Wednesday, April 20, 2011

...तिचं वस्त्रहरण अजूनही संपतच नाही

प्रतिक्रिया: 
"द्रौपदी चीर हरण!" हे वाक्य टाळ्या आणि शिट्ट्यांचं असू शकतं? मला माझ्या कानांवर विश्वासच बसेना! काही वेळापूवी या दु:खद प्रसंगाचं विडंबन करणारा एक व्हिडीओ पाहिला. हा बहुधा एखाद्या कंपनीचा खाजगी कार्यक्रम होता. एक नमुना माईकसमोर बोलायची संधी मिळाली आहे म्हणून द्रौपदी वस्त्रहरणाचे वाट्टेल तसे अंदाज काढत होता. सिनेमा आणि सिरियलमधे जे पाहिलं, तेच खरं असं समजून त्याच्या आधारावर मनाला येईल ते बोलत होता. आपल्या बोलण्यात त्याने निर्लज्जतेचा कळस गाठला होता आणि त्याच्याहून निर्लज्ज होते प्रेक्षक, जे त्याच्या प्रत्येक वाक्यावाक्याला हसत होते, टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत होते. डोक्यात संतापाचे स्फोट होत होते त्या टाळ्या आणि शिट्ट्या ऐकताना.

खरंच, कुठे चालली आहे आपली संस्कृती? इतर देशांच्या भोगवृत्ती संस्कृतीला आपण नावं ठेवतो आणि आपल्याकडे काय चाललं आहे? आपल्याच इतिहासाची आपल्याला धड माहिती नाही, जे काही थोडंफार ऐकलं आहे, त्याच्यानुसार आपण अंदाज बांधतो. पण ते कुठल्या थराला जावेत याला काही मर्यादा! हा प्रसंग प्रत्यक्षात खरंच घडला की नाही, हा वाद नाहीच. तो घडला आहे असं समजूनच त्या प्रसंगाचे किळसवाणे अर्थ लावले जात होते. त्यामागची पार्श्वभूमीही तशाच प्रकारे सांगितली जात होती. ज्या प्रसंगाला आजही एक लाजिरवाणा प्रसंग म्हणून ओळखतात, त्या प्रसंगाचं असं विडंबन कशासाठी? आपल्या वाक्‌चातुर्याची लोकांनी तारिफ करावी म्हणून? की इतिहासातील पात्रं आता आपल्यासमोर येऊन सत्यपरिस्थिती सांगू शकत नाहीत, तेव्हा बोला काय हवं ते म्हणून?

एक क्षण मनात विचार आला - तो नमुना एका ठिकाणी "कल्पना करा की मी द्रौपदी आहे" असं म्हणून तारे तोडत होता, त्या ठिकाणी "कल्पना करा की द्रौपदीच्या जागी माझी आई आहे..." असं म्हणण्याची हिम्मत का करू शकला नाही? म्हणाला असता, तर त्याने द्रौपदी चीर हरण हे तितकंच एन्जॉय करत लोकांनाही समजावून सांगितलं असतं का? द्रौपदी समजा काल्पनिक जरी असली तरी स्त्री नव्हती का? म्हणजे आपली ती आई आणि माहित नाही ती...? ...आणि कुणाचंही का असेना, पण वस्त्रहरण हा विषय थट्टामस्करी करण्याचा असू शकतो?

या देशात कुठल्याही ऐतिहासिक स्त्रीची इतकी निंदा, नालस्ती, अपमान झाला नसेल जितका द्रौपदीचा झाला आहे. आजही होतो. तिच्या नावाचं विशेषण बनवून कित्येकदा शोषित, पिडीत महिलांसाठी वापरलं जातं. एक गोष्ट अनेकांत वाटली गेली की द्रौपदीची उपमा दिली जाते. तिचं वस्त्रहरण अजूनही संपतच नाही.
*****