Monday, July 18, 2011

विचार, आधार आणि निराधार

प्रतिक्रिया: 
काल मैत्रीणीशी फोनवर बोलता बोलता सहज बोलून गेले की, "कधी कधी अशी विचित्र झोप लागते की आठ तासानंतर जाग आली तरी असं वाटतं की आत्ताच तर तासाभरापूर्वी झोपलो होते. इतक्यात उजाडलंदेखील!" तर मैत्रीण म्हणाली की, "सतत विचार करत असलं की असं होतं. डोक्यामधे विचारांची इतकी गर्दी होते की झोपेतही विचारचक्र सुरू असतं. म्हणून आधी खूप विचार करणं बंद कर."

आता विचार न करणं कसं करायचं हे मला काही समजलं नाही. उलट एक नवीन विचार सुरू झाला की, ’का करतो आपण विचार आणि विचार न करणं हे ठरवून जमेल का आपल्याला?’ म्हणजे बघा ना, काम करताना, कुणाशी बोलत असताना, रस्त्यातून चालताना, सिनेमात एखाद्या प्रसंगी पार्श्वभूमीवर हलकं हलकं संगीत वाजत असतं ना, तसे विचार मनात सुरूच असतात. आता असे विचार थांबवायचे तरी कसे? रोजच्या कामांमधे आपण इतके बुडालेलो असतो की पाच मिनिटं स्वस्थ बसलं तर कोणकोणती कामं करायची राहून गेलीत यांचा विचार तर हमखास येणारच. बरं, प्रत्येक विचाराला काही अर्थ असतोच असं नाही पण मनात विचार येतंच रहातात.

परवाची गोष्ट, यूआयडीच्या कामासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून रांगेत उभी होते. तिथे मनात एकच विचार - "आपला नंबर लवकर लागू दे रे महाराजा." पण नंबर लागेपर्यंत माझा वेळ जावा म्हणून की काय परमेश्वराने माझ्या मागच्या नंबरवर एका विचारी मनुष्याला उभं केलं होतं. हे साहेब स्वत:चं मतदानाचं कार्ड, पॅन कार्ड या दोन्ही गोष्टी हरवून केवळ झेरॉक्सच्या आधारावर 'आधार'साठी रांगेत उभे होते. त्यांचं माझं इथपर्यंतचं संभाषण ठीक होतं. कसं आहे, की आपलं दु:ख कुणाला सांगितलं की तेवढंच हलकं वाटतं. उपाय भले नाही मिळाला तरी चालतो. पण साहेबांना स्वत:पेक्षा जगाची चिंता होती आणि त्यासाठी त्यांना माझं मत विचारात घ्यावंसं वाटलं हे माझं दुर्दैव! त्यांनी माझ्याशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू केला.

साहेब: आता हे आधार कार्ड मिळालं की बाकी सगळी कार्ड बाद का?
मी: काही कल्पना नाही पण तोच उद्देश असावा.
साहेब: फिंगर प्रिंट्स कशाला घेतात? आपण काय चोर आहोत का?
मी: कोण कधी चोर बनेल सांगता येत नाही म्हणून पूर्वयोजना असेल.
साहेब: तरी बरं! आपल्याकडे व्होटींग कार्ड, पॅन कार्ड आहे. ज्यांचं नसेल, त्यांचं काय?
मी: (सुस्कारा) काहीतरी दुसरा पर्याय असेलच ना! (आपल्या ओरिजिनल्स आपण हरवल्या आहेत, हे तो सोयिस्करपणे विसरला होता.)
साहेब: हां ते पण आहेच! काय हो? भिकार्‍यांचं पण आधार कार्ड बनवणार का?
मी: (स्वगत: कसे सुचतात याला प्रश्न!) उघड: हा विचार मी केला नव्हता हो.
साहेब: करून बघा विचार! भिकार्‍यांचं काय करतील हे लोक?

साहेबांनी मला अशा थाटात प्रश्न विचारला की जणू माझंच नाव "सरकार" आहे आणि त्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे. आता या प्रश्नावर मी काय बोलणार होते? माझ्या घर-संसाराचे सगळे प्रश्न मला बाजूला ठेवायला लावून या सायबाने माझ्या डोक्याला नसता विचार लावून दिला. तोही उगीचच. याच्या स्वत:च्या पॅन कार्ड आणि मतदान कार्डाची ओरिजिनल हरवलेली. कार्ड मिळालं नाही तर याची अवस्था भिकार्‍यावाणी होणार होती. याला भिकार्‍यांच्या आधार कार्डाशी काय देणं घेणं होतं? पण नाही! स्वत: विचार केला आणि मलाही त्यात सामील करून घेतलं. आता याला काय उत्तर द्यावं याचा मी विचार करतच होते. एकतर त्याच्या पिडूपणाचा मला राग आला होता. त्या रागातच मी त्याला उत्तर दिलं.

मी: काय आहे की भिकार्‍यांसाठी पुनर्वसन केंद्र असतात पण काही भिकारीच तिकडून पळून जातात. त्यांना स्वत:लाच निराधार रहावंसं वाटत असेल, तर ते आधार कार्डासाठी कशाला जातील? काहीजण पार्ट टाईम भिक मागतात, त्यांची सगळी कागदपत्रं ओरिजिनल्ससकट त्यांच्या घरी असतात, ते येतील. काही चांगल्या घरातले लोक असतात पण त्यांनाच भिकेचे डोहाळे लागलेले असतात. तेव्हा अशी लोकं जेव्हा कार्डासाठी इकडे येतील तेव्हा त्यांना योग्य काय ते उत्तर मिळेल.

सायबाला याच्यावर पण काहीतरी प्रश्न मला विचारायचा होता. पण बहुधा देवाला माझी दया आली असावी. माझ्या पुढे आता एकच नंबर होता म्हणून मी त्याला म्हटलं, "आता मला पुढे लक्ष देऊ दे हं. नाहीतर मलाच नंबरासाठी भिक मागावी लागेल." साहेब नाईलाजाने गप्प बसले.

कार्डाचं काम उरकलं. घरी गेले पण दिवभर माझ्या मनात तोच एक विचार सुरू होता - भिकार्‍यांचं काय करतील हे लोक?
*****

No comments:

Post a Comment