Friday, August 12, 2011

होऊ द्यात गर्भपात स्त्रीभ्रूणांचे!

प्रतिक्रिया: 
ठाण्यातली सोनोग्राफी सेंटर्ससुद्धा गर्भलिंग निदान करतात हे वाचलं तेव्हा ठाणेकर म्हणून शरमेनं मान खाली गेली. पुढच्या पिढीत गे वाढतील आणि ज्या काही मुली वाचल्या असतील त्या लेसबियन्स बनणं पसंत करतील अशी भिती वाटते आहे. स्त्री गर्भ आहे म्हणून गर्भ पाडून टाकताना ते आई-बाप आणि त्यांचं कुटुंब हा विचार करत नाही की आपली आईदेखील स्त्री होती म्हणून हे निंदनीय कृत्य करायला आज आपण अस्त्तित्वात आलो.

उद्या रक्षाबंधन आहे. पुढच्या काही वर्षांत हा सण बंदच पडेल. बहीणच नसेल, तर भाऊ राखी कुणाकडून बांधून घेणार? काही दिवसांनी गणपती येतील, गणपतींसोबत गौरी आणतील, "गणपतीला चालत नाही पण गौरीला लागतो" म्हणून पडदा लावून का होईना पण मांसाचा नैवेद्य दाखवतील आणि घरातल्या गौरी मात्र पोटी मुलगी जन्माला आली म्हणून अपमानाचे कढ गिळतील. मग दुर्गाष्टमी येईल. देवीच्या नावाने रात्रभर गरबा खेळतील पण घरच्या लक्ष्मीला "मुलगा नाही" म्हणून लाथाबुक्क्यांनी तुडवतील. त्यानंतर दिवाळी! पोटी वंशाचा दिवा नाही म्हणून सुवासिनींच्या मनात निराशेचा काळोख आणि बाहेर मात्र पणत्यांची आरास. भाऊबिजेला बहिणीला भेटवस्तू देण्याचा खर्च वाचला म्हणून सगळे भाऊ खुश होतील नाही? "आज बहिणींनी पुरतं लुटून घेतलं" अशी तक्रार आपल्या मित्रांकडे करण्याचं कारण उरत नाही मग. तुळशीचं लग्न लागलं की आपल्याकडे लगीनघाई असते. आता लग्नात करवली नसेल. पण मुळात लग्न होतील का? मुलंच सगळीकडे, मग लग्न करण्याची आवश्यकताच काय? जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, लता मंगेशकर, इंदिरा गांधी, कल्पना चावला यांचा अभिमान वाटण्याचे दिवसदेखील लवकरच संपतील.

मुलगा जन्माला येणार की मुलगी हे आईच्या नाही तर वडीलांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असतं, हे साधं वैज्ञानिक सत्य आणि मुलगी असो वा मुलगा, तो गर्भ सांभाळण्यासाठी जी कूस लागते ती एका स्त्रीचीच असावी लागते ही किमान आवश्यकता जर आजच्या पिढीला नजरेआड करायची असेल, तर होऊ द्यात गर्भपात स्त्रीभ्रूणांचे. आपल्याकडच्या एकाही सोनोग्राफी सेंटरला इतकी लहानशी माहिती आपल्या क्लिनिकमधे लावावीशी वाटत नाही, यात काय ते आलं.

*****

No comments:

Post a Comment