव लवपवण्याचा असंस्कृतपणा का करायचा? कळस म्हणून त्या लेखावर आपल्याला लेखक समजून आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांनादेखील आपणच लेखक असल्याचा थाटात उत्तर द्यायची?

स्वत:चा नसलेला आणि दुस-याने लिहिलेला लेख खूप आवडला म्हणून आपण कितीही आपल्या नावावर खपवला किंवा लेखकाचं नाव न देता प्रकाशित केला तरी त्यातून आपण वाचकांना फसवत नसतो, तर स्वत:ला फसवत असतो. इतरांच्या लेखन प्रतिभेमुळे स्वत:ला आलेल्या न्यूनगंडाच्या भावनेचा सूड उगवण्याचा तो एक क्षीण प्रयत्न असतो.

आपल्या असंस्कृतपणावर आपणच केलेलं शिक्कामोर्तब असतं ते!

अनेक लेखक आहेत, ज्यांच्यासाठी पैसा महत्त्वाचा नसतो. परवानगी मागितली तर "घेऊन जा लेख", असं म्हणून आपल्यालाच शुभेच्छा देतात. त्यांच्या लेखनावर स्वत:साठी पैसा कमावताना त्यातील एक चतुर्थांश रकमेची रॉयल्टी लेखकाला द्यावी, असा उदार विचार आपल्या मनाला कधीही शिवत नाही पण स्वत:ला पैसा कमावता यावा म्हणून आपण मात्र त्यांचे लेख न विचारताच उचलायचे आणि वर त्यांच्या लेखन प्रतिभेचं श्रेयदेखील लाटायचं, हे कुठल्या संस्कृतीत बसतं? मला नाही वाटत ह्या जगात कुठलेही आईवडिल आपल्या मुलांना चोरी करण्याचे संस्कार देत असतील. मग असं का घडतं?

स्वत:चा फायदा करून घेता यावा म्हणून आपण नीतीमूल्यांना पायदळी तुडवत असतो का?
कि आपल्या जीवनात इतकं नैराश्य भरून उरलंय की समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं थोडफार नुकसान झाल्याशिवाय आनंद असा आपल्याला होऊच नये?

आपला लेख किंवा कविता चोरीला गेली आहे, ह्या गोष्टीचा लेखकाला राग कमी पण दु:ख जास्त असतं. कारण ते लेखन त्याच्यासाठी अपत्यासमान असतं. आपण रोज चोर्‍या करून काही लोकांना दु:खी करायचं व त्या प्रसंगातून मिळणारा आसूरी आनंद उपभोगायचा, यातून आपली मनोवृत्ती स्पष्ट होते. आसूरी आनंद हेच एक आपल्या जीवनाचं एकमेव लक्ष्य असेल तर आपल्याला मानसिक उपचारांची नितांत गरज आहे आणि ते वेळेवर घेतले गेले नाहीत, तर आपलं कर्मच आपल्याला दुर्दैवाच्या दाराशी नेऊन सोडतं, यात तीळमात्र शंका नाही.

-कांचन कराई
मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग
मोगराफुलला.COM

3 comments:

  1. माझ्यामते दोनच कारणे असू शकतात... एक तर स्वार्थ साधण्यासाठी किंवा नाकर्तेपणा लपवण्यासाठी याशिवाय अश्या गोष्टींकडे कोणी सहसा वळत नाही :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. फायदा जरूर करून घ्यावा. पण समोरच्या माणसाला फसवूनच आपला फायदा करून घेता येतो, असं ज्याला वाटतं त्याला आईवडिलांनी केलेले संस्कार कमी पडलेले असतात असं म्हणायला हरकत नाही.

      Delete