Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ८

प्रतिक्रिया: 
पान ८


त्यांची कार बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडत असतानाच, समोरून येणार्‍या गाडीच्या हेडलाईटने ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या हरीचे डोळे दिपले. त्या गाडीचे हेडलाईट खाली झाले आणि दिनकरराव व हरीने ओळखले की ती कार आपल्याच बंगल्याच्या दिशेने येत आहे. आपली कार रिव्हर्समध्ये घेऊन हरीने ती पुन्हा गॅरेजमध्ये लावली. समोरून येणारी ती कार बंगल्याच्या उघड्या गेटमधून आत आली व पोर्चमध्ये येऊन थांबली. तसे दिनकरराव आपल्या गाडीमधून उतरून त्या कारच्या दिशेने गेले.

रात्रीच्या यावेळेला निराळीच गाडी बंगल्याच्या दाराशी पाहून दिनकरराव हवालदिल झाले. देवदत्तांबदलच्या नसत्या शंका कुशंकांनी त्यांना एका क्षणात घेरलं. त्यांनी पुढे काही बोलायाच्या आधीच एक व्यक्ती गाडीतून बाहेर आली. ती एक स्त्री होती.

"मिस्टर देवदत्त नाईकांचा बंगला हाच ना?" त्या स्त्रीने दिनकरराव आणि हरी या दोघांच्या आळीपाळीने पाहात विचारले.

"अं ..हो," दिनकरराव उत्तरले.

"मिस्टर नाईकांना इथे मागच्या सीटवर झोपवलंय, थोडंसं लागलंय त्यांना पण ते ठीक आहेत," ती व्यक्ती म्हणाली आणि तिने कारचा मागचा दरवाजा उघडला. दिनकररवांनी हरीला खूण केली, तसा हरी पटकन पुढे आला व त्याने आणि दिनकररावांनी देवदत्तांना उचलून दिवाणखान्यातील सोफ्यावर आणून झोपवले. ती स्त्रीही त्यांच्या पाठोपाठ दिवाणखन्यात आली. देवदत्त दारूच्या नशेमध्येच होते. मध्येच कण्हत होते, काहीतरी बरळत होते.

थॅंक्यू व्हेरी मच. प्लीज बसा. मी हरीला चहा करायला सांगतो तुमच्यासाठी", दिनकरराव म्हणाले.

"ईट्स ओ.के. फॉरमॅलिटीज करू नका. तुम्ही मिस्टर नाईकांची काळजी घ्या. तसं फारसं लागलं नाहीए त्यांना पण तुम्ही डॉक्टरांना दाखवलेलं बरं." ती स्त्री म्हणाली.

"हो, हो. ते आम्ही करूच पण कुठे सापडले तुम्हाला हे?" दिनकररावांनी त्या स्त्रीला विचारले.
कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment