Wednesday, August 17, 2011

(अ)विलक्षण टॅक्सी ड्रायव्हर

प्रतिक्रिया: 
टॅक्सीने प्रवास करताना काय एकेक विलक्षण अनुभव येतात. मागच्या वर्षीचा उंदीरमामांचा अनुभव म्हणजे एक गंमतच होती उंदीर टॅक्सीत काय शिरतो, लोक टॅक्सीतल्या टॅक्सीत सर्कस काय करतात... सगळा विनोदी प्रकार नुसता. पण त्या घटनेमुळे निदान सिग्नलसाठी थांबण्याचा जीवघेणा आणि कंटाळवाणा प्रकार फार चटकन पार पडून गेला. पण काल आलेला अनुभव कसा होता, हे सांगणं कठीण.

समजा, तुम्ही टॅक्सीला हात केलात आणि एक छान चकाचक व्हर्सा मॉडेल असलेली टॅक्सी तुमच्यासमोर उभी राहिली, तर तुम्ही काय म्हणाल? "चला, निदान प्रवास तरी बरा होईल?" आता तुम्ही टॅक्सीत बसलात. तुमच्या डोक्यात निरनिराळ्या कामांचे विषय डोक्यात गर्दी करतायंत. गाडी नवीच असल्यामुळे लोण्यातून सुरी फिरवावी तशी हायवेवर पळतेय (असे हायवे देखील मुंबईत फार कमी वेळा अनुभवायला मिळतात ही गोष्ट वेगळी, जास्त करून खड्डेच). तुम्ही खुश आहात की आज जास्त ट्रॅफिक नाही, गाडी मस्त पळतेय. म्हणजे आपण ऑफिसला अगदी वेळेवर पोहोचणार. अचानक तुमचं लक्ष ड्रायव्हर कडे जातं आणि तुम्ही काय पहाता - ड्रायव्हर स्टिअरिंग व्हिलची उशी करून चक्क गाईगाई करतोय!

ए, ओ, ऐ, आ... झोपलेल्या त्या चक्रधराला उठवण्यासाठी तुम्ही अ ची बाराखडी सुद्धा धड म्हणू शकत नाही, एवढे तुम्ही चकीत, भयभीत आणि कोपित झालेले आहात. पण तेवढ्यात आपल्या तोंडातून निघालेल्या त्या अगम्य आवाजांनी आपल्या नशीबाचा तो तात्कालिन राखणदार उर्फ ड्रायव्हर झोपेतून खडबडून उठतो. ओशाळं हसत आपल्याला, "सॉरी हां. वो क्या है, हम रातपाली करके आया है. सोयाच नही." असं म्हणून त्याची बाजू सावरतो. तुम्ही काहीतरी गुळूमुळू त्याला समजावणीचे दोन-चार शब्द सांगण्याचा फक्त प्रयत्नच करता कारण त्याचे ते ऐकून घेण्याची अजिबात तयारी नसते. त्यापेक्षा त्याला स्वत:च्या आवाजात म्हटलेली गाणी ऐकायला जास्त आवडतात (असते आवड एकेकाची). तुम्ही तो अत्याचार देखील मुकाट सहन करता कारण तुमचा असा समज असतो की बहुधा डोळ्यांवर पुन्हा झापड येऊ नये म्हणून तो गाणी गात (?) असेल.

मग जवळपास तुमच्या उतरण्याच्या ठिकाणी तुम्ही येऊन पोहोचल्यावर तुम्हाला दिसतं की बाबाची गाडी जेवढी फास्ट पळते, त्याहून फाश्ट त्याचं मीटर आहे. नेहेमीच्या मीटरपेक्षा शंभर रूपयांचं मीटर तुम्हाला जास्त दिसतं म्हणून तुम्ही त्याला जाब विचारता. यावर तो, "इतनाही होता है", असं सर्व टॅक्सीवाल्यांनी पाठ करून ठेवलेलं असतं, ते उत्तर स्टिरिओटाईप आवाजात देतो. तुम्ही तुमचा प्रवासाचा अनुभव पणाला लावून त्याच्या मीटरमधला दोष त्याला सांगता, तेव्हा तो म्हणतो, "इलेक्ट्रानिक मीटर गलत नही होता. लेकीन जो समझके देना है दे दो." पण जर तुम्ही त्याचं न ऐकता, त्याला "आर.टी.ओ. ला जाऊ या" असं जेव्हा म्हणता, तेव्हा तो काय म्हणतो? "हमारी गाडी नही है. हम तो बदली का काम करता है. हम आर.टी.ओ. जाएगा तो हमारा उस आदमी के साथ रिलेसन खराब हो जाएगा."

यावर तुम्ही काय करता? तुम्हालाही आर.टी.ओ. वगैरे पर्यंत जाण्यासाठी अजिबात वेळ नसतो. त्या ड्रायव्हरकडे एक संतापजनक कटाक्ष टाकून तुम्ही तुम्हाला जेवढे वाटतात तेवढे मीटरचे पैसे देता आणि आपल्या रस्त्याला लागता. ड्रायव्हर आपला नवं गिर्‍हाईक गटवायला मोकळा. मीही कदाचित तेच केलं असतं पण टॅक्सी ड्रायव्हरचा मुजोरपणा आणि निष्काळजीपणा बघून मला त्याला तसंच सोडण्याचं मन होईना. मी रोज ये-जा करत नाही पण माझा नवरा करतो, शहरातील लाखो लोक रोज टॅक्सीने प्रवास करतात. काल जर त्या टॅक्सीवाल्याला झोपेतून उठवलं नसतं तर आज ही पोस्ट लिहायला मी जीवंत असते की नाही, हेदेखील मला माहित नाही. म्हणून सगळी दयाबुद्धी बाजूला ठेवून मी शांतपणे 1800-220-110 डायल केला. या २४ तास सुरू असणार्‍या हेल्पलाईनवर मुंबईतील टॅक्सी आणि रिक्शावाल्यांच्या विरोधातील तक्रारी स्विकारल्या जातात आणि मुख्य म्हणजे आपल्या तक्रारीवर त्यांच्याकडून कारवाई केली गेली आहे, याचं उत्तर आपल्याला पंधरा दिवसात मिळतं. तेव्हा पुढच्या वेळेस मुंबईतल्या रिक्षा-टॅक्सी ड्रायव्हरने तुम्हाला तुमच्या ठिकाणापर्यंत सोडण्यासाठी नकार दिला, तर हा नंबर डायल करून पहा.
*****

No comments:

Post a Comment