Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ४

प्रतिक्रिया: 
पान ४सर्व उपाय थकले की मनुष्य देवाच्या दारी धाव घेतो. शारदाही शेवटी माणूस होती. १० वर्षं अपत्यप्राप्तीसाठी निरनिराळे वैद्यकीय उपाय केल्यावर मुलासाठी तिने देवधर्माचा मार्ग चोखाळावा यात काही विशेष नव्हतं. तिच्या प्रेमाखातर देवदत्तांनी याही गोष्टीला मान्यता दिली होती पण मूल होण्यासाठी हे सर्व करणं त्यांना मनापासून पसंत नव्हतं. रोज संध्याकाळी देवळात जाऊन देवीला १०८ प्रदक्षिणा घातल्या व एक वेळ जेवलं तर वर्षभरात अपत्यप्राप्ती होईल, असं कुणा विभुतीच्या सांगण्यावरून शारदा रोज न चुकता देवळात जात असे. उपासाचा परिणाम तिच्या प्रकॄतीवरही झाला होता. मात्र तिचा निर्धार कायम होता.

मुलासाठी असे प्रयत्न करण्यापेक्षा आपण मूल दत्तक घेऊ, असं देवदत्तांनी शारदाला वारंवार सुचवलं होतं पण शारदा मात्र देवदतांपासूनच मूल हवं हा हट्ट धरून बसली होती. तिच्यासारख्या सुशिक्षित स्त्रीने असा विचार करावा हे देवदत्तांना पटलेलं नसलं तरी या बाबतीत तिच्यापुढे देवदत्तांचं काही चालत नसे.

दिनकररावांसारख्या सज्जन माणसाचा मुलगा असूनही शेखरने त्यांच्यातला एकही गुण उचलला नव्हता. व्यवसायात मदत तर लांबच राहिली पण नवीन धंदा सुरू करण्याच्या नावाखाली, बापाकडून मिळणार्‍या पैशावर चैन करत, जमतील तितकी व्यसने त्याने स्वत:ला लावून घेतली होती. त्याच्या लग्नानंतर तरी तो सुधारेल, असे दिनकररावांना वाटले होते पण त्यांच्या आशेचा तोही किरण मावळला होता. त्याचं उदाहरण देऊन दिनकरराव आणि त्यांच्या पत्नीनेही शारदाचं मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला की, "स्वत:च्या रक्ताचं मूल असलं, म्हणजेच सद्गुणी निपजतं, असं नाही काही," पण शारदा ठाम होती. तिची समजूत काढायला आता काळ हेच सर्वोत्तम औषध आहे, असं मानून शेवटी तेही गप्प बसले होते.

"आज शारदाच्या व्रताचा शेवटचा दिवस. संध्याकाळी उद्यापन झालं की तिला सांगायचं,..." देवदत्तांच्या विचारांची तंद्री भंग पावली ती फोनच्या रिंगने. फोनवर त्यांनी जे काही ऐकलं ते त्यांना बाहेर धाव घेण्यासाठी पुरेसं होतं...
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment