Sunday, April 12, 2015

ओअॅसिस - पान ४०

प्रतिक्रिया: 
पान ४०


"मी समजू शकतो. असेही महाभाग आहेत या जगात. पण मोहिनी, आज हे सर्व समजल्यावर मला तुझ्याबद्दल असलेला आदर आणखीनच वाढला आहे. इतकं मोठं दु:ख पचवून स्वत:च्या पायावर उभं राहायचं आणि जगायचं!....खूप जिद्दी आहेस तू! एक मैत्रीण म्हणून मला तुझा अभिमान तर वाटतोच पण एक स्त्री म्हणून मला तुझं कौतुक करावंसं वाटतं." देवदत्त म्हणाले.

"अरे, काय बोलतोयंस?"

"खरंच मोहिनी, तु जे सांगितलंस, ते ऐकणं खूप सोपं आहे पण त्या अनुभवातून प्रत्यक्ष जाणं फ़ार कठीण!"

"तुला एक विचारू मोहिनी? राग नाही येणार ना?" देवदत्त म्हणाले.

"विचार ना!"

"तुला कधी माझी भिती नाही वाटली. म्हणजे तू मला पहिल्यांदा पाहिलंस तेव्हा तर मी शुद्धीतही नव्हतो.."

"देव, प्रत्येक दारू पिणारा माणूस वाईट असलाच पाहिजे का?...आणि वाईट माणसं निर्व्यसनी असू शकत नाहीत का? मला तुझ्या नजरेत कधीच पाप आढळलं नाही देव. इतकं माझ्यासाठी पुरेसं आहे."

देवदत्त तिच्याकडे पाहून हसले.

मोहिनी आता ती बरीच सावरलेली होती. तिने देवदत्तांना विचारलं, "अरे, पण तु आज अचानक कसा काय आलास?"

देवदत्तांनी मोहिनीला सुयोगच्या वाढदिवसाला येण्याचं आमंत्रण दिलं. थोडावेळ मोहिनीसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा करून, तिच्या हातचा चहा घेऊन, ती आता व्यवस्थित सावरल्याची खात्री पटल्यावरच, ते तिच्या घरातून बाहेर पडले.

सुयोगच्या वाढदिवशी देवदत्तांनी मोहिनीची त्यांच्या घरातल्या सर्वांशी तिची ओळख करून दिली. सुयोगशी तर तिचं पटकन सूत जुळलं. त्याच दिवशी देवदत्तांनी सर्वांसमोर जाहिर केलं की शेखर उद्या ’यज्ञ’चा फ़िफ़्टी परसेंट पार्टनर होणार आहे.

दुसर्‍या दिवशी करारावर सही करण्याआधी देवदत्तांनी आपल्या हाताने शेखरला ब्लेझर चढवला आणि म्हणाले, "शेखर, हा नुसता बिझनेस मिटींग्सना वापरण्याचा ब्लेझर नाही. ही एक जबाबदारी आहे, जी तुला आता कायम पेलायचीय. शेखरने उत्तरादाखल नुसतीच मान डोलावली. त्याला "थांब" असं म्हणून देवदत्त आपल्या केबीनमध्ये गेले. तिथून एक बॉक्स घेऊन आले आणि त्यांनी तो शेखरच्या हातात दिला. शेखरने बॉक्स उघडून पाहिला. आत एक फ़ोटोफ़्रेम होती... खूप जुनी. फ़ोटोही खूप जुना पण अतिशय महत्त्वाचा...शेखर आणि देवदत्तांचा लहानपणीचा एकत्र काढलेला फ़ोटो. एकदा लहानपणी देवदत्तावरचा राग कशावरही काढता आला नाही म्हणून छोट्या शेखरने रागारागाने त्या फ़ोटोचे तुकडे केले होते. देवदत्तांनी ते तुकडे शेखरच्या नकळत उचलून दिनकररावांकडे दिले होते, त्याचा पुन्हा फ़ोटो बनवण्यासाठी. दिनकररावांनी ते तुकडे पुन्हा जोडून तो फ़ोटो देवदत्तांना फ़्रेममध्ये घालून दिला होता.

तो फ़ोटो पाहून शेखरला गलबलून आलं. काय बोलावं हे त्यालाच सुचत नव्हतं. देवदत्त त्याला म्हणाले, "शेखर, हा फ़ोटो मी आजपर्यंत का जपून ठेवला माहितीय? तुला देण्यासाठी नाही. तर तुला हे सांगण्यासाठी की वरवर तु कितीही तुटला असशील माझ्यापासून, तरी तुला फ़ार दूर जाऊ देणार नाही मी."

देवदत्तांनी त्याच्या खांदयावर थोपटल्यासारखं केलं आणि त्याला कॉन्फ़रन्स हॉलमध्ये आणलं. दिनकरराव, मालतीबाई, शालिनी, सुयोग, ऑफ़िसचे इतर कर्मचारी आणि देवदत्तांचे काही निवडक समव्यावसायिक त्या दोघांची वाट पाहत होते. सर्वांनी त्या दोघांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. पार्टनरशीपच्या करारावर अजून स्वाक्षर्‍या होणं बाकी होतं पण स्वाक्षर्‍या झाल्यानंतर, सेलिब्रेशन म्हणुन देवदत्तांनी खास ऑफ़िसच्या कर्मचार्‍यांसाठी एक छोटीशी पार्टी आयोजित होती.

कराराच्या कागदपत्रांवर सर्वप्रथम दिनकररावांनी स्वाक्षरी केली. या स्वाक्षरीने त्यांची 'यज्ञ'मधील पार्टनरशीप रद्द झाली.

त्यानंतर देवदत्तांनी स्वाक्षरी करून शेखरची पार्टनरशीप मंजूर केली. मग त्यांनी कराराचे कागदपत्र शेखरच्या पुढ्यात सारले. शेखर निश्‍चलपणे त्या कागदपत्रांकडे पाहात बसला होता. देवदत्तांनी त्याला स्वाक्षरी करण्यासाठी खूण केली पण त्याने हातातलं पेन बाजूला ठेवलं आणि कराराचे कागदपत्र फ़ाडून टाकले आणि म्हणाला, "देव, मला नाही बनायचं पार्टनर या कंपनीत."

त्याच्या या वाक्यासरशी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. दिनकरराव आणि देवदत्तही त्याच्या कॄतीने आश्‍चर्यचकित झाले. शेखर देवदत्तांच्या जवळ जात म्हणाला, "देव, तुला ओळखण्यात मी खूप चूक केली.. मला सारखं असं वाटायचं की माझ्या वाटणीचं सर्व, मी तुझ्यामुळे गमावून बसलोय आणि त्यातूनच ..." शेखरला पुढे बोलता आलं नाही, त्याने देवदत्तांना मिठी मारली आणि म्हणाला, "देवा, मी तुझ्याशी किती वाईट वागलो. मला क्षमा कर.."

"गप! असं नाही बोलायचं." देवदत्तांनी त्याच्या दोन्ही खांदयांना धरून म्हटलं. "आज एव्हढ्या वर्षांनी तु मला ’देवा’ म्हणून हाक मारलीस, अगदी लहानपणी हाक मारायचास तशीच! खूप बरं वाटलं. माझा शेखर मला परत मिळाला. म्ह्टलं नव्हतं, तुला फ़ार दूर जाऊ देणार नाही मी."

शेखर आणि देवदत्तांनी पुन्हा एकदा एकमेकांना कडकडून मिठी मारली. दिनकरराव डोळ्यांच्या कडांना जमा झालेलं पाणी टिपत होते. मालतीबाई आणि शालिनीच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू वाहात होते. त्या हॉलमधील प्रत्येक जण त्या प्रसंगाने भारावून गेला होता.

"आजी, इथे तर सगळेच रडतायंत. मग मला का सांगितलंस की पार्टी आहे म्हणून?" सुयोग मालतीबाईंचा हात ओढत म्हणाला.

सुयोगच्या त्या वाक्यासरशी संपूर्ण हॉलमध्ये खसखस पिकली. शेखर आणि देवदत्त दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. शेखरने देवदत्तांचा हात आपल्या हातात घेऊन तो उंचावला आणि म्हणाला, "ज्या पार्टनरशीपची गरज मला होती, ती आज मला मिळालीय."

टाळ्यांच्या कडकडात सर्वांनी नव्या शेखरचं स्वागत केलं आणि एका आगळ्याच पार्टनरशीपचं सेलिब्रेशन करण्यासाठी जमलेले सर्व जण उत्सुक झाले.
ही कथा सुरुवातीपासून वाचावयाची असल्यास येथे टिचकी द्‍या.

3 comments:

 1. ha turn mala avadala.
  jayjayabhi04@rediffmail.com

  ReplyDelete
 2. कथा अप्रतिम लिहीली आहे. डोळ्यासमोर सगळे क्षण उभे राहतात.
  असेच लिहीत राहा.

  ReplyDelete
 3. jayjayabhi04 आणि laxmi, आपल्या अभिप्रायांसाठी खूप आभारी आहे.

  ReplyDelete