Thursday, June 30, 2011

पुनर्विकास घराचा आणि आपलाही - २

प्रतिक्रिया: 
पुनर्विकासाच्या कामाकडे जेव्हा बारकाईने पाहिलं तेव्हा जी गोष्ट मला खूप उशीरा समजली, ती सर्वात आधी तुम्हाला सांगून टाकते. कर्मधर्मसंयोगाने जर तुमच्या इमारतीच्या पुनर्विकासाचं काम सुरू झालं तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इमारतीच्या पुनर्विकासाचं काम असो किंवा नसो पण सोसायटीच्या कमीटीने मतदानाद्वारे निवडून आल्यानंतर ४५ दिवसांच्या आत आत सोसायटीच्या सर्व सदस्यांसोबत एक इन्डेम्निटी बॉन्ड करायचा असतो. यालाच फॉर्म M-20 असंही म्हणतात.

महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कायदा १९६० नुसार प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे समीती सदस्य म्हणजेच प्रत्येक को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या कमीटी मेंबर्स हे हा फॉर्म M-20 भरून द्यायला बांधील असतात. सोसायटीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी व भल्यासाठी योग्य निर्णय घेता यावे म्हणून समीतीवर निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यास हा फॉर्म भरून देणे अनिवार्य असते. आणि जर हा फॉर्म उपरोक्त वेळेमधे भरून दिला गेला नाही, तर त्या सदस्याला आपले पद सोडावे लागते. हा फॉर्म भरण्याचं सर्वाधिक महत्त्व आपल्याला पुनर्विकासाच्या कामाच्या वेळेस दिसून येतं.

जरा विचार करा, दुर्दैवाने पुनर्विकासाचं काम योग्य वेळेत पूर्ण नाही झालं किंवा अपूर्णच राहिलं तर? जर पुनर्विकासाचा निर्णय घेणार्‍या समीतीने असा काही बॉन्ड तुमच्यासोबत केलेलाच नसेल, तर त्यांना तुम्ही जबाबदार ठरवू शकता? आता एक गंमतीचा भाग सांगून हा लेख संपवते. असा M-20 फॉर्म भरून घ्यायचा असतो हेच मुळात काही कमीटी मेंबर्सना माहित नसतं, त्यामुळे तुम्ही त्यांनाही चूक ठरवू शकत नाही. तेव्हा जर तुमच्या इमारतीची रूपांतर सहकारी गृहनिर्माण संस्थेमधे झालेलं असेल. म्हणजेच जर तुमच्या बिल्डींगची सोसायटी झालेली असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडून आलेल्या समीतीकडून M-20 फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या. मग भले पुनर्विकासाची बोलणी सुरू असोत वा नसोत! जर हा फॉर्म भरून घेतलेला नसेल, तर तुम्हाला पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल.

मित्रमैत्रीणींनो, हे प्रकरण समजायला खूप क्लिष्ट वाटतं पण जर आपल्याच घराची काळजी आपण घेतली नाही, तर काय होईल हे वेगळं सांगायची गरज आहे का? पुनर्विकास प्रक्रियेसंबंधी अधिक जाणून घेण्याकरिता 9920028859 या क्रमांकावर संपर्क साधा.
-क्रमश:
*****

No comments:

Post a Comment