Saturday, December 31, 2011

Happy New Year!

प्रतिक्रिया: 
हे वर्षं माझ्यासाठी खूप घाईगडबडीचं पण छान गेलं. वाचनाला पुन्हा सुरूवात केली. सिनेमे पहाण्याचा तर सपाटा लावला होता. काही जुनेच छंद ज्यांच्याकडे बरेच दिवस लक्ष देता आलं नव्हतं, त्यांनाही पुन्हा सुरूवात केली. नवनवीन गोष्टींमधलं ज्ञान मिळवणं मला आवडतं. मी नेहमी असं म्हणते की परमेश्वराने जर शक्य असेल, तर मला आणखीन दोन-तीन वेळा मनुष्यजन्म द्यावा. किती काही आहे शिकण्यासारखं, अनुभवण्यासारखं! एका जन्मात शक्य तरी आहे का हे सर्व?


"एक वर्ष कसं सरलं, कळलंदेखील नाही!" हे वाक्य आपण प्रत्येक वर्षी म्हणतो. आपण सगळेच आपापलं ध्येय गाठण्यासाठी इतकं काही करत असतो की दिवसांची मोजदाद करणं लक्षात रहाण्यासारखं नसतंच. काही गोष्टी सहज मिळतात, काहींसाठी झगडावं लागतं तर काही निसटूनदेखील जातात. भले-बुरे अनुभव, कडू-गोड आठवणींचा ठेवा घेऊन आपण पुढल्या वर्षात काय काय करायचं याच्या योजना करायला लागतो. यातच खरी मजा आहे, हेच खरं जीवन आहे. एखाद्याला हवं ते सर्व मिळालं तर आयुष्य किती एकसुरी, बोअर होऊन जाईल नं! अंधार असला तरच प्रकाशाचं महत्त्व कळतं, तसंच थोडी दु:खाची कडूसर चव असली तर सुखाची चव गोड लागते. मग वर्ष, दिवस, तास याची मोजदाद कशाला? वर्ष गुढीपाडव्यापासून साजरं करा किंवा १ जानेवारीपासून, त्या एका वर्षातले जितके दिवस आपल्या लक्षात राहिलेत, तेवढंच जगलो आपण त्या वर्षात. म्हणून विचार करतेय, पुनर्जन्म असतो की नाही, हे तर मला माहितदेखील नाही. मग कशाला उगाच या जन्मातले दिवस वाया घालवायचे? जो भी है, बस यही एक पल है, जी ले!

मोगरा फुललाच्या सर्व वाचकांना, मित्रमैत्रीणींना आणि हितचिंतकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
*****

No comments:

Post a Comment