Sunday, January 1, 2012

द क्वाएट फॅमिली (१९९८)

प्रतिक्रिया: 
अवगत नसलेल्या भाषांमधील चित्रपट पहाताना आपल्याला सब-टायटल्सची नितांत आवश्यकता भासते. पण काही चित्रपट असे असतात जिथे सब-टायटल्सची आवश्यकता अतिशय नगण्य असते. वातावरणनिर्मिती आणि पात्रांचे हावभाव यातून चित्रपट सहज पुढे सरकत जातो आणि आपल्याला समजतो. जी-वून-किम लिखित आणि दिग्दर्शित ’द क्वाएट फॅमिली’ हा याच पठडीतला चित्रपट आहे. किमचे चित्रपट मी यापूर्वी पाहिलेले नाहीत पण त्याच्या नावे जमा असलेल्या चित्रपटांचं IMDB वरील दर्जांकन पहाता असं वाटतंय की या दिग्दर्शकाचे चित्रपट एकदा तरी पहायला हवेत.


द क्वाएट फॅमिली’ची कथा एका कुटुंबाची आहे. ट्रेकींगला जाणार्‍या येणार्‍यांची सोय व आपल्याला अर्थप्राप्ती या उद्देशाने या कुटुंबाने एक लॉज उघडलेलं आहे. पण अनेक दिवस वाट पाहूनसुद्धा या लॉजकडे चिटपाखरू देखील फिरकत नाही. आपलं नशीबच खराब आहे, असं समजून पाहुण्यांची वाट पहाण्याव्यतिरिक्त या कुटुंबाच्या हाती काही उरलेलंच नसतं. तशातच त्यांच्या लॉजमधे पहिला-वहिला पाहुणा येतो. संपूर्ण कुटुंबाला आनंद होतो की आता आपलं नशीब पालटेल. पण घडतं उलटंच! लॉजमधे उतरलेल्या पाहुण्याला सकाळी उठवायला गेल्यानंतर या कुटुंबाच्या लक्षात येतं की पाहुणा मरून पडलाय. त्याचा मृत्यू ही आत्महत्या की खून या संभ्रमात असताना त्यांना आणखी एक चिंता भेडसावते, ती म्हणजे - पहिल्याच पाहुण्याच्या बाबतीत असं घडलं. आता ही बातमी सगळीकडे पसरली तर आपल्या लॉजकडे कुणीच फिरकणार नाही, बदनामी होईल ती वेगळीच. मग कुटुंबातले पुरूष आणि कर्ती स्त्री मिळून त्या पाहुण्याच्या प्रेताची वासालात लावण्याचं ठरवतात. पण त्या बिचार्‍यांना हे माहित नसतं की ही तर नुसती सुरूवात आहे. विनोदी पण दुर्दैवी घटनांची एक मालिकाच त्या लॉजमधे घडत जाते. लॉजची बदनामी टाळाण्याच्या हेतूने प्रत्येक प्रकरण हे कुटुंब दाबून टाकण्याचा प्रयत्न करतं आणि त्यातून एक नसतीच आफत उद्भवत जाते.

या चित्रपटामधे विनोद ठरवून केला गेला आहे. सर्वसामान्यपणे चित्रपटातील ज्या प्रसंगात आपण विनोदाची कल्पनाही करू शकत नाही, अशा ठिकाणीदेखील सहज घडून येईल असा विनोद आपल्याला हसवून जातो. चित्रपटातील पात्रांविषयी सहानुभूती वाटत असतानाच त्यांच्या हातून घडणार्‍या गोष्टींमुळे एकाच वेळी भय व हास्य हे दोन्ही अनुभव देणारा चित्रपट मला आवडला.
*****

No comments:

Post a Comment