Monday, December 12, 2011

ते जादूई दिवस...

प्रतिक्रिया: 
शाळेतले दिवस! बालपणींच्या आठवणींशी निगडीत असलेला एक अविस्मरणीय कालखंड. शाळेतल्या पहिल्या दिवसापासून ते दहावी पास झाल्यानंतरच्या निरोप समारंभापर्यंतचे ते जादूई दिवस. शाळेतले मित्र-मैत्रीणी, एकाच बेंचवर बसण्यासाठीची धडपड, मधल्या सुटीतला डबा, पि.टी.च्या तासाला खेळलेला डॉजबॉल, गृहपाठासाठी केलेली वह्यांची अदलाबदल, कालची कट्टी विसरून आज केलेली बट्टी, शाईपेनातली शाई संपल्यावर मैत्रीणीकडून दोन थेंब मागीतलेली शाई, लक्ष नाही म्हणून सरांनी फेकून मारलेले खडू, त्यांनी परिक्षेसाठी दिलेला बेस्ट ऑफ लक.... कित्ती कित्ती आठवणी!ते जादूई दिवस सरून कित्येक वर्षं झाली. दहावीनंतर प्रत्येकजण आपापल्या वाटेने निघून गेला. पण मन मात्र अजून त्याच कालखंडात रेंगाळत होतं. ते क्षण असतातच असे. विसरता येत नाहीत आणि पुन्हा हाती लागत नाहीत. पण प्रत्येकालाच वाटत असतं की ते क्षण आता इतिहासात जमा झाले असले तरी पुन्हा एकदा आपल्या जुन्या सवंगड्यांना भेटावं, त्या स्मृतींना उजाळा द्यावा. दोन क्षण का होईना, पण पुन्हा लहान व्हावं.

आणि खरंच तो दिवस आला. २२ वर्षांनी श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिरच्या १९८९ च्या बॅचमधून दहावी उत्तीर्ण झालेले आम्ही जुने मित्र-मैत्रीणी भेटलो आणि तो काळ पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटला. आमच्यातल्याच काही जुन्या मित्रमैत्रीणींनी पुढाकार घेऊन ही भेट घडवून आणली आणि आम्हा सर्वांच्या आयुष्यात आणखी एका अविस्मरणीय क्षणाची नोंद झाली. सर्व जुन्या मित्रमैत्रीणींना भेटल्यावर काय वाटलं हे खरंच शब्दांत सांगता येण्यासारखं नाही. भरपूर बोलायचं होतं, भरपूर काही ऐकायचं होतं पण असं वाटत होतं की वेळ अपूरा पडतोय. कुणाचा चेहेरा खूप बदललेला, तर कुणाचा २२ वर्षांनीही अगदी तसाच. जणू काळ मधे गेलाच नाही. कुणी खूप शांत व गंभीर झालेला तर कुणी पूर्वीची अबोल पण आता मुलखाची बोलकी झालेली. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा, आयुष्यातलं ध्येय वेगळं पण त्या दिवशी सर्वांना भेटल्यावर इतर कशाचाही विसर पडला होता.


खूप मज्जा केली, खूप आठवणीदेखील काढल्या. आपल्याला शाळेची जशी गरज होती, तशीच शाळेलादेखील आपली गरज आहे, याची जाणीव प्रकर्षाने झाली. ज्या शाळेमुळे, शिक्षकांमुळे आम्ही हा दिवस पाहिला, त्यांचे ॠण कधीच फिटणारे नाहीत पण त्यांच्यासाठी आणखी काही करता आलं तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच. एक मात्र नक्की, या दिवसामुळे आपण काय ’मिस’ करत होतो, याची आम्हाला जाणीव झाली. नेहमी भेटता आलं नाही तर निदान वर्षातून एकदा तरी आपण सर्वांनी पुन्हा एकत्र भेटायचं हे मात्र आम्ही सर्वांनी मनाशी नक्की केलं आहे.
*****

No comments:

Post a Comment