Thursday, July 14, 2011

सिक्युरिटी? कसली डोंबलाची??

प्रतिक्रिया: 
आजकाल सुरक्षिततेचा उपाय म्हणून शॉपिंग मॉल्समधेसुद्धा सुरक्षारक्षक असतात. मी काही फार मॉल्समधे फिरलेय असं नाही पण काही मॉल्समधल्या सिक्युरिटीची ही वैशिष्ट्यं माझ्या चांगली लक्षात राहिली आहेत.

फिनिक्स मिलच्या मॉलमधे जाताना मला एक गोष्ट कायम खटकते. आता तर त्या गोष्टीची गंमतच वाटू लागली आहे. या मॉलमधे जायला दोन रस्ते आहेत. दोन्ही रस्त्यांवर आता जाताना आधी सिक्युरीटी आहे. मुख्य दरवाजातून तुम्ही आत गेलात तर स्त्रियांची बॅग तपासली जाते. मेटल डिटेक्टरची भानगड त्यांच्यासाठी नाही. पुरूषांना मात्र तो आपल्या सर्वांगावरून ओवाळून घ्यावा लागतो. पण तो नुसताच ओवाळून घ्यायचा असतो. त्यातून टुंईऽऽ असा आवाज आला तर सुरक्षारक्षक सोयिस्कररित्या "चिल्लर? मोबाईल?" असे प्रश्नरूपी उत्तर स्वत:च उद्गारतात. याच फिनिक्स मिलच्या दुसर्‍या दरवाजातून तुम्ही आत गेलात तर स्त्रियांना बॅग तपासण्याच्या कटकटीलाही सामोरं जावं लागत नाही. पुरूषांना मात्र मेटल डिटेक्टरची अट लागू आहे. म्हणजे स्त्रिया ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असू शकत नाहीत, अशी तिथल्या सुरक्षाप्रमुखांना खात्री असावी.

आता दुसरी गंमत. ही जास्त गंमतीदार गंमत आहे. मुंबई सेंट्रलला, सेंटर मॉलमधे (हा एरिया कोणाचा हे सांगायला नकोच) शिरताना सिक्युरिटी बरं का! म्हणजे मुलींच्या बॅगा बिगा तपासतात, अंगावरून मेटल डिटेक्टर पण फिरवतात. पुरूषांना सुद्धा या अटी लागू. तिकडे ना, KFC चं नवीन रेस्टॉरंट उघडलंय. त्या रेस्टॉरंटला आहेत दोन रस्ते. एक थेट रेस्टॉरंटमधे शिरण्यासाठी आणि दुसरा रेस्टॉरंटमधून थेट मॉलमधे शिरण्यासाठी. काही कळलं?.... म्हणजे, जर तुम्हाला या सिक्युरिटीला सामोरं न जाता मॉलमधे जायचं असेल, तर सरळ KFC च्या ह्या दरवाजातून आत शिरायचं आणि त्या दरवाजातून बाहेर पडून मॉलमधे बाहेर पडायचं? कुत्रं सुद्धा विचारायला येत नाही की कुठे चाललात म्हणून. आहे की नाही गंमत?

मी मघाशी म्हटलं त्याप्रमाणे स्त्रिया या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नसतातच अशी फक्त एकाच मॉलच्या नाही, जवळ जवळ सर्वच मॉलच्या सुरक्षाप्रमुखांची समजूत असावी. कारण एखाद्या स्त्रीने आपली बॅग तपासायला दिली आणि बॅग उघडताक्षणीच आत सॅनिटरी नॅपकीनचं पाकीट जर स्त्री सुरक्षारक्षकाला दिसलं, तर ती बॅग तपासण्याचे कष्टही घेत नाही. बॅग न तपासताच बाईला "जा" ची खूण केली जाते. म्हणजे काय समजायचं?

दोन-तीन महिन्यांपूर्वी एक राखाडी रंगाची एस्टीम आमच्या कॉलनीत पार्क केलेली होती. तिचा बर्गलर अलार्म दोन दिवस अहोरात्र वाजत होता. आजूबाजूच्या इमारतींमधे गाडीच्या मालकाबद्दल चौकशी करून झाली पण ती गाडी कॉलनीतल्या कुणाचीच नव्हती. कुणी ती गाडी घेऊन जायलाही येत नव्हतं. शेवटी त्या गाडीच्या डॅशबोर्डवर मालकासाठी एक संदेश लिहून ठेवला की "बाबारे, गाडी घेऊन जा. त्या अलार्मने उबग आणलाय. उगाच १०० डायल करायला लावू नकोस आणि इथे पुन्हा गाडी पार्क करू नकोस." पण याचा उपयोग शून्य! कारण मालक दोन दिवसांत कधी आलाच नाही. त्या अलार्मच्या आवाजाचा उबग येऊन मी वैतागून १०० डायल केला आणि चार दिवसांनी ती गाडी "टो" झाली. कालची बॉम्बस्फोटाची बातमी वाचल्यावर मला या एस्टीमची आठवण झाली. ही गाडी कुणी बेवारशी सोडून गेलं होतं की कुणी पार्किंगचा सेफ उपाय म्हणून ही आयडीया वापरली, हे कळायला मार्ग नाही. पण ती गाडी दोन-तीन दिवस कॉलनीत सर्वांनाच ताप झाली होती. मला वैषम्य या गोष्टीचं वाटलं की डोक्याला ताप झालेली ही बेवारशी गाडी आपल्या सुरक्षेला हानी पोहोचवू शकेल, अशी कुणाच्या मनात शंकासुद्धा आली नाही. कशाला? १०० वर तर मी स्वत:च फोन केला होता. पण प्रसंगाचं भान राखून गाडीची चौकशी झाली का? नाही. फोन केल्यावर दीड दिवसानंतर गाडी हलवली गेली. खरंच आहे की! आमचा जीव तो काय? आणि त्याचं रक्षण ते काय करायचं?

या वरकरणी छोट्या छोट्या वाटणार्‍या गोष्टी आहेत. आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळू शकतात तर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार्‍यांनाही त्या कळाव्यात अशी माझी इच्छा आहे. कालच्या बॉम्बस्फोटाबद्दल तर बोलायला काही उरलंच नाही. दहशतवादी संघटनेशी बॉम्बस्फोटाचा संबंध (नेहेमीप्रमाणेच) जोडला गेलेला आहे. स्फोटाचा संबंध कसाबच्या वाढदिवसाशी सुद्धा जोडून झालेला आहे. कालच्या दादरला झालेल्या स्फोटाचा आवाज घरी बसूनही ऐकता आला. आधी वाटलं आजूबाजूच्या इमारतीमधे कुणीतरी फटाका वाजवला. जेव्हा खरी बातमी कळली तेव्हा वाटलं - आता काय बाकी राहिलं? मृत्यू आसपासच रेंगाळतोय. केव्हाही दार ठोठावेल! ही जर माझी अवस्था, तर त्या स्फोटात जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांची काय कथा?

या बॉम्बवाल्यांना मला प्रश्न विचारायचेत. काय मिळतं रे तुम्हाला, आमच्यासारखी साधी, रोज कामावर जाणारी माणसं चिरडून? देशाची अर्थव्यवस्था ढासळवून टाकण्याचा हाच एक उपाय आहे का तुमच्याकडे? एक माणूस घरातल्या दहा जणांचं पोट भरावं म्हणून पार अंबरनाथ, कर्जत, बदलापूर पासून मुंबईला येतो रे! त्याला मारून काय मिळतं तुम्हाला? तुमचा धर्म कोणता हे विचारायची गरजच नाही कारण कुठल्याच धर्मात दुसर्‍याचा जीव घेऊन आपल्या धर्माचा पुरस्कार करावा ही शिकवण दिलेली नाही. की पैसा हाच तुमचा धर्म आहे?

*****

No comments:

Post a Comment