Thursday, April 21, 2011

क्रॉस कनेक्शन

प्रतिक्रिया: 
"... मग बोल, तू माझ्यासोबत करशील का?"
"क्‌... काय? काय करशील का?"
"ते, हे.... फ्रेंशिप!"
"मग हे केव्हा बोलणार?"
"सॉरी... हे, हे! मला शब्द खायची सवय आहे."
"हो? शब्दांसोबत डोकंही खातोस का तू?"
"हे, हे, हे! बास का?"
"च्च्‌! (कुठून याला भेटायला आले...)"
"...बास का?"
"...क्काऽऽय?"
"साखर बास का चहात?"
"अर्रर्र! च्‌च्‌च्‌! किती चमचे टाकलीस साखर?"
"तीन चमचे! हे, हे!"
"तीन? मी इतका गोड चहा पित नाही. तुझ्या कपात साखर अजून नाही ना टाकलेली? मग मला दे तो. हा तू घे."
"हम्मऽऽऽऽऽऽऽ! आवडली बर्रका?"
"काय?"
"तुझी "हो" म्हणायची श्टाईल."
"आं! मी कधी हो म्हटलं? आणि कशाला?"
"मग आत्ता कपाची अदलाबदल केलीस ती?"
"त्याचा अर्थ तू असा काढलास?"
"स्पष्ट सांगायला जमत नसलं की मुली असंच काहीतरी करून इशारा देतात."
"ए! अति झालं आं."
"अति काय झालं? चॅट वर तर केलीय ना फ्रेंशिप, मग अ‍ॅक्चुल मधे करायला काय आहे?"
"शक्यच नाही. कारण चॅटवर तू व्यवस्थित बोलत होतास. आता..."
"हां? आत्ता मी काय उलट-सुलट बोल्लो गं? परवा तूच बोल्लीस ना की आज भेटू या, मग सांगते 'हो' की 'नाही' ते?"
"मी? मी कधी म्हणाले? तूच म्हणालास की लेट्स मीट म्हणून..."
"अरेऽ वा! मी नाय त्यातली... काय?"
"एऽ! फालतू बोलू नकोस. चॅटवर आणि प्रत्यक्षात जमीन आसमानाचा फरक आहे तुझ्यात."
"...आणि तुझ्यात पण. तिकडे काय काय बोलायची. समोर आल्यावर एकदम सभ्य! हां?"
"व्हॉट नॉनसेन्स! हा... हा तुझा चहा. तूच पी आणि पुन्हा भेटू नकोस. गुडबाय."
"बिल कोण तुझा... आपलं.... एऽ, अर्धं बिल देऊन जा... आली मोठी..."
"हे घे. चिल्लर ठेव तुझ्याचकडे. ओऽह गॉड!"
....
....
"अं? एक्सक्यूज मी?"
"च्‌! सॉरी हो! चुकून धक्का लागला."
"तुम्ही स्वाती दिक्षित तर नाही ना?"
"हो. मीच स्वाती पण तुम्ही...?
"मी सौरभ दातार. आपलं भेटायचं ठरलं होतं ना आज, इथे?"
"त्‌... तुम्ही सौरभ..? मी...मला... मी आत्ताच कुणाला तरी "तुम्ही" समजून भेटले हो."
"व्हॉट?"
"हो. तो काय, तो वेडपट अजूनही आत रेस्टॉरंटमधेच बसलेला आहे."
"पण असं कसं?.... तुम्ही नाव नाही का विचारलंत त्याला?"
"विचारलं ना! त्याने सौरभच सांगितलं."
"अच्छा! एक मिनिट हं..."
"अं... जाऊ दे ना... कशाला उगाच विचारायला जाताय?"
"नाही, नाही... एक मिनिट..."
...
...
"ओ मिस्टर! तुमचं नाव सौरभ आहे का?"
"आं? हॉं. नाय असायला पायजे होतं का?
"... आणि तुम्ही इकडे स्वातीला भेटायला आला होतात?"
"हां पण तुला काय करायचंय? भाऊएस का तु तिचा?"
"ए! जास्त बोलू नकोस. खोटं नाव सांगून मुलींना फसवतोस...?"
"फसवलं कुणी? ओ! काय बोलताय राव!"
"फसवलं नाहीस तर मग हिला कसा काय भेटायला येऊ शकतोस रे तू?"
"का नाही? ही स्वाती आहे. मी आणि हिने आज इथे भेटायचं ठरवलं होतं."
"स्वाती, हा काय म्हणतोय?"
"नाही.. मी अजिबात ठरवलं नव्हतं. आय मीन... ठरवलं होतं पण ते तुमच्याबरोबर... याच्याबरोबर नाही."
"दोस्ता.... ही पोरगी लई चालू दिसते... दोघांना गंडवतेय बघ."
"ए, गप रहा! स्वाती, आर यू शुअर की तू याला भेटायला येणार नव्हतीस?"
"हाऊ इज इट पॉसिबल सौरभ? तु मला हा प्रश्न..."
"आयल्ला! दोस्ता, तुझंपण नाव सौरभ आहे काय?"
"हो. माझं नाव सौरभ आहे."
...
...
"सौर्‍या, नालायक!"
"आता तू कोण?"
"मी कोण? एक महिना माझ्याशी चॅट करून विचारतो, मी कोण?"
"आयला! तू स्वाती?!"
"नायतर मग काय माती? तिकडे माझ्याशी चॅटवर काय काय बोलतो आणि इकडे दुसरीसाठी सेटींग लावतोस?"
"मी? अगं नाय...च्‌!"
"मग ही कोण आहे? आणि हा? हा तिचा बॉयफ्रेंडे ना? राडा केलास ना तू?"
"हां... म्हंजे... अगं.... आता कसं सांगू तुला?... अरारारा.... डोक्याचा पार गोविंदा झालाय... ओ राव, तुम्ही तुमची हिरॉईन घेऊन जावा नां! मला तिच्यात काही इंट्रेश्ट नाही. माझी हिरॉईन मला भेटली."
"ओ.के. ओ.के. माझ्याही लक्षात आलंय. हे सगळं नावांमधल्या साम्यामुळे घडलंय. सॉरी."
"सॉरी हं.. अं... सौरभ..."
"हां, हां ताई. मी पण सॉरी... जा तुम्ही दोघं."
...
...
"सौर्‍या, हे काय चाल्लंय?"
"स्वाती, आईशप्पत! आजपर्यंत तू चॅटवर मला "सौर्‍या" हाक मारायची ना, ते आवडायचं नाय अजिबात. पण आजपासून तू मला "सौर्‍या"च म्हणत जा."
"आधी मला सांग हे सगळं काय चाल्लंय?"
"नावाचा घोळ गं."
"याच्यासाठीच मेसेंजरवर स्वत:चे फोटो लावूया सांगत होते मी."
*****