Thursday, October 6, 2011

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रतिक्रिया: 
Hobby Hub: First Post!

"मोगरा फुलला"च्या सर्व वाचकांना, मित्र-मैत्रीणींना, हितचिंतकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आजच्या शुभदिनी मी एक नवीन शिलाई मशीन खरेदी केलं आहे. खूप वर्षांपासून इच्छा होती की बिल्ट इन लॅम्प आणि काही प्रगत बदलेलं शिलाई मशीन आपल्याकडे असावं. पण जुनं शिलाई मशीन (सिंगरचं फॅशन मेकर क्लासिक) देऊन टाकण्याची कल्पना मला सहन होत होत नव्हती. मी जेव्हा दहा वर्षांपूर्वी Certificate Course of Tailoring and Cutting (CCTC) हा अभ्यासक्रम पूर्ण केला तेव्हा माझ्या बाबांनी मला ते भेट म्हणून दिलं होतं. दहा वर्षांची सोबत इतक्या चटकन सुटते का? पण आताशा मशीन फार जास्त काम देईनासं झालं होतं. सामानाची ने आण करताना त्याला थोडा मारही बसला होता. शिवाय कोणतीही नवीन डिझाईनची शिवण घालायची तर एक डिस्क बदलावी लागणं ही मोठी कटकट वाटायची. त्यामुळे कधी ना कधी तरी मला नवीन मशीन घ्यावंच लागणार होतं.

हे आहे माझं जुनं शिलाई मशीन

नवीन फॅशन मेकर घ्यावं का, याचा विचार करत होते पण म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते, अगदी तसंच झालं. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला घरगुती उपकरणांचं "उत्सव" नावाचं एक प्रदर्शन लागलं आहे. तिथे "सिंगर" चा स्टॉल लागला होता. सिंगरची शिलाई मशीन घ्यायची तर डोळे झाकून घ्यायची हा मला अगदी पहिल्या मशीनपासून आलेला अनुभव. एकदा मशीन खरेदी केलं तर तक्रार, कुरकुर काही नाही. बस, काम करत सुटायचं. त्यामुळे सिंगरचा स्टॉल म्हटल्यावर माझी पाऊले तिथे न वळती तरच नवल. खूप विविध प्रकारच्या मशीन्स होत्या तिथे. पण मला आवडलेल्या मशीन्स दोनच! एक म्हणजे हे फॅशन मेकर मॉडेल नं. 8280 आणि दुसरं एक हेवी ड्युटी मशीन. जे सर्वसाधारणपणे गारमेंट वर्क्सशॉप्समधे वापरतात. घरगुती वापरासाठी 8280 मला एकदम पसंत पडलं. डिलरने एक्सचेंज ऑफरसुद्धा दिली आणि माझ्या जुन्या मशीनच्या बदल्यात हे नवीन मशीन आज माझ्या घरी येऊन पोहोचलं.


हे आहे माझं नवीन शिलाई मशीन

हे नवीन शिलाई मशीन अगदी मला हवं तसं आहे. बिल्ट इन लॅम्प, बॉबीन केस भरताना दोर्‍याचं रिळ टण्‌कन उडून दूर पडण्याची भिती नाही, शिवण मागे-पुढे करण्यासाठी हाताशीच असणारं एक स्वीच आणि शिवणाचा फूट बदलण्यासाठी स्क्रू पिळण्याची गरज नाही. शिवाय काही आवश्यक अशा निरनिराळ्या प्रकारच्या शिवणी उदा. झिगझॅग वगैरे तर आहेच. यात बिडींगही होतं. आणखी काय पाहिजे.

तर आता नवीन नवीन शिवणाकामाचे नमुने इ. तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगवर वाचायला मिळतीलच. मध्यंतरी बरीच कामं वाढली होती त्यामुळे कुठल्याच ब्लॉगवर फार काही लिहिता येत नव्हतं. पण दिवाळीनंतर मी पुन्हा लिहीती होईन. तोपर्यंत इथल्या जुन्या पोस्ट वाचत रहा. काही आवडलं खटकलं तर कळवत रहा.

पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा!
* * * * *

No comments:

Post a Comment