Friday, July 1, 2011

पुनर्विकास घराचा... - ३ - जावक क्रमांक

प्रतिक्रिया: 
पुनर्विकास घराचा... - ३ - जावक क्रमांक(इंग्रजी अनुवाद)

इनवर्ड आणि आऊटवर्ड हे दोन शब्द तुमच्या परिचयाचे असतीलच. कार्यालयात पत्रव्यवहार हाताळणार्‍या व्यक्तींना तर या दोन शब्दांचे महत्त्व चांगलेच ठाऊक आहे. बाहेरून आलेल्या पत्रांवर कार्यालयामधे इनवर्ड नंबर म्हणजेच आवक क्रमांक टाकला जातो तर कार्यालयामधून बाहेर पाठवली जाणारी पत्रे ही आऊटवर्ड नंबर म्हणजेच जावक क्रमांक टाकल्याशिवाय पाठवली जात नाहीत. यापैकी आवक क्रमांक हा कार्यालयाच्या शिक्क्यानिशी मोकळ्या जागेत लिहिलेला दिसेल, मात्र जावक क्रमांक हा नेहमी कार्यालयाच्या लेटरहेडच्या डाव्या बाजूस म्हणजे जिथे Ref. no. किंवा संदर्भ क्रमांक असे लिहिलेले असते, तिथेच असतो आणि डाव्या बाजूला असतो ज्या दिवशी पत्र एका अमूक जावक क्रमांकावर बाहेर पाठवलं तो दिनांक!

आवक/जावक क्रमांक आणि दिनांक या दोन्ही गोष्टी पत्र्यव्यहाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सोसायटीच्या पुनर्विकासाची बोलणी सुरू असोत वा नसोत, सोसायटीच्या प्रत्येक पत्रव्यवहारावर आवक आणि जावक क्रमांक दिनांकासोबत हा असलाच पाहिजे. अगदी तुम्हाला सर्वसाधारण सभेच्या ज्या नोटीस येतात, त्यावरही जावक क्रमांक हा दिनांकासोबत असणं आवश्यक आहे.

सोसायटीच्या समीतीने बाहेर पाठवल्या जाणार्‍या प्रत्येक पत्रावर जावक क्रमांक टाकणे हे जसे आवश्यक आहे, तसेच जर तुम्ही सोसायटीशी काही पत्र्यवहार करत असाल, तर तुम्हीदेखील सोसायटीला पाठवलेल्या प्रत्येक पत्रावर जावक क्रमांक टाकत चला. ही बाब तुमच्यासाठी अनिवार्य नसली तरी कधी कधी आवश्यक बनू शकते. समजा, तुम्ही एकाच दिवशी दोन निरनिराळ्या विषयांची पत्रे सोसायटीच्या सचिवांना पाठवली आहेत, त्यातील एका पत्रातील मागणी काही तांत्रिक कारणामुळे रद्द झाली व दुसर्‍या पत्रातील मागणी मंजूर झाली आहे, तर सचिवांना तुम्हाला उत्तर देताना या जावक क्रमांकाचा उपयोग संदर्भ क्रमांक म्हणून वापरता येईल. जेणेकरून तुम्हालादेखील आपण कोणत्या विषयाशी संबंधित पत्राचे उत्तर वाचत आहोत हे कळणे सोपे जाते. अन्यथा सोसायटीचे सचिव केवळ दिनांकाचा उल्लेख करून उत्तर देतील आणि तुमचा गोंधळ उडू शकतो.

आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल, की हा जावक क्रमांक सोसायटीच्या पुनर्विकासाच्या वेळेस कसा उपयोगी पडतो. महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७९(अ) अन्वये पुनर्विकासासाठी जे निदेश दिलेले आहेत, ते पाळणे बंधनकारक आहे. त्यात वेळेच्या अवधीला अनन्यसाधारण महत्व आहे. या निदेशाची माहिती नसल्यास सोसायटीच्या समीतीकडून अनावधानाने काही चुका घडू शकतात व त्याचा भुर्दंड सर्व सदस्यांना भोगावा लागतो. क्वचित प्रसंगी पुनर्विकासाच्या प्रक्रियेत अपारदर्शकता राखणे, सदस्यांना विश्वासात न घेणे असे अनुचित प्रकारही सोसयटीच्या समीतीकडून घडतात हे निदर्शनास आले आहे. दुर्दैवाने असा काही प्रकार जर तुमच्या सोसायटीमधे होत असल्याचे तुम्हाला आढळले तर पुनर्विकासाच्या संबंधात समीतीने केलेला पत्रव्यवहार तुम्ही पडताळून पाहू शकता. दोन पत्रांमधे एकापाठोपाठचे दिनांक पण जावक क्रमांक मात्र उलट-सुलट असतील, तर यामागचे कारण तुम्ही सोसायटीच्या समीतीला विचारू शकता. समीतीला तुम्हाच्या प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक असते. मात्र तुमचा कुठलाही प्रश्न तुम्ही लेखी स्वरूपात विचारलात तर अधिक चांगलं; तसेच सोसायटीसोबत केलेल्या प्रत्येक पत्राची पोहोचपावती सही शिक्क्यानिशी घेत जा. म्हणजे आपण सोसायटीशी काय काय पत्रव्यवहार केला आणि त्यातील कोणकोणत्या मुद्द्यांची आपल्याला समाधानकारक उत्तरे मिळालीत याची तुमच्या कडे नोंद रहात जाईल.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही सोसायटीकडून एखादे पत्र किंवा नोटीस घेता, तेव्हा त्यांना द्यावयाच्या पोहोच पावतीवर तुमच्या सहीसोबत, दिनांक आणि वेळही टाकायला विसरू नका.

पुनर्विकास प्रक्रियेसंबंधी अधिक जाणून घेण्याकरिता mogaraafulalaa@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधा.

भाग -१, भाग - २
*****

No comments:

Post a Comment