Friday, August 5, 2011

क्रोशाचं विणकाम सुरू करण्यापूर्वी...

प्रतिक्रिया: 
फार वर्षांपूर्वी क्रोशाचं विणकाम जेव्हा मी नुकतंच शिकायला सुरूवात केली तेव्हा उत्साहाच्या भरात भरपूर दोरा, लोकर विकत घेतली होती. सुयाही तशाच, ज्या साईजच्या मिळतील, त्या सर्व विकत घेतल्या. पुस्तकांचं तर काही विचारूच नका. पण दोरा, सुया, पुस्तकं याच्यासोबत एका गोष्टीची आणखी गरज होती ती म्हणजे सातत्य! क्रोशाचं विणकाम शिकताना मी केवळ विणकाम शिकले नाही, तर इतर बर्‍याच गोष्टी शिकले. प्रयत्न, मेहनत, चिकाटी आणि धैर्य या गोष्टी जर उपल्बध साधनसंपत्तीचा वापर करण्यासाठी वापरल्या नाहीत, तर सगळं व्यर्थ आहे! नुसतंच सामान विकत आणून, काय हळद-कुंकू वाहून पुजत (थोडक्यात कुजत) ठेवणार का?

तर क्रोशाच्या विणकाम शिकण्याची ज्यांची इच्छा असेल किंवा विणकाम येत असेल पण ज्यांनी केवळ कंटाळा करून या कलेकडे दुर्लक्ष केलं असेल, त्यांना मी एवढंच सांगू शकेन की क्रोशाच्या प्रत्येक मोठ्या विणकामाची सुरूवात लहान वस्तू विणण्यापासून करावी. तुम्हाला मोठे रूमाल, टेबलक्लॉथ, पडदे स्वत: विणायचे आहेत पण विणायचा कंटाळा येतो ना! तर मग लहान वस्तू उदा. फ्रॉक किंवा जिन्सच्या खिशावर लावण्यासाठी एखादं लहानसं फूल किंवा तान्ह्या बाळांसाठी बूट अशी सुरूवात करा. नाहीतर होतं काय की, आपण मारे उत्साहात स्वेटर विणण्यासाठी लोकर आणतो. मग काही दिवसांतच आपला उत्साह मावळतो आणि स्वेटरच्या जागी शाल विणण्याचा विचार मनात रूंजी घालायला लागतो. शालीचा विचार काही दिवसांतच बदलून टेबलक्लॉथ विणण्यावर जातो आणि मग टेबलक्लॉथ नको बटवा, बटवा नको रूमाल, रूमाल नको पॉट होल्डर, पॉट होल्डर नको लेस, असं करत करत ती लोकर किंवा दोरा कपाटात जाऊन बसतो आणि तो वर्षानुवर्षं तिथंच रहातो. कारण मग घरातलं सर्व करता करता आपल्याकडे वेळच नसतो! हो की नाही? मग केव्हातरी आपल्या नात्यातली, ओळखीतली स्त्री विणकामाचा विषय काढते आणि आपण आपली सर्व विणकामाची संपत्ती तिला देऊन टाकतो, की मी नाही तर निदान तू तरी वापर!

मी तरी सुरूवातीला वेगळं काय केलं? पण आपल्याला ही कला खरोखरच आवडते तर नक्की जोपासायची, असा विचार करून मी क्रोशाच्या विणकामाला पुन्हा नव्याने सुरूवात केली. यावेळेस जरा जपून बेतानेच सामान आणलं आणि खरं सांगते, अजिबात पश्चात्ताप झाला नाही. मध्यंतरी मी एक पोस्ट टाकली होती, I goofed up! नावाची. त्या पोस्टमधल्या रूमालाच्या चित्रात जी लाल रंगाची फुलं दिसताहेत (खरं तर तो गडद गुलाबी रंग होता हं. फोटोमधे तो रंग जवळजवळ लाल दिसतोय, म्हणून मी लाल म्हणतेय), ती एकमेकांना जोडताना मी सुरुवातीलाच काहीतरी गलतीसे मिश्टेक केली होती. तीनदा रूमाल उसवला पण कुठे चुकत होतं तेच कळेना. बरं, चूक कळायची तेही शेवटंचं फुल जोडताना! पहिल्या वेळेस रूमाल उसवताना मी वर जे काही सांगितलं ना, प्रयत्न, मेहनत, चिकाटी आणि धैर्य... ते सगळं वापरलं. पण दुसर्‍यांदा रूमाल उसवताना धैर्य खचलं होतं, चिकाटी सुटत चालली होती, मेहनत फुकत जातेय असं वाटत होतं आणि तिसर्‍या वेळेस तर प्रयत्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण तसं केलं असतं तर काही वर्षांपूर्वी जे झालं, तेच झालं असतं. विणकामाचं सामान एकदा कपाटात जाऊन बसलं की महिनोन्‌महिने पुन्हा बाहेर येणे नाही. म्हणून पुन्हा असेल नसेल तेवढं सगळं धैर्य गोळा करून, चिकाटी न सोडता मी मेहनत करून पुन्हा विणण्याचा प्रयत्न करून पाहिला आणि हुश्श! मला चूक सापडली होती. वादविवादात योग्य मुद्दा मिळाला की आपल्याला कसा बोलायला चेव येतो, अगदी तसंच चेव येऊन मी तो रूमाल भराभरा विणून एका दिवसात पूर्ण केला.

पण हाय रे दैवा! मी एवढे तीनतीनदा प्रयत्नांची पराकाष्ठ करून (वाचा: माझ्या घोडचुका निस्तरून) विणणेल्या त्या रूमालाची एका धुण्यात वाट लागली होती. झालं काय की, मी पांढर्‍या रंगासोबत फुलांसाठी वापरलेला तो लाल (किंवा गुलाबी) दोरा होता ना, त्याने आपला खरा रंग मला दाखवला होता. खास भुलेश्वरला जाऊन "गॅरेंटेड" रंगाचे दोरे आणले की असं होतं, हे मला माहीत नव्हतं. पण या प्रसंगातूनसुद्धा शिकायला मिळालंच की! एक म्हणजे, प्रयत्न सोडायचे नाहीत. दोन म्हणजे भुलेश्वरला जायचं पण दुकानदाराने कितीही "गॅरेंटेड कलर" असं म्हटलं तरी त्याच्यावर विश्वास न ठेवता, दोरा विकत घ्यायचा आणि तीन म्हणजे "गॅरेंटेड" रंगाचा दोरा विणकामात वापरताना, जोडीला दुसरा रंग अजिबात वापरायचा नाही.

अरे हो! मी या पोस्टमधे दोन लिंक्स दिल्यात जर यातली दुसरी लिंक तुम्ही क्लिक करून पोस्ट (कदाचित) वाचली असेल, तर यात मी सेट ऑफ फाईव्ह डॉयलीजचा उल्लेख केला आहे, हे तुम्ही वाचलं असेल. या डॉयलीज मी माझ्या एका मैत्रीणीला देण्यासाठी बनवल्या होत्या. या डॉयलीज तिला खूप आवडल्या. त्यांचा फोटो टाकायचं राहून गेलं होतं. तो इथे देतेय. gif इमेज बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण यात फोटोशॉप नीटसं जमलं नाहीये. पण मागच्या अनुभवावरून शहाणं होऊन दोन रंगांची एक डॉयली विणण्याचा वेडेपणा मी केला नाही.


A set of five doilies for my friend

*****

No comments:

Post a Comment