Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान १२

प्रतिक्रिया: 
पान १२


"स्साला," हाताताला ग्लास दाणकन टी-पॉयवर आपटात शेखर म्हणाला. "कितीही चांगलं वागून दाखवा, कितीही गोड बोला, आमच्या म्हाता-याला तो देवदत्तच जवळचा वाटणार. तो दारू प्यायला तर ते अमॄत आणि मी काय..."

"शांत हो , शांत हो . तुझा राग मलाही कळतो पण त्याचा काही उपयोग आहे का? तुच म्हणतोस ना, की लहानपणापासून बाबांना भाउजींचीच जास्त ओढ होती म्हणून.. ," शालिनी म्हणाली.

शालिनी, शेखरची बायको. शेखर व्यसनी आहे, हे माहीत असूनही त्याच्याशी प्रेमविवाह करण्याचा वेडेपणा केला होता तिने. तिची आणि शेखरची भेट कॉलेजमध्ये झाली. शालिनीने, दोन-तीन वेळा कॉलेजच्या प्रिंसिपलकडे शेखरची तक्रारही केली होती. शेखर तिच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर रोज तिला छेडत असे. खरं तर शेखरला ती आवडली होती पण त्याचा अॅप्रोच चुकला होता. त्याचं तिच्याकडे रोखून पाहणं, कमेंट्स टाकणं हे तिला मवालीपणाची लक्षणं वाटत होतं.

एकदा अशीच एक तक्रार कॉलेजच्या प्रिंसिपलकडून दिनकररावांपर्यंत गेली होती. दिनकररावांनी त्यावरून शेखरला घरातून बाहेरही काढले होते. पण शेखरने आपले उद्योग सुरुच ठेवले. घरापर्यंत गेलेल्या तक्रारीचा जाब विचारण्यासाठी तो शालिनीचा रस्ता अडवून उभा होता. शालिनीला काय करावं ते सुचत नव्हतं. पण म्हणतात ना, कोप-यात सापडला, तर उंदीरही फिस्कारतो. शेवटी तिनेच पुढाकार घेऊन धीटपणे त्याला विचारलं, "रोज मला छेडून तुला काय मिळणार आहे? लग्न करण्याएवढी तुझ्यात हिंमत नाही. मग तुझ्यात आणि बाकी मवाल्यांच्यात फरक तो काय? तुझी मी तक्रार केली तर काय बिघडलं?"

बस्स! हे शब्द शेखरच्या जिव्हारी लागले. ही मुलगी आपल्याला मवाली समजते? हिच्यासाठी आपण रोज सकाळ-संध्याकाळ इथे येऊन उभं राहतो आणि ही...

त्याने खसकन् तिचा दंड धरून आपल्याकडे ओढलं आणि विचारलं, "माझ्याशी लग्न करण्याची तुझी तयारी असेल तर सांग."
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment