Wednesday, August 15, 2012

पुढे काय?

प्रतिक्रिया: 
११ ऑगस्ट २०१२ च्या दिवशी जे काही घडलं ते काय होतं? बरेच लेख वाचले, फोटो पाहिले, मनात संतापाचा भडका उडाला, ज्याला ज्याला शक्य असेल त्याला मनातून शिव्यांची लाखोली वाहून झाली. आता पुढे काय?

माझ्यासारख्याच हजारो, लाखो मनांमधे नेमकी हीच खळबळ सुरू आहे; पण मनातल्या संतापाला लेखाद्वारे वाट मोकळी करून दिली की आपलं कर्तव्य संपतं का? पुढे काय? चार लेख लिहिले, वाचले, प्रतिक्रिया दिल्या, सरकार/राज्यकर्त्यांना शिव्या देऊन झाल्या, ते ढीम्म हलत नाहीत म्हटल्यावर फेसबुक, ट्विटरवर त्यांना चपला मारून झाल्या की मग काय? सगळं थंड!!?

या जगात सर्वात मोठा समुदाय म्हणून मुस्लिम धर्मियांचं नाव घेता येईल. कोणत्या देशात त्यांच्या धर्माचे लोक नाहीत असं नाही. जगाच्या कोपर्‍यात कुठेही घातपाती घटना घडली तर मुस्लिम धर्मियांचं नाव अग्रगण्य असतं. या धर्माची शिकवण आणि धर्माच्या पालनकर्त्यांची वागणूक यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. गरीब व बेकार मुसलमान तरूणवर्गाला धर्माची शिकवण देण्याच्या नावाखाली दहशतवादी बनवण्याचं ब्रेन-वॉशिंग सुरू आहे. पुरेसे पैसे मिळणार असले आणि त्यांच्या कुटुंबाची सोय पाहिली जाणार असेल, तर जीवावर उदार होतात ही पोरं. पण यांच्या घातपाती कारवायांना पुरा पडावा म्हणून पैसा येतो कुठून? आणि काय मिळवायचं आहे यांना? समजा, या जगातील सर्व लोक मुस्लिम धर्मिय झालेच की मग पुढे काय? अतिरेकी कारवाया, दहशतवाद, घातपात हे सर्व तत्क्षणी थांबेल का?

काही देशांमधे रस्त्यावर खेळणी विकावीत इतक्या सहजपणे शस्त्रास्त्रे विकली जात असतात. काही बलाढ्य देश आपल्या देशासाठी या गोष्टींचा फायदा करून घेतात आणि भारत व भारताचे शासनकर्ते मात्र शांतीचा बावटा घूमवत आपल्याच देशात घडत असलेल्या दंगली देखील काबूत आणू शकत नाहीत, तर जगाशी काय घंटा लढणार आहेत?

कारगिलमधे आपल्या जवानांनी दाखवलेलं शौर्य दरवर्षी कारगिल दिवस म्हणून साजरं करायचं, पुढे काय? आता कारगिलमधे काय परिस्थिती आहे, काश्मिरमधे काय सुरू आहे हे या देशाचा नागरिक म्हणून आपण कधी जाणून घेतलं? आपल्या सीमेवर आपला सैनिक जागा असतो म्हणून आपण सुखाने आपल्या घरात घोरत असतो हे तर सत्य आहे. आपल्या सैनिकाने केलेल्या त्यागाची परतफेड एक नागरिक म्हणून आपण कशी करतो?

१५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला जे मिळालं त्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो? आपल्याला ते स्वातंत्र्य जपण्याची गरज वाटते की नाही? लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आणि आजचा गणेशोत्सव यात कुठेतरी साम्य आहे का? जर नसेल तर ते साम्य घडवून आणण्याची गरज आपल्याला आतादेखील वाटत नाही का? दहीहंडीच्या दिवशी आपल्या संघटीत युवा शक्ती-युक्तीचं प्रदर्शन करून जागतिक विक्रम घडवणारे युवक आपल्या देशासाठी या संघटीत शक्तीचा काही उपयोग करतील का?

अल्पसंख्यांक म्हणजे आर्थिक राहणीमानानुसार केलेल्या वर्गवारीचा निष्कर्ष की धर्माने अल्पसंख्याक? धर्म आणि जात या दोन वर्तुळांच्या बाहेर आपण कधी पडणार आहोत की नाही? २६/११ आणि त्याच्याशी संबंधित घटनांचा तर उल्लेखच करू नये. जनतेची, राज्यकर्त्यांनी केलेली सर्वात मोठी टिंगल आहे ती. पण आपण जनता म्हणून काय केलं? मेणबत्त्या लावल्या, श्रद्धांजली वाहिली. पुढे काय?

आपलं सरकार षंढ आहे, हे तर उघडच झालेलं आहे आणि या षंढत्वाचा पायाभरणी समारंभ १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीच झालेला आहे. आता या किळसवाण्या इमारतीला उध्वस्त करण्यासाठी आपल्या आंदोलनाच्या सुरूंगाची गरज आहे. सरकारला, या भ्रष्ट राज्यकर्त्यांना हे दाखवून देण्याची गरज आली आहे की आपण त्यांच्यासाठी नाही, ते आपल्यासाठी काम करतात. हे आपण त्यांना का दाखवत नाही आहोत? कारण आपल्याला रोज नोकरीवर जायचं असतं म्हणून? की दंगल, घातपात याची झळ अजून तरी आपल्या घराला बसली नाही म्हणून?

अशा चर्चा काय, घडत राहतील आणि तिथेच रहातील. एकीकडून चिनी ड्रॅगन आणि दुसरीकडून धर्मांध अडाण्यांची घुसखोरी, त्यात आपलीच लोकं पाठीत खंजिर खुपसताहेत आणि जनता क्रियाशील न होता नुसतीच चर्चा करतेय अशी परिस्थिती असलेल्या देशाचं रक्षण हिमालय किती दिवस आणि का करेल?
*****

1 comment:

  1. पुढे काय हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
    निदान आम जनतेत असलेल्या त्यांच्या भावना तू ह्या लेखातून व्यक्त केल्या. जे काम खरेतर प्रसारमाध्यमांचे आहे.
    अभिव्यक्त होणे केव्हाही चांगले.

    ReplyDelete