Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ३९

प्रतिक्रिया: 
पान ३९


"फ़ॉर गॉड्स सेक, मोहिनी....मैत्रीला काय लेबल लावायचं, ते आपण नंतर बघू. आधी काय झालंय ते सांगशील का? ." देवदत्तांनी मोहिनीला म्हटलं.

मोहिनी आपल्या जागेवरून उठली आणि आपल्या बेडरुममध्ये जाऊन एक जाडजूड आल्बम घेऊन आली. तो आल्बम तिने देवदत्तांच्या हातात दिला आणि म्हणाली, "माझ्या फ़ॅमिलीबद्दल मी तुला कधी सांगितलंच नाही ना?"

तिच्याकडे पाहात देवदत्तांनी आल्बमचं पहिलं पान उघडलं...त्यानंतर किंचित पारदर्शक असलेल्या कागदाचं आवरण त्यांनी उलटवलं आणि पहिलाच फ़ोटो पाहून त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलले. त्यांनी मोहिनीला विचारलं, "मोहिनी, तु.. तुझं लग्न झालंय?"

"हो."

"मग लग्नाचा उल्लेख तु कधी केला नाहीस?"

डोळ्यात आलेलं पाणी मोठ्या कष्टाने परतवत मोहिनी म्हणाली, "कारण माझ्या नवर्‍याची ओळख तुझ्याशी कधीच करून देता आली नसती. पाच वर्षांपूर्वी, याच दिवशी मी माझा नवरा आणि माझं बाळ यांना गमावून बसले आहे."

देवदत्तांनी हैराण होत मोहिनीकडे पाहीलं. ती देवदत्तांना आल्बमचं एक-एक पान उलटवून देत होती आणि त्या प्रत्येक पानाबरोबर तिचं आयुष्य देवदत्तांसमोर उलगडत होतं.

....मोहिनी महाराष्ट्रीयन आणि दीपक दक्षिण भारतीय. यांचा प्रेमविवाह त्या दोघांच्याही घरच्यांना मान्य नसता झाला, म्हणून दोघांनीही पळून जाऊन लग्न केलेलं. दीपकच्या आईवडिलांनी त्यांना घरात घेतलं नाही. मोहिनीच्या वडीलांनी तिच्या नावाने आंघोळ करून ती आपल्याला मेल्याचं जाहिर केलं. शेवटी दोघांनी वेगळा संसार थाटला. लग्नाचे सुरुवातीचे सहा महिने दोघंही आनंदाच्या हिंदोळ्यावर होती. एके दिवशी बातमी आली की दीपकच्या वडिलांना हॄदयविकाराने मॄत्यू आला. काहीही कारण नसताना दीपकच्या आईने या घटनेचं खापर मोहिनीच्या माथी फ़ोडलं, की मोहिनीच्या पायगुणामुळेच हे सर्व झालं. दीपकने आईला समजाविण्याचा बराच प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. वडिलांची हाय खात एके दिवशी दीपकची आईसुद्धा गेली. यावेळी दीपकच्या इतर नातेवाईकांनीही मोहिनीलाच दोषी ठरवलं. दीपकच्या भक्कम पाठबळामुळे मोहिनीने ते फ़ारसं मनावर घेतलं नाही.

या घटनेला दोन-तीन महिने झाले असतील तोच, मोहिनीला ती आई होणार असल्याची बातमी कळली. निदान या बातमीने तरी दिपकच्या दु:खी चेहेर्‍यावर आपण हसू आणू शकू या विश्‍वासाने मोहिनी संध्याकाळी उत्साहाने दिपकची वाट पाहात होती. डोअरबेल वाजली तर तिला वाटलं दिपकच आला. तिने दार उघडलं तर दारात एक पोलिस कॉन्स्टेबल उभा होता. त्याच्या हातात दिपकने आज सकाळी जाताना घातलेला शर्ट होता आणि तो पोलिस कॉन्स्टेबल विचारत होता, "मिसेस मोहिनी नटराजन तुम्हीच का?"

पुढचं सर्व ऐकेपर्यंत मोहिनी केव्हा भोवळ येऊन पडली ते तिलाही समजलं नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिची कूस रिकामी झाली होती आणि कपाळही.....!

"त्याला शेवटचं पाहताही नाही आलं रे मला...." मोहिनी कळवळून म्हणाली.

....देवदत्त अजूनही तिच्याकडे पाहात बसले होते. काय बोलावं हे त्यांना सुचत नव्हतं. जी स्त्री आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सर्व काही जाणते, जिच्या सहवासात आपण आपलं दु:ख विसरलो, तिच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसावी याचं देवदत्तांना दु:ख होत होतं.

मोहिनी अजूनही पुढे सांगतच होती, "मग त्यानंतर त्या घरात राहाणं मला खूप जड गेलं. आई-वडील एक दोनदा येऊन गेले पण त्यांच्यासोबत राहणं मला नको होतं. मी जवळपास सर्वांशीच संबंध तोडले होते. नाही म्हणायला माझ्या भरतनाट्यमच्या गुरू रजनीदिदी मला भेटायला कधीतरी घरी यायच्या. त्यांच्याच सल्ल्यावरून मी ते शहर सोडलं. इथे आले. रजनीदिदींची बहिण रंजनादेवी इथे राहते. रजनीदिदींनी रंजनादेवींकडे माझ्या राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्याच डान्स अकॅडमीमध्ये मी असिस्टंट डान्स टिचर म्हणून काम पाहायला सुरुवात केली. तिथे दिवस कसातरी निघून जायचा पण रात्री दिपकच्या आठवणींनी मन बेचैन व्हायचं."

"एकदा डान्स अकॅडमीच्या एका स्टेज परफ़ॉर्मन्समध्ये मी नाचत असताना, अचानक माझ्या पायातील घुंगरू तुटले पण मी नॄत्य सुरू ठेवलं, तशी शिकवणच होती आम्हाला. शो संपल्यावर रंजनादेवी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, "आपलं आयुष्यही असंच असतं बेटा. हे घुंगरू म्हणजे आपल्या आयुष्यातील सुखाचे क्षण. कधी ते कायम आपल्यासोबत असतात, तर कधी आपल्यालाच त्यांना मागे सोडाणं भाग पडतं पण तरीही आपल्या आयुष्याचं नॄत्य ह्या घुंगरांसोबत किंवा घुंगरांशिवाय हे आपल्याला सुरू ठेवावंच लागतं, नाही का?"

"त्यादिवशी ठरवलं देव, दिपकच्या जाण्याचं दु:ख नाही करत बसायचं. कितीतरी चांगले क्षण आम्ही एकत्र घालवलेत. त्या आठवणी मला आयुष्यभर पुरतील. आता पाच वर्षं झाली ह्या घटनेला....पण कधीतरी असा एखादा हळवा क्षण येतो, तेव्हा नाही राहावत. असं वाटतं की आत्ता, ह्या क्षणी तो इथे असायला हवा होता....."

देवदत्तांनी आल्बम बंद करून बाजूला ठेवला आणि मोहिनीच्या जवळ जात तिचे अश्रू पुसून त्यांनी तिच्या डोकयावरून हात फ़िरवला आणि म्हणाले, "वेडी, हे सांगायला इतके दिवस कचरत होतीस तू? तुला काय वाटलं? देवला आपल्याबद्दल सहानुभूती वाटेल? मग तो आपला मित्र राहणार नाही...कदाचित तो स्वार्थी बनेल.....आपला गैरफ़ायदा घेईल.... हं?.... असं वाटत होतं ना?

मोहिनीने खाली घातलेली मान एकदम वर केली आणि म्हणाली, "तसे अनुभव मी घेतले आहेत, देव. दिपक गेल्यावर त्याचे मित्र, माझेही काही मित्र, "मी आहे ना" अशी सहानुभूती दाखवत जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. ते शहर सोडण्यासाठी हेही एक कारण होतं.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

No comments:

Post a Comment