Wednesday, August 31, 2011

मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ ची घोषणा

प्रतिक्रिया: 
नमस्कार मित्रमैत्रीणींनो,

गतवर्षीच्या मोगरा फुलला ई-दीपावली अंकाला भरभरून प्रतिसाद मिळाला. लेखक-वाचकांकडून मिळालेलं प्रेम नुसता उत्साहच द्विगुणित करत नाही तर आत्मविश्वासही वाढवतं. याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही या वर्षीच्या दिवाळी अंकाची म्हणजेच ’मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११’ ची घोषणा करीत आहोत. यंदाचा दिवाळी अंक दिवाळीच्या काही दिवस आधी म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच प्रकाशित केला जाईल. आपल्या सर्वांना दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचं आम्ही आवाहन करीत आहोत.

यंदाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याची मुदत आहे दि. १ सप्टेंबर २०११ ते ३० सप्टेंबर २०११. साहित्य पाठविण्यासाठी ईमेल आयडी आहे - diwaliank@mogaraafulalaa.com. साहित्य पाठविण्यापूर्वी या अंकासाठी असलेले नियमअटी लक्षपूर्वक वाचून घ्या आणि त्याप्रमाणेच साहित्य पाठवा.

नियम व अटींची बंधनं मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या सहभागी लेखकांना कधीच जाचक वाटली नाहीत. लेखनस्वातंत्र्य व त्यासाठी पाळावयाच्या नियम-अटींचं बंधन याचा योग्य अर्थ त्यांनी समजून घेतला आणि साहित्यरूपी प्रतिसादाची खैरातच केली मोगरा फुललावर. वाचकांनीदेखील तसूभर मागे न रहाता अंक प्रसिद्ध झाल्या क्षणापासून अंक वाचनाला मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. या वर्षीच्या अंकाची घोषणा होण्यापूर्वीच "दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवू का", अशी लेखकांनी विचारणा करणं आणि "यंदाचा दिवाळी अंक कधी येतोय?" अशी वाचकांनी हक्काने मागणी करणं, हे लेखक-वाचकांचं मोगरा फुललावरचं प्रेमच सिद्ध करत नाही का?

मागील वर्षी जाहिर केल्याप्रमाणे ऑफलाईन वाचनासाठी सोयिस्कर पडेल अशी मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१० ची PDF प्रत आपल्या सर्वांना डाऊनलोडींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ही ऑफलाईन आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या पर्यायावर क्लिक केलंत की डाऊनलोडींग सुरू करता येईल.

मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११ च्या प्रकाशनाची नक्की तारिख व इतर माहिती लवकरच मोगरा फुलला वर प्रकाशित केली जाईल. तोपर्यंत धीर धरा आणि मोगरा फुललाच्या नोंदींकडे लक्ष असू द्या.

हा मोगरा तुमच्यामुळेच फुलला आहे. तुमच्या मायेने आणि लोभामुळे तो सतत बहरलेला राहील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

-
स्नेहांकित
टीम मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११

No comments:

Post a Comment